Homeब्लॅक अँड व्हाईटअली सरदार जाफरी,...

अली सरदार जाफरी, यांच्या आठवणी दाटतात तेव्हा…

तुम आओ गुलशन ए लाहोर से चमन बरदोश
हम आये सुबह ए बनारस की रौशनी लेकर
हिमालय की हवाओं की ताझगी लेकर
फिर इस के बाद ये पूछें की कौन दुश्मन है?
दिवंगत अटल बिहारी वाजपेयी भारताचे पंतप्रधान असताना त्यांनी भारत-पाकिस्तान मैत्रीचे संबंध वाढविण्यासाठी अमृतसर ते लाहोर अशी बससेवा सुरू केली होती. तिचा प्रारंभ वाजपेयी यांनी १९ फेब्रुवारी १९९९ रोजी स्वतः त्या बसने लाहोरपर्यंत प्रवास करून केला होता. कविमनाच्या अटलजींनी त्या बसवर प्रातिनिधीक स्वरूपाची एक कविता लिहिण्याचे आदेश आपल्या परराष्ट्र खात्याला दिले होते. तीच कविता मी या लेखाच्या सुरूवातीला उद्धृत केली आहे. या कवितेचे कर्ते होते, अली सरदार जाफरी! वाजपेयीजींनी जाफरीसाहेबांना त्या बसमधून येण्यासाठी आवर्जून निमंत्रण दिले होते. पण आजारपणामुळे ते जाऊ शकले नाहीत. जाफरीसाहेबही काही साधीसुधी असामी नव्हती. स्वातंत्र्यलढ्यातील सक्रीय सहभाग, त्यानंतर तुरुंगवास, महान उर्दू कवी, सिद्धहस्त लेखक, उत्तम वक्ता, तळमळीचा सामाजिक कार्यकर्ता, कडवा कम्युनिस्ट, ज्ञानपीठ, पद्मश्री यासारख्या विविध पुरस्कारांनी सन्मानित, प्रामाणिक निधर्मवादी अशी त्यांची विशाल ओळख होती. समाजात, साहित्य क्षेत्रात, राजकीय वर्तुळात, सिनेसृष्टीत त्यांचे मानाचे स्थान होते. अशा या आदरणीय व्यक्तिमत्वाचा २९ नोव्हेंबर हा जन्मदिवस! त्यांचा जन्म १९१३ सालचा! नुकताच त्यांचा वाढदिवस झाला. त्यामुळे जाफरीसाहेबांच्या आठवणी जाग्या झाल्या..

माणसाच्या आयुष्यात अनेक घटना कळतनकळत घडत असतात. त्यातील काही सुखकारक तर काही कटू असल्या तरी त्यापैकी थोड्याच आठवणी म्हणून आपल्या मनात घर करून असतात. माझ्या मनात कायम असलेले अली सरदार जाफरी हे त्यापैकीच एक! पत्रकारितेच्या माझ्या गेल्या एकोणपन्नास वर्षांच्या कालखंडात यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, एस. एम. जोशी, बाळासाहेब ठाकरे, अण्णासाहेब पाटील यांच्यासारख्या अनेक उत्तुंग आणि थोर व्यक्तिमत्वांच्या सान्निध्यात मला जाता आले. त्यात अली सरदार जाफरी यांचाही समावेश मला करावा लागेल. सरदार जाफरी हे एक थोर व्यक्तिमत्व होतं यात वाद नाही. त्यांच्याशी जुळलेले अनेक वर्षांचे कौटुंबिक नाते हा आमच्या परिवाराच्या दृष्टीने एक संस्मरणीय ठेवा आहे!
अली सरदार जाफरी यांची ओळख अनपेक्षितपणे झाली. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्त्येनंतर माझ्या पत्नीने, चंद्रकला हिने इंदिराजींची काही तैलचित्रे तयार करून त्यांचे प्रदर्शन मुंबईतील मंत्रालयासमोरच्या सचिवालय जिमखान्यात आयोजित केले होते. त्या प्रदर्शनाच्या उद्घाटन संमारंभाची बातमी वाचून ते प्रदर्शन पाहण्यासाठी अली सरदार जाफरी तेथे आले होते. त्यावेळी त्यांनी ते प्रदर्शन मुंबईतील “सोव्हिएट कल्चरल सेंटर”मध्ये पुन्हा प्रदर्शित करावे अशी सूचना केली. त्यावेळी एकसंघ असलेल्या सोव्हिएट रशियाच्या मुंबईतील राजदूतांच्या कार्यालयाच्या इमारतीमध्ये हे सोव्हिएट कल्चरल सेंटर होते. अली सरदार जाफरी यांनी त्यासाठी स्वतःहून पुढाकार घेऊन संबंधितांना सोव्हिएट कल्चरल सेंटरमध्ये सदर प्रदर्शन आयोजित करायला लावले. या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला जाफरीसाहेब जातीने उपस्थितही राहिले. यादरम्यानआम्हा उभयतांचा त्यांच्याशी परिचय झाला आणि त्याचे रूपांतर एका कौटुंबिक नात्यात कधी झाले ते कळलेच नाही.

