Monday, December 23, 2024
Homeमाय व्हॉईसदोन वर्षांपूर्वीच्या तडाख्यानंतरही...

दोन वर्षांपूर्वीच्या तडाख्यानंतरही चाळीसगाव का बुडाले?

एक पोस्ट पाहिली कुठेतरी- महाड, चिपळूणनंतर आता कन्नड, चाळीसगाव. विकास चार आण्याचा, आपत्ती व्यवस्थापन बारा आण्याचे! दोन वर्षांपूर्वी, 2019मध्ये ऑक्टोबर महिन्यात तितूर नदीला असाच अचानक पूर आला होता. ती आजच्या घटनेची नांदी होती. निसर्गाने धोक्याची घंटा वाजविली होती. मात्र, तेव्हा पाहणीची नाटके, प्रशासकीय पोपटपंची, आश्वासनांची बोलबच्चनगिरी केली गेली. त्यात काही गांभीर्य असते आणि त्या घटनेपासून काही धडा घेऊन उपाययोजना केली गेली असती, तर आजची हानी निश्चित टळू शकली असती. किंबहुना शहरावर अशी महापुरात बुडण्याची वेळच आली नसती.

आता निसर्गावर खापर फोडतील; पण शहरात नद्यांचा आवळलेला गळा, नदीपात्रातील अतिक्रमण, नैसर्गिक प्रवाहाच्या अडवलेल्या वाटा; तर ग्रामीण भागात अनियंत्रित वाळू उपशाचे पाप कोणाचे? या पाप्याच्या पितरांनी बुडविले चाळीसगाव शहर व ग्रामीण भाग..

आता कदाचित ढगफुटी.., ढगफुटी.. अशी बोंब उठवून त्या माथी खापर फोडण्याचा प्रयत्न होईल. मात्र, हीही स्थानिक आवई आहे. भारतीय हवामान खात्याने ढगफुटीला अजून कोणताही अधिकृत दुजोरा दिलेला नाही. “सतर्क”च्या प्राथमिक अभ्यासात, ही ढगफुटी नसून उंच ढगांच्या एकत्रित क्षेत्रातून झालेली अतिवृष्टी असल्याचे समोर आले आहे. कदाचित राजकीय दबावातून नंतर ढगफुटीचा सरकारी सिग्नल मिळेलही; पण हे मुळात झोपून राहिलेले चमको राजकारणी आणि निर्लज्ज प्रशासनाचे अपयश आहे.

याचा अर्थ जनता यातून सुटत नाही. तिचीही तितकीच जबाबदारी आहे. नद्यांचा गळा घोटून त्यांचे पात्र अरुंद केले जाते. नद्यांची गटारे बनवली जातात. नदीपात्रात अतिक्रमण केले जाते. ते दिवसेंदिवस वाढत जाते. यातून एक दिवस नेहमीच्या निसर्ग वाटा बंद झालेला पाण्याचा प्रवाह मग मनावाच्या वस्तीत जागा दिसेल तिथे घुसतो. मुंबईत मिठी नदीने हा धडा दिला होता. चाळीसगावात आज तितूरने दिला आहे. मुंबईत तेव्हा नव्या पिढीला व अनेकांना मिठी, दहिसर, पोईसर व ओशिवरा या नद्या शहरातून वाहतात, हे कळले होते.

चाळीसगाव म्हणजे गिरणा इतकेच माहिती असलेल्या जळगाव जिल्हावासियांना आज कळले असेल की या शहरात तितूर आणि डोंगरी नावाच्याही दोन नद्या आहेत. चाळीसगावातून बाहेर गेलेल्या बहुतांश नव्या पिढीला कदाचित ते आज कळले असेल. उर्वरित इतरांना त्यानिमित्ताने आपल्या गावातील नद्यांचे स्मरण झाले असेल.

चाळीसगाव

निसर्गाच्या या तडाख्यानंतरही निर्लज्ज व बेशरम राजकीय चमकोगिरी कदाचित केली जाईल. मात्र, चाळीसगावकरांनी आता गचांडी धरून राजकारणी व प्रशासनाला जाब विचारायला हवा. दोन वर्षे ही मंडळी झोपून राहिली आणि धोक्याच्या घंटेचा आवाज देऊनही जाग न आलेल्या शहराला आज या नद्यांनी आपल्या कवेत घेऊन धडा दिला.

साधारणतः कुठलेही सौंदर्यीकरण अथवा नदीपात्रातील बांधकाम, हे त्या नदीचा गळा आवळून टाकते. नैसर्गिक प्रवाहात बाधा आणते. मग कधीतरी हे पाणी वढाय ढोराप्रमाणे उधळते. नदीपात्रातील बांधकामाचे पातक व नदीचा गळा आवळण्याच्या पापाची फळे नाशिक, पुणे शहरही अधूनमधून भोगत असते. हा कागदावर वरवर कितीही चांगला वाटत असला तरी “भकास विकास” असतो. जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह वारंवार अशा नदीच्या गळा घोटण्याच्या प्रयत्नांविरोधात बोलतात. नदीच्या प्रवाहाला मुक्तपणे वाट देणे, हे कधीही शहराच्या, गावाच्या, परिसराच्या हिताचे असते.

