Homeन्यूज अँड व्ह्यूजरोहित-विराटने दिला क्रिकेट...

रोहित-विराटने दिला क्रिकेट निवड समितीला ‘इशारा’!

कसोटी मालिकेपाठोपाठ पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध लगेचच झालेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत के. एल. राहुलच्या भारतीय संघाने २-१ अशी बाजी मारून कसोटी मालिकेत झालेल्या पराभवाचा बदला घेत भारतीय क्रिकेटप्रेमींना थोडासा दिलासा दिला. नियमित कप्तान शुभमन गिल, अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह, मोहम्मद सिराज आणि अष्टपैलू हार्दिक पंड्या या तीन प्रमुख खेळाडूंच्या गैरहजेरीत भारताने मिळवलेल्या या मालिका विजयाला त्यामुळे एक वेगळीच किनार आहे. गेल्या पंधरा वर्षांत भारतीय संघ आपल्या घरच्या मैदानावर वन डे मालिकेत अपराजित आहे. २०१०मध्ये दक्षिण आफ्रिकेने भारताला ३-२ असे भारतभूमीत नमवले होते. त्यानंतर तसा पराक्रम इतर कुठल्याच विदेशी संघाला करता आला नाही. भारतात द. आफ्रिकेविरूद्ध‌ हा वनडे मालिकेतील भारताचा सलग तिसरा मालिका विजय होता.

शेवटचा सामना वगळता तीन सामन्यांची ही मालिका चांगली रंगतदार झाली. पहिल्या सामन्यात भारताने १७ धावांनी बाजी मारली. दुसऱ्या लढतीत पाहुण्यांनी ३५९ धावांचा यशस्वी पाठलाग करताना ४ चेंडू आणि ४ गडी राखून थरारक विजय मिळवला. आता वन डे सामन्यात ३५०पेक्षा जास्त धावांचा यशस्वी पाठलाग एखादा संघ सहज करु शकतो हे दक्षिण आफ्रिका संघाने दाखवून दिले. हे टी-२० सामन्यांच्या वाढत्या संख्येमुळे शक्य होऊ लागले आहे. तिसऱ्या सामन्यात मात्र भारताने १० षटके आणि ९ गडी राखून सहज विजय संपादन केला. सलामीवीर यशस्वी जैस्वालचे वन डे सामन्यातील पहिले शतक. माजी कर्णधार रोहित, विराटची अर्धशतके तसेच कृष्णा, यादवचे प्रत्येकी ४ बळी यांच्या सुरेख कामगिरीमुळे भारताने ही लढत जिंकली. तब्बल २० सामन्यांत नाणेफेक गमावल्यानंतर भारताने शेवटच्या सामन्यात महत्त्वाची नाणेफेक जिंकून आपली विजयी नौका सुखरुप किनाऱ्याला लावली. कप्तान राहुलने तिसऱ्या सामन्यात चक्क डाव्या हाताने नाणेफेक केली आणि मग नशिबाची साथदेखील राहुलला मिळाली.

सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे दुसरे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील गोलंदाजांना दवाचा त्रास होता. चेंडू सारखा ओलसर होत असल्यामुळे त्यावर पकड घेणे कठिण जाते. तसेच क्षेत्ररक्षकांना सफाईदारपणे क्षेत्ररक्षण करणे जमत नाही. मात्र फलंदाजांना फलंदाजी करणे काहीसे सोपे जाते. हे चित्र मालिकेत तीनही सामन्यात बघायला मिळाले. रोहित, विराटने आपल्या चमकदार फलंदाजीचा ठसा या मालिकेवर उमटवून अद्याप आम्ही संपलेलो नाही. “बचेंगे तो और भी लढेंगे” हा जणू काही इशारा निवड समितीला दिला. कारण अगोदरच्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यात वनडे मालिकेत रोहित, विराट फारसे चमक दाखवू शकले नव्हते. त्यामुळे दक्षिण आफ्रिका वनडे मालिका या दोघांसाठी खूप महत्त्वाची होती. विराटने तर या मालिकेत अप्रतिम फलंदाजीचा नजराणा पेश केला. त्याने आफ्रिका गोलंदाजीवर चांगलीच हुकूमत गाजवली. विराटने जणू काही नव्याने कात टाकली आहे की काय अशीच त्याची फलंदाजी बघून वाटत होते. रोहितनेदेखील त्याला साजेशी झकास फलंदाजी केली. परंतु मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि विराट या दोघांतून विस्तव जात नाही हेपण परत एकदा बघायला मिळाले.

