Homeकल्चर +ललित प्रभाकर आणि...

ललित प्रभाकर आणि मृण्मयी गोडबोले पुन्हा एकदा एकत्र!

अत्यंत महत्त्वाच्या आणि मानाच्या २४व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (PIFF), “तो, ती आणि फुजी”ची अधिकृत निवड झाली असून, या महोत्सवातील प्रतिष्ठित मराठी फीचर फिल्म स्पर्धा विभागात या चित्रपटाचा जागतिक प्रीमियर होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या “संत तुकाराम” सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कारासाठी हा चित्रपट स्पर्धेत असून, हा त्याच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरतो. या चित्रपटातून ललित प्रभाकर आणि मृण्मयी गोडबोले पुन्हा एकदा एकत्र पडद्यावर येत आहेत. २०१७मधील बहुचर्चित “चि व चि सौ का”नंतर ही जोडी पुन्हा दिसणार असून, त्यांच्या सादरीकरणात सहजता आणि भावनिक खोली जाणवते.

ह्या चित्रपटाचे चित्रिकरण जपान आणि भारतात झाले असून हा एक अभूतपूर्व मराठी रोमँटिक चित्रपट आहे. जपान केवळ पार्श्वभूमी किंवा वेगळे स्थळ म्हणून नाही, तर पात्रांच्या आतल्या भावनिक अंतराचे प्रतिबिंब असलेल्या भावनिक अवकाशासारखा उलगडतो. हा चित्रपट अंतर, काळ आणि बदलत्या भावनिक वास्तवामुळे नातेसंबंध कसे बदलतात याचा शोध घेतो. सुरुवातीला अतिशय उत्कट असलेले एक नाते काळानुसार, प्राधान्यक्रमांमुळे, परस्परविरोधी स्वभावांमुळे व अनाठायी अपेक्षांमुळे कसे विषारी बनते हे या कथानकातून उलगडते. विभक्त झाल्यानंतर सात वर्षांनी ते पुन्हा एकदा जपानमध्ये भेटतात तेव्हा जुन्या जखमा, अर्धवट राहिलेल्या गोष्टी, भावना, इच्छा पुन्हा एकदा डोकं वर काढतात आणि काळाने बदललेली माणसं त्यांच्यातील विरलेले प्रेम पुन्हा शोधू शकतात का? हे पाहणे उत्कंठावर्धक ठरते.

इरावती कर्णिक यांनी ह्याआधी “झिम्मा”, “आनंदी गोपाळ” यांसारखे महत्त्वाचे चित्रपट लिहिलेले आहेत व मोहित टाकळकर यांनी “मीडियम स्पायसी”, “द ब्राईट डे”, ”चिरेबंदी”, “ऑकेजनल रिफ्लेक्शन ऑन द कॉन्टिन्जेन्सीज ऑफ लाईफ” असे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०२५मधील “बयान”, बर्लिनाले २०२३मधील “घात” आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेता “पिकासो” यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखले जाणारे शिलादित्य बोरा यांनी प्लटून वन फिल्म्स या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट निराळ्या, दिग्दर्शककेंद्रित सिनेमाला प्रोत्साहन देण्याच्या बांधिलकीला पुढे नेतो. 

“आपल्या दोघांच्या आठवणी वेगवेगळ्या असतील तर?” ह्या एका वाक्याने मी फार प्रभावित झालो असं चित्रपटाच्या PIFF निवडीबद्दल बोलताना निर्माते शिलादित्य बोरा म्हणाले. हाच प्रश्न या कथानकाच्या केंद्रस्थानी आहे. दोन व्यक्ती एकाच नात्यात, एकाच क्षणात असतात, पण त्या अनुभवांना वेगवेगळ्या पद्धतीने जतन करतात. काळ जसा पुढे सरकतो, तसं प्रेम बदलतं, कधी कधी तुटतंही. ते खोटं होतं म्हणून नाही, तर आठवणी, प्राधान्यक्रम आणि आपापली विश्व वेगळी होऊ लागतात. मराठी सिनेमाच्या कक्षा कशा रुंदावतील, त्याच्या सीमा आपल्याला कशा ओलांडता येतील ह्याचा विचार या चित्रपटामध्ये नक्की आहे. “घात”च्या तीव्र वास्तववादापासून ते “पिकासो”च्या शांत, अंतर्मुख करणाऱ्या जगापर्यंत अशा निराळ्या धाटणीच्या चित्रपटांची निर्मिती करण्याचा प्रयत्न प्लटून वन फिल्म्स ने नेहमीच केला आहे. “तो, ती आणि फुजी” ही त्याच मालिकेतील नवी कथा, नव्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न आहे. PIFFसारख्या महत्त्वाच्या महोत्सवात हा चित्रपट सादर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.

