महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडू प्रतिका रावत, स्नेह राणा आणि रेणुका सिंह ठाकूर यांना भारतीय रेल्वेकडून विशेष कार्य अधिकारी (क्रीडा) या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. या नामवंत महिला क्रिकेटपटूंना, विशेष बाब म्हणून (Out-of-Turn Promotion) पदोन्नती देण्यात आली आहे. या पदोन्नतीच्या माध्यमातून रेल्वेने या तीनही महिला क्रिकेटपटूंनी 2025च्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या महिला विश्वचषक स्पर्धेतील, भारताच्या विजयात दिलेले उत्कृष्ट योगदान आणि कामगिरीचा गौरव केला आहे. या तिघींनाही विशेष कार्य अधिकारी (क्रीडा) या गट ब, अधिकारी श्रेणीच्या पदावर पदोन्नती दिली गेली आहे.
या तिन्ही खेळाडूंना सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या वेतन संरचनेनुसार स्तर 8 अंतर्गत गट ब राजपत्रित अधिकाऱ्यांचे वेतन आणि लाभ मिळणार आहेत. रेल्वे क्रीडा प्रोत्साहन मंडळाच्या या उपक्रमातून या महिला क्रिकेटपटूंना आर्थिक सुरक्षेसोबतच, प्रशासकीय जबाबदाऱ्याही सांभाळण्याचा मानही प्राप्त झाला आहे. उत्तर रेल्वेमध्ये वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेली प्रतिका रावतला आता विशेष कार्य अधिकारी (क्रीडा) या गट ब राजपत्रित पदावर पदोन्नती मिळाली आहे. दिल्लीची सलामीची फलंदाज रावतने विश्वचषक स्पर्धेच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले होते. उत्तर रेल्वेमध्ये कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेली रेणुका सिंह ठाकूरलाही आता विशेष कार्य अधिकारी (क्रीडा) या गट ब राजपत्रित पदावर पदोन्नती मिळाली आहे. उजव्या हाताची मध्यम-वेगवान गोलंदाज ठाकूरने महत्त्वाच्या सामन्यांमध्ये निर्णायक गोलंदाजी करून सातत्याने सामना जिंकून देणारी कामगिरी केली आहे. उत्तर रेल्वेमध्येच व्यावसायिक सहतिकीट लिपिक म्हणून कार्यरत असलेली स्नेह राणा आता विशेष कार्य अधिकारी (क्रीडा) या गट ब राजपत्रित पदावर कार्यरत राहील. उत्तराखंडची अष्टपैलू खेळाडू राणाने फलंदाजी आणि गोलंदाजी असे दोन्हीत महत्त्वाचे योगदान दिले आहे.