माझे पत्रकार मित्र व चाळीसगाव विकास मंचचे प्रफुल्ल साळुंखे यांनी वारंवार हा मुद्दा मांडला आहे. चाळीसगावकरांनी त्याचे गांभीर्य लक्षात घेतले नाही. याशिवाय, तुषार निकम यांनीही मांडलेला एक महत्त्वाचा मुद्दा दुर्लक्षिला गेला. ‘मिशन 500 कोटी लिटर्स जलसाठा’ अंतर्गत चाळीसगाव तालुक्यात गावोगावी नाला खोलीकरण आणि रूंदीकरण मोहीम राबवून, नदी-नाल्यांचा गाळ काढून, त्यांच्यात झालेले अतिक्रमणे काढून घेतले आणि पाणी साठोप्याचे मोठमोठे साठे तयार केले. त्यामुळे दुष्काळ निवारणासाठी तर फायदा झालाच पण पूर नियंत्रणही झाले.

गावोगावी जोरदार वाहून जाणारे पाणी गावातच थांबू लागले. त्यामुळे पुराचा जोर कमी झाला. चाळीसगाव शहरातही तसेच अपेक्षित होते. चाळीसगाव शहरालगत असलेल्या दोन्ही नद्या या खोलीकरण करून घेणे गरजेचे होते. कारण, वर्षांनुवर्षाचा गाळ साचून त्या उथळ झालेल्या आहेत आणि त्यांच्या लेव्हलला गावाचे रस्ते झाले आहेत. त्याची जाणीव ‘मिशन 500 कोटी लिटर्स जलसाठा’ने तत्कालीन मुख्याधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी यांना करून दिली होती. नदीमध्ये वाढलेले अवास्तव बाभूळ, झालेली अतिक्रमणे आणि नदीचा उथळपणा यासाठी नदीचे खोलीकरण होणे गरजेचे आहे, असे प्रशासनाला सुचविले गेले होते. मिशनचे मशीन्सही होते, प्रशासनाला त्यात फक्त डिझेल टाकायचे आणि नदी खोलीकरणचे काम करून घ्यायचे होते. दुर्दैवाने शहराच्या हिताची पर्वा कुणाला नसल्याने ते झाले नाही. तसे झाले असते तर नदीचे पात्र मोठे व खोल होऊन, नदीच्या लेव्हलला आलेल्या रस्त्यात काही उंची तयार झाली असती आणि पुराचे पाणी थेट शहरामध्ये न जाता सरळ वाहून गेले असते. पण प्रशासनाने  याकडे डोळेझाक केली आणि त्याचा परिणाम आता चाळीसगावकरांना भोगावा लागला.

जमिनीलगत आलेल्या रस्त्यांमुळे पुराचे पाणी रस्त्यावरून शहरात पोहोचले आणि त्याने जनावरांचा चारा, टपऱ्या वाहून नेल्या. मातीची घरे पाडली, नदीकाठचे मोठे नुकसान केले. नद्यांचे सुशोभिकरण करणे म्हणजे पर्यावरणाचा ह्रास करणे आहे. यातून फायदा ठेकेदाराचा आणि संबंधित लोकांचा होतो; पण नद्यांचे पात्र छोटे होऊन असे शहराच्या जीवावर उठण्याचे प्रकार होतात. सुशोभिकरण हे नदीत न करता, काठावर केले पाहिजे, हे जोपर्यंत शिकलेल्या लोकांना कळत नाही, तोपर्यंत असे फटके बसत राहतील, ही तुषार निकम यांची भूमिका पटणारी आहे. चाळीसगावकर आता तरी ती समजून घेतील का?

हा फटका केवळ यावेळी बसून संपणारा नाही. यापुढे वारंवार, या संकटांना तोंड देण्याची आता तयारी करावी लागणार आहे. आणि हे टाळायचे असेल तर ठोस, प्रामाणिक, सर्वपक्षीय शहर हिताचे निर्णय घ्यावे लागतील. नदी पात्र रुंद करावे लागेल, त्यातील कच्ची-पक्की अतिक्रमणे उद्ध्वस्त करावी लागतील.

(पुढे चालू)

Continue reading

कर्जाचे इएमआय सध्यातरी जैसे थे!

खुशखबर! तुमचे लोनचे हफ्ते (इएमआय) वाढणार नाहीत, कर्जही महागणार नाही; रिझर्व्ह बँकेने रेपो दर 6.5% कायम ठेवला आहे. सलग आठव्यांदा व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही! भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीने (एमपीसी) FY25साठी भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनासाठी जीडीपी वाढीचा अंदाज...

दोन वर्षांपूर्वीच्या तडाख्यानंतरही चाळीसगाव का बुडाले? (भाग- अंतीम)

हा झाला शहरी भागाचा प्रश्न. ग्रामीण भागातही अनियंत्रित वाळू उपशाचा प्रश्न मुळावर उठला आहे. यापूर्वी त्याचे गांभीर्य कदाचित गावांनाही लक्षात आले नसेल. पण आता त्यांना ते लक्षात घ्यावे लागेल. केवळ निसर्गावर खापर फोडून सुटका नाही. साऱ्या गावाने मिळून वाळू...

गुंतवणूक करायची तर “झोमॅटो” सबस्क्राईब करा!

गुंतवणूक करायची तर "झोमॅटो" सबस्क्राईब करा! 72 ते 76 ₹ प्राईसबँड.. अप्पर प्राईस 76ला सबस्क्राईब करा. आज ओपन झाला आहे आणि 16 जुलैला ऑफर क्लोज होईल. कमीतकमी 195 शेअर्स म्हणजे 76X195 = 14,820ची गुंतवणूक करा. चुकून शेअर 76च्या खाली लिस्ट...
Skip to content