दिग्दर्शक मोहित टाकळकर म्हणाले की, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील मराठी स्पर्धा विभागात “तो, ती आणि फुजी” ची निवड होणं अत्यंत समाधानकारक आहे. दरवर्षी पुणे शहर अत्यंत गंभीरपणे आणि कुतूहलाने ह्या महोत्सवाची वाट पाहतं. हा एकप्रकारे सांस्कृतिक क्षण आहे. PIFFमध्ये भाषेच्या सीमांना ओलांडून वेगवेगळ्या देशांचे चित्रपट प्रदर्शित तर होतातच परंतु ह्या कामांचा एकमेकांमध्ये संवाद घडतो, याचा मला विशेष आनंद आहे. हा चित्रपट ठामपणे शहरी आहे, समकालीन पुण्यात रुजलेला आहे. यातील पात्रं सोप्या उत्तरांनी प्रश्न सोडवताना दिसत नाहीत. आपापली भावनिक अस्वस्थता ठामपणे मांडतात आणि त्यावर अडूनही राहतात. चित्रपटाची कथा सरळसोट नाही. पात्रांच्या फाटलेल्या मनाची गुंतागुंत दाखवणारी आहे. गोष्टी सोप्या उत्तरांनी मिटवण्याऐवजी भावनिक अस्वस्थतेत असण्याची हिंमत ठेवतो. चित्रपटाच्या पहिल्या सार्वजनिक प्रदर्शनासाठी PIFFपेक्षा योग्य व्यासपीठ दुसरं असूच शकत नाही. विचारवंत, प्रश्न विचारणाऱ्या आणि अस्वस्थ होण्याची तयारी असलेल्या प्रेक्षकांसमोर हा चित्रपट प्रथमच सादर होतो आहे, याबद्दल मी कृतज्ञ आहे. अनुभवी आणि संवेदनशील, सर्जनशील टीममुळे हा चित्रपट शक्य झाला आहे. अभिनयापासून दृश्यरचनेपर्यंत प्रत्येक घटक पात्रांचा आतला प्रवास उलगडायला मदत करतात.

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना मृण्मयी गोडबोले (“झिम्मा”, “CRD”, “High”) म्हणाली की, माझ्यासाठी ही व्यक्तिरेखा आजच्या काळातील स्त्रीचं अचूक चित्रण आहे. ती प्रेम, स्वायत्तता, जबाबदारी यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न करते. PIFFमध्ये हा चित्रपट दाखवला जाणार याचा मला आनंद आहे, आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहण्याची उत्सुकता आहे.

ललित प्रभाकर (“आनंदी गोपाळ”, “झोंबिवली”, “Smile Please”) म्हणाला की, या चित्रपटामागचा प्रवास माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. अनेक टप्प्यांवर तो आव्हानात्मक होता, पण तितकाच समाधानकारकही. शेवटपर्यंत या चित्रपटावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा मी ऋणी आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात- जिथे प्रेक्षक हा चित्रपट पहिल्यांदाच अनुभवतील- तो प्रदर्शित होतो आहे, ही गोष्ट अत्यंत खास आणि समाधान देणारी आहे. “तो, ती आणि फुजी” हा चित्रपट प्रेम, विभक्त होणं आणि काळ बदलल्यानंतर पुन्हा भेटणं याकडे अत्यंत वैयक्तिक नजरेने पाहतो आणि प्रेक्षकांना त्यांच्या स्वतःच्या अनुभवलेल्या किंवा विसर पडलेल्या नात्यांवर विचार करायला भाग पाडतो.

प्लटून वन फिल्म्स ही भारतातील आघाडीची स्वतंत्र चित्रपट निर्मिती संस्था असून, बर्लिनाले टॅलेंट्सचे माजी विद्यार्थी शिलादित्य बोरा यांनी तिची स्थापना केली आहे. वेगळ्या पद्धतीच्या चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी ही संस्था ओळखली जाते. संस्थेच्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये “युअर्स ट्रुली” (Zee5), राष्ट्रीय पुरस्कार विजेता “पिकासो” (Amazon Prime Video) आणि “भगवान भरोसे” (Amazon Prime Video, Channel 4) यांचा समावेश आहे. अलीकडेच हुमा कुरेशी अभिनीत “बयान”चा टोरांटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०२५मधील Discovery विभागात जागतिक प्रीमियर झाला. सर्जनशील वाटचाल पुढे नेत, प्लटून वन फिल्म्सने ओडिशा चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले असून, “बिंदूसागर” हा चित्रपट ५६व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI), गोवा येथे प्रदर्शित झाला. या वर्षी “बयान”, “बिंदूसागर”, “मिनिमम” आणि “तो, ती आणि फुजी” असे चार चित्रपट प्रदर्शित होणार असून, प्लटून वन फिल्म्ससाठी हे वर्ष अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती

देशातील अव्वल बायोडायव्हर्सिटी आणि विविध पिकांची उत्पादनक्षमता असलेल्या नंदुरबार जिल्हा व परिसरातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांना शहादा येथे नुकत्याच झालेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनासारख्या आयोजनातून नवतंत्रज्ञानाचे उपयुक्त मार्गदर्शन मिळते. त्याचा उपयोग करून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक गट क्रांती...

रतन टाटांची जयंती उत्साहात साजरी

रतन टाटांची जयंती केवळ स्मरणदिन न राहता महाराष्ट्र शासनाच्या वतीने सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरी व्हावी, अशी मागणी प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार के. रवि (दादा) यांनी केली. देशाच्या औद्योगिक व सामाजिक प्रगतीत रतन टाटा यांचे अतुलनीय योगदान पाहता यंदा 28...

कतरिना आणि हृतिकचं परस्परविरोधी जग आलं सोबत!

आपल्या नवीन अभियानासाठी राडोने कतरिना कैफ आणि हृतिक रोशन या आपल्या दोन प्रसिद्ध जागतिक अम्बॅसडर्सना एका दृश्यात्मक क्रिएशनमध्ये एकत्र आणले आहे, ज्यात प्रत्येक बाबतीत परस्परविरोधी असलेली दोन जगं एकमेकांकडे आकृष्ट होतात व शेवटी एकत्र होतात. या दोन्ही कलाकारांशी केलेल्या...
Skip to content