जैस्वाल‌ आणि ऋतुराज गायकवाडने मिळालेल्या संधीचे सोने केले. आता भविष्यात या दोघांकडुन सातत्यपूर्ण चांगल्या कामगिरीची अपेक्षा संघ व्यवस्थापन बाळगून असेल. फिरकी माऱ्यासमोर आफ्रिकन फलंदाज फारसे चमक दाखवत नाहीत, याचाच प्रत्यय या मालिकेत आला. कुलदीप यादवच्या सुरेख फिरकी माऱ्यासमोर त्यांच्या फलंदाजांनी कच खाल्ली. तरीदेखील‌ दक्षिण आफ्रिका संघाने भारताला दिलेली झुंज कौतुकास्पद होती. कसोटी मालिकेतील पराभवामुळे भारताला हा विजय मनोबल वाढवण्यासाठी नक्की मदत करेल. गेलेला आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी उपयुक्त ठरेल. आता गिल, बुमराह, सिराज, हार्दिक, पंत हे भारतीय संघात परतल्यानंतर संघ निवड कशी करायची हा मोठा प्रश्न निवड समिती आणि संघ व्यवस्थापनासमोर असेल. आता उभय संघात पाच सामन्यांची टी-२० मालिका रंगत आहे. त्यातदेखील भारत बाजी मारतो का दक्षिण आफ्रिका वनडे मालिकेतील पराभवाचा बदला घेणार याची उत्सुकता आता दोन्ही देशांच्या क्रिकेटप्रेमीमध्ये आहे.

Continue reading

भारतीय फुटबॉल महासंघाचे पदाधिकारी फक्त खुर्चीच्या राजकारणात!

‌विश्व चषक फुटबाॅल स्पर्धेसाठी अवघ्या दीड लाखाची लोकसंख्या असलेला कुराकाओ हा छोटा देश पात्र ठरतो आणि या स्पर्धेच्या इतिहासात नव्या विक्रमाला गवसणी घालतो. त्याउलट आज महासत्तेकडे झेप घेण्याची स्वप्न बघणारा जगातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असणारा भारताचा फुटबाॅल संघ २०२६मध्ये...

वाढलेल्या गवतामुळे ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाला ८० कोटींचा फटका!

कसोटी क्रिकेट विश्वात १०० वर्षांपेक्षा जास्त काळाचा मोठा इतिहास असलेल्या प्रतिष्ठेच्या इंग्लंड, ऑस्ट्रेलिया संघात ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या ५ सामन्यांच्या अॅशेस मालिकेत जगप्रसिद्ध मेलबर्न स्टेडियममध्ये झालेला चौथा कसोटी सामना अवघ्या दोन दिवसात संपला आणि क्रिकेटविश्वात कसोटी‌ सामन्यांच्या भवितव्याबाबत चर्चा सुरु...

.. आणि भारतीय स्क्वॉश संघाने घातली विश्वविजेतेपदाला गवसणी

चेन्नई येथे आपल्या घरच्या मैदानावर झालेल्या जागतिक स्क्वॉश स्पर्धेत यजमान भारतीय संघाने आपली आजवरची सर्वोत्तम कामगिरी करताना चक्क विश्वचषकाला पहिल्यांदा गवसणी घालून एकच खळबळ माजवली. याअगोदर या स्पर्धेत भारताची मजल कांस्यपदकाच्या पुढे कधी गेली नव्हती. भारताने यंदा पहिल्यांदाच या...
Skip to content