नुकतेच, होय नुकतेच आपण एकमेकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छाचे “इकडून आलेले मेसेज” तिकडे पाठवले, ते येताहेत / पोहचाहेत तोच व्हाॅट्सएपवर एकमेकांना तिळगूळ पाठवलेही.. आपण आपल्या याच आनंदात असतानाच यंदा वर्षाच्या अखेरीला, २६ डिसेंबरला शाहरुख खानचा “किंग” प्रदर्शित होईल हे जाहीरही झाले. २०२६चे पहिले तीन शुक्रवार नवीन चित्रपट घेऊन आले न आले तोच याच वर्षीच्या शेवटच्या शुक्रवारी प्रदर्शित होणारा चित्रपट जाहीर व्हावा? ख्रिसमस आणि नवीन वर्ष सुरु होतेय यांच्या रजेचा फायदा आपल्याला व्हावा, असे यामागचे गणित दिसतेय. ही दूरदृष्टी की कार्पोरेट युगातील व्यावसायिक रणनीती? २०२६मध्ये प्रदर्शित होत असलेल्या बिग बजेट चित्रपटांच्या प्रदर्शनाचे आयोजन / नियोजन असेच भन्नाट आहे. ही खेळी म्हणजे मध्यम आणि छोट्या चित्रपटांसाठी एकप्रकारची सावधगिरीची सूचना आहे. आमचं ठरलंय, तुमचंही हे शुक्रवार वगळून ठरुद्यात.
बरं आज आपले चित्रपट जगभरातील अनेक देशांमध्ये प्रदर्शित होतात. पॅन इंडिया चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे एका भाषेत निर्माण झालेला चित्रपट अन्य प्रादेशिक भाषेसह हिंदीत डब होऊन दणक्यात प्रदर्शित होणे. आजच्या चित्रपटात व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बरेच थरारक क्षण असतात. चित्रपटाच्या प्रमोशनमागे कल्पकता आणि नाविन्य हवे, सोशल मीडियातील रिल वेगाने लाईक्स मिळतील अशा हव्यात. सामाजिक, सांस्कृतिक, माध्यम आणि आर्थिक क्षेत्रात अशा मोठ्या चित्रपटाचे जबरा वातावरण निर्माण करायचं तर खूप, खूप लवकर चित्रपट प्रदर्शित करण्याची तारीख ठरवायला हवी. आजच्या अतिशय वेगवान आणि स्पर्धात्मक युगात तर ते स्वाभाविक आहे. गल्ला पेटीवरील “किंग” ठरायचे तर इतक्या लवकर चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख ठरवायला हवी. आसपास क्रिकेट स्पर्धा नाही ना हेदेखील पाहिले जाते. कधीकधी तर प्रश्न पडतो, चित्रपटाच्या मुहूर्ताच्या दिवशीच त्याच्या प्रदर्शनाची (रिलीज) तारीख ठरवणे योग्य की आपल्या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होत आले असताना ती तारीख ठरवणे योग्य?
यात आणखी एक ॲन्गल आहे. कलाकारांपासून टेक्निकल कामासाठी तारखा निश्चित केल्या म्हणजे कामात सुसूत्रता येते असे काही नाही. आऊटडोअर्स शूटिंगच्या वेळी एखादी अडचण येऊ शकते. रिलीजच्या वेळचे वातावरण वेगळे असू शकते. तर मग ‘अमूकच तारखेला चित्रपट प्रदर्शित करुया’ असा हट्ट तो कशाला? चित्रपट हे क्रिएटीव्ह अर्थात नवनिर्मितीचे काम आहे. एखाद्या दिग्दर्शकाला निर्मितीच्या काळात एखादी नवीन कल्पना अथवा बदल सुचू शकते. एखादे गाणे हवे अथवा नको वाटू शकते. आणि ते अगदी स्वाभाविक आहे. चित्रपती व्ही. शांताराम,

राज कपूर, मेहबूब खान, के. असिफ, कमाल अमरोही, गुरुदत्त, विजय आनंद अशा चोवीस तास आपल्या चित्रपटाचा विचार करणारे दिग्दर्शक असे मोजूनमापून ठरवलेल्या दिवसांत सिनेमा पूर्ण करु शकत होते का? अजिबात नाही. के. असिफ यांनी तब्बल बारा वर्षे अथक परिश्रम करुन ‘मुगल ए आझम’ पडद्यावर आणला आणि त्यांची ती मेहनत पडदाभर दिसली. १९६०चा हा चित्रपट आजही पुन्हा पुन्हा पाहताना दिग्दर्शकाची चित्रपट माध्यमावरील पकड आणि समज दिसते. राज कपूरने आपला महत्त्वाकांक्षी चित्रपट ‘मेरा नाम जोकर’च्या निर्मितीसाठी सहा वर्षे खर्च केली. मनात आले आणि चित्रपट बनवायला घेतला, तो वेळेत पूर्ण केला असे या माध्यम व व्यवसायात अजिबात नसते आणि अजिबात नव्हते.
