मुंबई, नवी मुंबईपाठोपाठ आता रायगड-पेण परिसरात ‘तिसरी मुंबई’ आकारात येत आहे. स्वित्झर्लंडमध्ये वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीच्या निमित्ताने दावोसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तिसऱ्या मुंबईतले पहिले शहर म्हणून रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा केली. आज प्रामुख्याने धोरणात्मक असे सामंजस्य करार करण्यात आले. त्यात युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, युनिव्हर्सिटी ऑफ बर्कले, टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिक, अर्बन फ्युचर्स कलेक्टिव्ह-लंडन, आयसीसीआय-इटली, अँलाँग ट्युनिंग इन्स्टिट्यूट, नॉर्वेजीयन जीओ टेक्निकल इन्स्टिट्यूट, अर्बन प्लॅनिंगमधील सुबाना जुराँग–सिंगापूर यांच्यासोबत टेक्निकल सामंजस्य करार केले आहेत. यातून केवळ गुंतवणूक नाही, तर ज्ञान आणि तंत्रज्ञानातून मोठ्या प्रमाणात उद्योग आणता येतील. अर्बन प्लॅनिंग, ट्रान्सपोर्टशी संबंधित करारांमुळे प्रत्येक शहरातील वाहतूकसुविधांची सरंचना चांगल्या रितीने करता येणार आहे, असे ते म्हणाले.
नवी मुंबई विमानतळापासून पंधरा ते वीस किलोमीटरवर हे ग्रोथ सेंटर निर्माण करण्यात येणार आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून यासाठीच्या परवानग्या मिळविण्यात येत होत्या. त्या मिळाल्यानंतर आज या तिसऱ्या मुंबईतील पहिल्या शहराची घोषणा करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. याठिकाणी प्लग अँण्ड प्ले धर्तीवर रेडी टू स्टार्ट पद्धतीने संबंधित घटक लगेच कामकाज सुरु करु शकणार आहेत. ही देशातली पहिली कंपनी आहे. यामध्ये खासगी-सार्वजनिक भागीदारी (पीपीपी) प्रकल्प असणार आहे. यात शासन, एमएमआरडीए आणि खासगी घटक एकत्र येऊन काम करतील. याठिकाणी नवीन बिझनेस डीस्ट्रिक्ट तयार करण्यात येत आहे. चांगल्या पगाराच्या नोकऱ्या तसेच ग्लोबल कॅपिसिटी सेंटर्स, फिनटेकची इकोसिस्टम येथे तयार होईल. बीकेसीच्या धर्तीवर याठिकाणी बिझनेस डिस्ट्रीक्ट स्थापन होईल. या शहराच्या घोषणेनंतर सुमारे एक लाख कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करारदेखील झाले आहेत. याकरीता जगातल्या दिग्गज अशा कंपन्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. त्यामध्ये रिपब्लिक ऑफ कोरीयाचा हवाना ग्रुप, स्वित्झर्लंडमधून एसएसबी ग्रुप, एन्सार, फेडेक्स हे अमेरिकेतले समूह, फिनलंडचा रिव्हर रिसायकल समूह, दुबईचा एमजीएसए समूह, सिंगापूरचा स्पेसेस होल्डिंग मेपल ट्री, जीनव्ही आणि इंडोस्पेस पार्क समूह, अमेरिकेतून ट्रिबेका डेव्हलपर्स आदींचा समावेश आहे. या विदेशी गुंतवणूकीतून येथे एक खूप चांगले शहर तयार होईल. याठिकाणी वॉक टू वर्क अशा पद्धतीने सुविधा निर्माण होतील. अशा रितीने तिसऱ्या मुंबईतील पहिले शहर आता प्रत्यक्षात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
राज्यातल्या शेवटच्या घटकापर्यंत दर्जेदार आणि तत्पर आरोग्यसुविधा पोहोचविण्याच्या दृष्टीने यंदा दावोसमध्ये मेडीकल-टेक्नॉलॉजीबाबत एका सत्रात चांगली आणि सकारात्मक चर्चा झाली. यातून राज्यातल्या आरोग्यसुविधांसाठीचा रोडमॅप निश्चित करण्यात आला. यातून आपल्याला राज्यात मेड-टेक स्टार्टअपची चांगली इकोसिस्टिम निर्माण करता येऊ शकेल. त्यासाठी जगातल्या सर्वोत्तम कंपनीशी करार करण्यात आला आहे, असे फडणवीस म्हणाले.
