मुंबईतल्या सुभाष देसाई लॉ कॉलेजमध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव व न्यायिक अधिकारी पवन तापडिया आणि उत्तर विभाग गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. संविधान दिनानिमित्त कॉलेजतर्फे जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक आहेर, एपीआय सविता कदम आणि सुभाष देसाई लॉ कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या आरती साळुंखे उपस्थित होत्या.
विद्यार्थ्यांना संबोधित करताना सचिव पवन तापडिया यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व व आधुनिक काळातील त्याची प्रासंगिकता यावर प्रकाश टाकला. त्यांनी संवैधानिक नैतिकता, कायद्याचे राज्य आणि लोकशाहीचे संरक्षण यावर भर देत, तरुण विधि विद्यार्थ्यांना त्यांच्या कायदे शिक्षणाद्वारे संवैधानिक मूल्ये अधिक बळकट करण्याचे आवाहन केले. पोलीस निरीक्षक आहेर यांनी सायबर गुन्हे जनजागृतीवर मार्गदर्शन केले. त्यांनी ऑनलाइन धोके, डिजिटल सुरक्षितता, विविध प्रकारचे सायबर गुन्हे आणि त्यासंबंधित कायदेशीर तरतुदी याबद्दल सविस्तर माहिती दिली. एपीआय कदम यांनी प्रत्यक्ष घडलेल्या सायबर गुन्ह्यांची उदाहरणे, तपास प्रक्रिया, तक्रार नोंदविण्याची पद्धत आणि प्रतिबंधात्मक उपाय यांची माहिती देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, ज्यामुळे सायबर सुरक्षिततेबद्दल अधिक जागरूकता निर्माण झाली.
या कार्यक्रमात अंमली पदार्थविरोधी जनजागृती मोहिमेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला कॉलेजचे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी प्रभारी प्राचार्या साळुंखे यांनी सर्व मान्यवरांचे तसेच विधि सेवा प्राधिकरणाचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