चित्रपट माध्यम हा सहज दिसतो तितका साधा आणि सोपा विषय नाही. पटकथेवरच सखोल मेहनत घ्यावी लागते तेव्हा कुठे पुढची पायरी चढत जाता येते. आमिर खानची भूमिका असलेला आणि मूळ इंग्रजी चित्रपटाचे अतुल कुलकर्णीने भारतीयकरण केलेला ‘लालसिंग चढ्ढा’ २०२०च्या ख्रिसमसचे आकर्षण होते. त्याची तारीख अशीच लवकर जाहीर झाली. पण कोरोना आला आणि सगळे गणितच विस्कटून टाकलं गेलं. आमिर खान फार शिस्तबद्ध सिनेमावाला असला तरी नियोजित तारीख त्या शिस्तीत नसते. त्यानंतरही त्यात काही बदल, रिशूटिंग यांच्या बातम्यांनी चित्रपटाचे प्रदर्शन सतत पुढे जात राहिले. हे लहानमोठे बदल, आवश्यक असे रिशूटिंग हे सगळे तो चित्रपट अधिकाधिक रंगतदार आणि प्रभावी व्हावा यासाठीच असते. मग त्यासाठी कितीही वेळ जाण्याची शक्यता असते आणि चित्रपट परिपूर्ण करायचा तर तो रिलीजच्या तारखेच्या गणितात अडकवणे योग्य नाही. इतकं करूनही “लालसिंग चढ्ढा” हा चित्रपट गल्ला पेटीवर काहीच स्कोअर करु शकला नाही.
बोनी कपूर निर्मित आणि सतिश कौशिक दिग्दर्शित ‘रुप की रानी चोरो का राजा’ हा बिग बजेट चित्रपट बराचकाळ निर्मितीवस्थेत होता. अनिल कपूर आणि श्रीदेवी या जोडीच्या या चित्रपटाचे शूटिंग संपतच नव्हते. ते पूर्ण होत असल्याचे लक्षात येताच प्रदर्शनाची तारीख नक्की केली. पण तरीही अधेमधे काही दृश्ये हवी होती. त्यावरुन मग थट्टेने म्हटले गेले की, बहुतेक फस्ट डे फर्स्ट शो सुरु होईपर्यंत याचे शूटिंग होतच राहिल. आज आपण कार्पोरेट युगात राहतोय. चित्रिकरणाच्या वेळापत्रकाला फार फार महत्त्व आले आहे. दूरवरची रिलीजची तारीख ठरते तेव्हा त्यात चित्रपटावरचे तांत्रिक सोपस्कार, मार्केटिंग, प्रमोशन यांचे सगळेच अपडेट असतात. विशेष उल्लेखनीय गोष्ट, “किंग”ची निर्मिती मार्फिस पिक्चर्स आणि शाहरुख खानची कंपनी रेड चिलीज करीत आहेत. शाहरुख खान मध्यवर्ती भूमिकेत असून अनिल कपूर, दीपिका पदुकोण, अभिषेक बच्चन, रानी मुखर्जी ,अर्शद वारसी आणि शाहरुख खानची मुलगी सुहाना खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. एवढे कलाकार आहेत म्हटल्यावर २६ डिसेंबर येणारच चित्रपट पडद्यावर यायला!
(लेखक दिलीप ठाकूर ज्येष्ठ सिने पत्रकार व समीक्षक आहेत.)