दरम्यान, दावोसमध्ये साकारण्यात आलेले मॅग्नेटिक महाराष्ट्राचे पॅव्हेलियन आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. या पॅव्हेलियनला विविध क्षेत्रातील उद्योजक, गुंतवणूकदारांसह, भारतातील मान्यवरांनी आवर्जून भेट दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांच्यासह महाराष्ट्राच्या प्रतिनिधी मंडळाने सर्व मान्यवरांचे स्वागत केले. दावोस दौऱ्यावर असलेले भारताचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीही इंडिया पॅव्हेलियनमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा केली. या दौऱ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांच्याशी चर्चा केली. यामध्ये महाराष्ट्रात हरित औद्योगिक पट्टा (ग्रीन इंडस्ट्रीयल कॉरिडॉर) विकसित करण्याच्या अनुषंगाने चर्चा झाली. यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि बर्मुडाचे पंतप्रधान डेव्हिड बर्ट यांचीही भेट झाली. या भेटीत उभयतांनी सर्वसमावेशक विकास, लोकाभिमूखता आणि विकास क्षेत्रातील नाविन्यपूर्णता या अनुषंगाने धोरणात्मक चर्चा केली. ह्युंदाईचे अध्यक्ष सुंग किम यांनीही मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. महाराष्ट्रात येणाऱ्या काळात 5 नवीन ईव्ही मॉडेल्स आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. ह्युंदाईच्या पुण्यातल्या प्रकल्पाच्या उद्घाटनाचे निमंत्रणही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिले.
जेबीआयसीचे गव्हर्नर हयाशी नोबुमित्सू यांनी भारत–जपान सहकार्य संबंधात महाराष्ट्रासोबत ईव्ही बसेस, अर्बन मोबॅलिटी या क्षेत्रात हरित गुंतवणुकीच्या मोठ्या संधी असल्याचे नमूद केले. एपी मोलर मर्सेकचे सीईओ विन्सेंट क्लार्क यांनीही फडणवीस यांची भेट घेत महाराष्ट्रात 2.5 बिलियन डॉलर्स टर्मिनल संधीचे सूतोवाच केले. फिनलंडचे परराष्ट्र व्यापार व्यवहार आणि विकास मंत्री विले त्याविओ यांचीही मुख्यमंत्र्यांनी भेट घेत सहकार्याबाबत चर्चा केली. इस्रायल इनोव्हेशन अथॉरिटीचे अध्यक्ष अलोन स्टोपेल यांच्याशी विविध नाविन्यपूर्ण संशोधन क्षेत्रात भागीदारीबाबत सविस्तर चर्चा झाली. हॅवलेट पॅकर्डच्या अध्यक्ष पॅट्रिका रुसो आणि वरिष्ठ उपाध्यक्ष भावना अग्रवाल यांचीही फडणवीस यांनी भेट घेतली. सुरक्षाविषयक बाबींमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आणि डिजिटायझेशनबाबत अधिक सहकार्य वाढवण्याबाबत यावेळी चर्चा झाली. अँटोरा एनर्जीचे सीईओ अँड्र्यू पॉनेक यांच्याशी थर्मल एनर्जी साठवणूक सोल्यूशन्स, झिरो कार्बन इंडस्ट्रियल हीट इत्यादींबाबत चर्चा झाली. एमआयटी मीडिया लॅबच्या कार्यकारी संचालक जेसिका रोसेनवर्सेल यांचीही त्यांनी भेट घेतली.