अली सरदार जाफरी मलबार हिल-केम्पस् कॉर्नर परिसरातील पारशी जनरल हॉस्पिटलच्या शेजारच्या इमारतीमध्ये राहत. आमचे त्यांच्याकडे नेहमी जाणे होई. अनेकदा काही कौटुंबिक समारंभानिमित्त, त्यांच्याकडे कोणी महत्त्वाची व्यक्ती येणार असेल तर, किंवा त्यांचे एखादे महत्त्वाचे काम असेल तर त्यांचे आम्हाला बोलावणे येई. अली सरदार जाफरी यांच्या प्रत्येक वाढदिवसाला आम्ही त्यांना फोन करून किंवा प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन शुभेच्छा देत असू. एका वाढदिवशी सकाळीच त्यांचाच मला फोन आला. ते म्हणाले की, “आज रात को आप सब लोक मेरे घर खाना खाने आना.” वास्तविक त्यांनी आम्हा उभयतांना जेवायला बोलावले होते. परंतु काही कारणास्तव मला तेथे एकट्याला जावे लागले. त्यांच्या घरी जायला मला थोडा उशीर झाला होता. मी त्यांच्या घरी गेलो, तेव्हा ते माझी वाट पाहत असल्याचे आढळले. ते त्यांच्या बेडरूममध्ये नेहमीच्या कॉटवर बसले होते आणि समोर तीन व्यक्ती त्यांच्याशी जोरदार गप्पा मारत होत्या. त्या तीन दिग्गज व्यक्ती होत्या- कैफी आजमी, ए. के. हंगल आणि हरिवंशराय बच्चन! या सर्व थोर दिग्गज मंडळींना बघताच मला फार मोठा सुखद धक्का बसला. मला पाहताच जाफरीसाहेब म्हणाले, “कितना देर किया, अभी ये ग्लास उठाओ आणि पेग भरो।” आणि त्या तिघांना म्हणाले, “ये मेरा आज का स्पेशल गेस्ट है।” मग त्यांनी माझी त्या तिघांना ओळख करून दिली. त्यानंतर ती बर्थडे पार्टी रात्री १० वाजेपर्यंत सुरू होती. त्यात त्या तिघांकडून साहित्यिक, कवि संमेलने, राजकीय क्षेत्र, सिनेसृष्टी अशा विविध आठवणींचा मागोवा घेतला जात होता. मी फक्त ऐकण्याचे काम करीत होतो आणि क्षणाक्षणाला तृप्त होत होतो. ती आनंददायी संध्याकाळ मी कधीच विसरू शकणार नाही.

जाफरीसाहेबांची पत्नी सुलतानादेखील एक प्रेमळ व्यक्तिमत्व होतं. ती अप्रतिम स्वयंपाक करायची. उत्कृष्ट बिर्यानी बनवायची. तसेच ती एकेकाळी गाजलेली बॅडमिंटनपटू होती. तिच्याशिवाय जाफरीसाहेबांचे पानदेखील हलत नसे. थोड्या थोड्या वेळाने ते आपल्या पत्नीला हाका मारीत असत आणि सुलतानादेखील त्यांच्याजवळ येऊन हसतहसत आपली नाराजी व्यक्त करीत असे. ते पाहायला गंमत वाटे. आम्ही १९८६मध्ये मुलुंडला नवीन जागा घेतली हे जेव्हा जाफरीसाहेबांना समजले, तेव्हा त्यांनी ती जागा बघण्यासाठी मुलुंडला येण्याची इच्छा व्यक्त केली. मग आम्ही त्यासाठी एक दिवस निश्चित केला. त्यादिवशी मी त्यांना आणण्यासाठी त्यांच्या घरी गेलो. सोबत माझे दोघे मित्र होते, बाबा पगार आणि कोल्हापूरचे नाना पालकर. दोघांचा मुक्काम त्यावेळी दक्षिण मुंबईत होता. त्यांना सोबत घेतले म्हणजे परतीच्या प्रवासात ते जाफरीसाहेबांबरोबर येऊ शकतील आणि त्याकरीता मला मुलुंडहून मुद्दाम यायला नको. आम्ही तिघे त्यांच्या घरी गेलो, तेव्हा जाफरीसाहेबांनी वाहन आणले आहे का, असा प्रश्न केला. मी म्हणालो, टॅक्सी करून जायचे आहे. तेव्हा ते म्हणाले, “टॅक्सी की जरूरत नही।” आणि ते आपल्या खोलीत गेले. बाहेर आले तेव्हा त्यांच्यापाशी एक मोठे ओळखपत्र होते. ते म्हणाले, “यह मेरा रेल्वे का पास है। फ्रिडम फायटर होते हुए मुझे सरकारने दिया है, मगर अभी तक मैने इसको देखा भी नही था। आज इसका उपयोग करेंगे।” मी नको, नको म्हटले तरी जाफरीसाहेबांनी मला टॅक्सी करू दिली नाही आणि रेल्वेने जाण्याचा आपला हट्ट सोडला नाही. मग आम्ही बोरीबंदर स्टेशनवर आलो तेव्हा त्यांनी आम्हाला स्टेशन मास्टरकडे नेले. त्यादरम्यान जाफरीसाहेबांची एक ऐतिहासिक मालिका दूरदर्शनवर सुरू होती. त्यावेळी इतर खाजगी चॅनेल्स अस्तित्त्वात नव्हती आणि जाफरीसाहेबांची ती मालिका खूपच गाजली होती. त्यांना पाहताच स्टेशन मास्टर उठून उभा राहिला आणि त्याने जे काही सोपस्कार होते ते पूर्ण करून दिले. त्यानंतर आम्ही ठाणे लोकल पकडण्यासाठी फलाटावर आलो, तर जाफरीसाहेबांच्या मागे लोकांची ही झुंबड उडाली होती. आम्ही जाफरीसाहेबांना फर्स्ट क्लासमध्ये बसण्याचा आग्रह केला, पण ते आमच्यासोबत सेकंड क्लासमध्येच आले. तेथेही डब्यात लोकांनी त्यांच्या बाजूला मोठी गर्दी केली. अनेक जणांनी त्यांची स्वाक्षरी घेतली. बोरीबंदर ते मुलुंड हा प्रवास संपूर्ण गडबडीत गेला. माझी जागा चौथ्या माळ्यावर आहे आणि लिफ्ट नाही. ते तेवढे मजले चढून वर आले. आम्ही त्यांच्यासाठी “ब्लॅक लेबल” आणि खाण्याचा उत्तम बेत केला होता. त्यांनी खूप मस्त गझला आणि कविता सुनावल्या. छानपैकी मैफल जमली.

जाफरीसाहेबांना ५ जून १९९८ रोजी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळाला त्याच्याही काही आठवणी मनोरंजक आहेत. जाफरीसाहेब ही व्यक्ती कशानेही हुरहळून जाणारी नव्हती. ज्ञानपीठ पुरस्काराच्या बाबतीतही तसेच घडले. त्यांना त्याचे काही अप्रूप वाटले नाही. बातमी कळताच आम्ही त्यांचे फोनवर अभिनंदन केले आणि संध्याकाळी भेटायला येतो असे सांगितले. ते म्हणाले, “अवार्ड मिला यह ठीक है, मगर आज मत आना। कल सुबह तुम दोनो बराबर ग्यारा बजे आना। कुछ इंपॉर्टंट काम है।” त्याप्रमाणे आम्ही त्यांच्याकडे गेलो. तिथे तीन-चार जण आधीच येऊन बसले होते आणि जाफरीसाहेब आमची वाट बघत होते. आम्ही त्यांच्याजवळ पोहोचताच, त्यांनी त्यातील एकाला चंद्रकलाची ओळख करून दिली. ते म्हणाले, “ये मेरी बेटी है। वो मेरी तस्वीर निकालेगी और वह तस्वीरही हर जगह आनी चाहिये।” विषय असा होता, ती मंडळी साहित्य अकादमीकडून दिल्लीहून आली होती. साहित्य अकादमी प्रत्येक ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त व्यक्तीचे, तिच्या कामाचे डॉक्युमेंटेशन करते. त्यासाठी त्या व्यक्तीचे एक छायाचित्र काढले जाते आणि ते छायाचित्र संबंधिताला प्रदान करण्यात येणाऱ्या ट्रॉफीसह, स्मरणिका, परिचयपत्र, सर्व भाषांतील पुस्तिका आदी विविध साहित्यावर छापण्यात येते. जाफरीसाहेबांबद्दलची सर्व माहिती घेण्यासाठी आणि छायाचित्र काढण्यासाठी साहित्य अकादमीची ती मंडळी त्यांच्याकडे आली होती. जाफरीसाहेबांनी त्यांना छायाचित्र काढू दिले नाही. त्यांना त्यांच्या आवडत्या छायाचित्रावरून तैलचित्र तयार करून त्याच्या प्रती साहित्य अकादमीला द्यायच्या होत्या. त्यासाठी त्यांनी चंद्रकलाला बोलावले होते. तैलचित्र तयार करण्याच्या कामाला चार-पाच दिवस तर नक्कीच लागणार होते. त्यांनी त्या मंडळींना पुढच्या आठवड्यात यायला सांगितले. त्यामुळे आतून चिडलेली ती मंडळी त्यांचा राग जाफरीसाहेबांसमोर बाहेर काढू शकली नाहीत. पण त्यांनी त्यांची नाराजी आमच्याजवळ व्यक्त केली. मात्र आमच्याकडे त्यावर काही उपाय नव्हता.

ती मंडळी जाताच जाफरीसाहेबांनी त्यांच्या कपाटातून “डेक्कन हेरॉल्ड” या हैदराबाद येथून प्रसिद्ध झालेल्या वृत्तपत्राचा एक अंक काढला. त्यात जाफरीसाहेबांची मुलाखत प्रसिद्ध झाली होती. त्या मुलाखतीसोबत डेक्कन हेरॉल्डच्या छायाचित्रकाराने काढलेले त्यांचे ब्लॅक ऍन्ड व्हाईट छायाचित्र त्यांनी चंद्रकलाला दाखविले आणि त्यावरून तैलचित्र काढायला सांगितले. ते त्यांचे आवडते छायाचित्र होते. त्या छायाचित्रावरून तयार केलेले तैलचित्र जाफरीसाहेबांना खूप आवडले. त्यांनी त्या तैलचित्राची छायाचित्रे काढून घेतली आणि ती साहित्य अकादमीकडे पाठवून दिली. जाफरीसाहेबांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करताना वितरित झालेल्या सर्व साहित्यावर तेच छायाचित्र वापरले गेले. ते या लेखासोबत मी जोडले आहे. हे तैलचित्र बघायला त्यांनी त्यांचे मित्र सुप्रसिद्ध अभिनेते ए. के. हंगल यांना ताबडतोब बोलावून घेतले. विशेष म्हणजे डेक्कन हेरॉल्डचा सदर अंक आजही आमच्या संग्रही आहे. ज्ञानपीठ पुरस्कारवितरणाचा समारंभ झाल्यावर मुंबईला परतलेल्या जाफरीसाहेबांना भेटायला आम्ही त्यांच्या घरी गेलो. त्यांची ट्रॉफी बघायची इच्छा आम्ही व्यक्त केली. त्यावेळी त्यांना ती शोधावी लागली. “यहाँ कहा रखी थी”, असे म्हणत त्यांनी सुलतानाला हाका मारायला सुरूवात केली. सुलतानाने शोधल्यावर तिला ती जाफरीसाहेबांच्या पुस्तकांच्या गठ्ठ्याखाली सापडली. इतका हा माणूस साधा होता.

भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान सलोखा व्हावा यासाठी जाफरीसाहेब आयुष्यभर प्रयत्नशील राहिले. त्यांची या लेखाच्या सुरूवातीला दिलेल्या काव्यपंक्ती या त्यांनी त्यांच्या मताशी सहमत असलेले पाकिस्तानी कवि अहमद फराज यांच्या गझलला भारतातर्फे दिलेल्या पाठींबादर्शक कवितेतील आहेत. त्यांचे भारत-पाकिस्तान यांच्या संदर्भातील विचार ऐकून मी त्यांना एकदा सहज गमतीने म्हणालो की, मला पाकिस्तानात जाऊन तेथील लोकांशी बोलायचे आहे. त्यांनी ते गांभीर्याने घेतले. ते म्हणाले की, “तुमको व्हिसा मिलने में दिक्कत आयेगी। मैं एक काम कर सकता हूँ। सुलताना के रिश्तेदारों के यहाँ शादी है, तभी मैं तुम्हारे नाम से एक इंव्हिटेशन मंगवा सकता हूँ। इस कारण से तू अप्लाय कर सकता है।” तसे त्यांनी सुलतानाच्या नातेवाईकांना कळवलेदेखील. पण त्यावेळी दोन्ही देशातील संबंध आजच्या इतकेच ताणले गेल्यामुळे त्या विवाह सोहळ्याला भारतातून कोणीच जाऊ शकणार नव्हते. सुलतानाचे माहेर लाहोरला होते. भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी ती भारतात आली आणि जाफरीसाहेबांशी विवाहबद्ध झाली.

जाफरीसाहेबांची आणखी एक आठवण इथे नमूद करायलाच हवी. मुंबईच्या पूर्व उपनगरात विक्रोळी येथे कन्नमवार नगरात आमचे मित्र मधुकर नार्वेकर यांची एक शैक्षणिक संस्था आहे. त्यांना त्यांच्या संस्थेसाठी काही कॉम्प्युटरची आवश्यक होती. पण त्यांच्याकडे आवश्यक तेवढा निधी नव्हता. ते एकदा माझ्याकडे आले आणि म्हणाले की, एखाद्या खासदाराच्या निधीतून हे काम करता येईल. प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमी तेव्हा राज्यसभेच्या नियुक्त खासदार होत्या. मात्र त्यांच्या खासदारनिधीचा त्यांनी कधीच उपयोग केला नव्हता. ही बाब नार्वेकर यांनी माझ्या नजरेस आणून दिली. मी त्यांना जाफरीसाहेबांकडे घेऊन गेलो आणि जाफरीसाहेबांना सर्व परिस्थिती समजावून सांगितली. सोबत शबाना आझमी यांच्या नावे पत्रही नेले होते. जाफरीसाहेबांनी लगेचच शबाना आझमी यांना फोन लावला. सुदैवाने त्या घरी फोनवर सापडल्या. जाफरीसाहेब शबाना यांना म्हणाले की, मी एक पत्र घेऊन तुझ्याकडे माणूस पाठवतो आहे. ते काम तू माझे समजून केले पाहिजेस. त्यानंतर जाफरीसाहेबांनी आपले स्वतःचे पत्र जोडून नार्वेकर यांना शबानाकडे जायला सांगितले. दहा-पंधरा दिवसांनी शबाना आझमी यांचा मला घरी फोन आला. त्या खूप चिडल्या होत्या. त्या म्हणाल्या, तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक असलेली कागदपत्रे अर्जासोबत दिलेली नाहीत, आणि जाफरीसाहेब एकसारखे फोन करून कामाचे काय झाले असं मला विचारत आहेत. मी शबानांना “सॉरी” म्हटले आणि नार्वेकरांना आवश्यक ती कागदपत्रे घेऊन पुन्हा शबानांकडे पाठविले. त्या कामात जाफरीसाहेबांनी खूप लक्ष घातल्यामुळे नार्वेकरांच्या संस्थेची कॉम्प्युटर लॅब उभारली गेली. या लॅबचे उद्घाटन जाफरीसाहेबांच्याच हस्ते करण्याचे आम्ही ठरविले होते. पण संस्थेकडून तसे झाले नाही. त्यानंतर जाफरीसाहेबांच्या पश्चात त्यांचे नाव त्या लॅबला द्यावे अशी सूचना मी केली, पण ती अद्याप प्रत्यक्षात मात्र आलेली नाही.

जाफरीसाहेबांचा अधूनमधून फोन येत असे. त्यांच्या तब्येतीच्याही काही कुरबुऱ्या सुरू असत. अशावेळी सुलताना आम्हाला दोघांना बोलावून घेई. आमच्या मुलाच्या जन्मानंतर एक-दोन वेळा त्यांची तब्येत बरी नसताना त्यांनी स्वतःहून आम्हाला बोलावून घेतले. विशेषम्हणजे, “साथ में बेटे कोभी लाना”, असे सांगायला ते विसरले नाहीत. आम्ही भेटलो की ते खूष होत असत. एकेदिवशी सुलतानाचा अचानक फोन आला. “जाफरीसाब बॉम्बे हॉस्पिटल में सिरियस है और चंद्रकला की याद करते है। आप आजही आके उनको मिलो।” आम्ही संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये गेलो, तेव्हा त्यांना कॉरिडॉरमध्ये व्हिलचेअरवर मोकळ्या हवेत फिरविले जात होते. पण ते बेशुध्दावस्थेत होते. आम्ही जाताच सुलतानाने त्यांच्या गालावर हात मारून त्यांना जागे करण्याचा खूप प्रयत्न केला. “जाफरीसाब, चंद्रकला आयी है, देखो तो।” अशी सुलताना सारखी म्हणत होती. पण जाफरीसाहेब निद्राधीन होते. तीच त्यांची अखेरची अबोल भेट मनाला खूप अस्वस्थ करून गेली. दुसऱ्याच दिवशी हा आम्हाला जीव लावणारा माणूस हे जग सोडून गेला. तो दिवस होता एक ऑगस्ट २०००….

(लेखक महाराष्ट्र वृत्त सेवाचे मुख्य संपादक आणि मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष आहेत.)

Continue reading

समाधान मिळवणे हा वाढत्या आत्महत्त्येवरचा प्रभावी उपाय!

पुणे येथील वैष्णवी हगवणे आणि त्यापाठोपाठ सातारा जिल्ह्यातील फलटण येथील आरोग्य केंद्रामधील डॉ. संपदा मुंडे हिच्या आत्महत्त्येचे प्रकरण गेले तीन महिने देशभरात गाजत असतानाच आता पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जे याची पत्नी डॉ. गौरी पालवे, त्याचबरोबरीने समाजमाध्यमांवर गाजत...

मुंबई ते लंडन वाया वस्त्रहरण!

गंगाराम गवाणकर यांनी जागतिक रंगमंचावरून नुकतीच एक्झिट घेतली. कालचक्र कोणाला थांबविता येत नाही. गवाणकर गेले काही दिवस मुंबईत बोरीवलीतल्या रुग्णालयात मृत्यूची झुंज देत होते. जीवनभर परिस्थितीशी अनेक संघर्ष करीत राहिलेल्या गवाणकर यांचा अखेरचा संघर्ष अखेर संपला. मात्र जाताना गंगाराम...
Skip to content