भारतीय राजकारणात डावपेच जाणणारे सर्वात अनुभवी नेते म्हणून शरद पवार यांच्या नावाची सतत चर्चा असते. किंबहुना चर्चेत कसे राहायचे याची कला शरद पवार यांना चांगली अवगत आहे. त्यातही पुण्यात कधी आणि कुठे बोलले की भरपूर प्रसिद्धी मिळते, याचे गणितदेखील पवार यांना अवगत आहे. अनेकदा ते सहज बोलून गेले तरी बातमी होते आणि अनेकदा ते बोलले नाही किंवा बोलण्यास नकार दिला तरी बातमी होते. यावेळी पवार पुण्यात नाही, तर सोलापुरात बोलले. काँग्रेस पक्ष संपणार नाही असे ते म्हणाले. बिहारमध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला. त्यासंदर्भात पवार प्रतिक्रिया व्यक्त करीत होते. काँग्रेस आणि गांधी-नेहरु यांची विचारसरणी हा पवार यांनी केलेला उल्लेख महत्त्वाचा आहे. काँग्रेसने चढउतार बघितले आहेत. पक्ष पुन्हा उभा राहील, असा आत्मविश्वास पवार यांनी व्यक्त केला. पवार यांच्या विधानावर आता विचारमंथन सुरु होईल. पण प्रश्न असा आहे की काँग्रेस संपावी किंवा संपेल असे कोणीच म्हणत नाही. उलट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्ष म्हणजे काँग्रेसच्या संदर्भात असे म्हटले आहे की… कोई तो स्टडी करके आए.. म्हणजे विरोधी पक्ष सक्षम असावा हे पंतप्रधान मोदी यांनादेखील अभिप्रेत आहे.
थोडे मागे जायला हरकत नाही. आज देशात जो काँग्रेस पक्ष आहे तो मूळचा काँग्रेस पक्ष नव्हे. १९६९ आणि १९७८ या दोन वर्षांत काँग्रेस पक्षाचे विभाजन झाले. सध्या जो काँग्रेस पक्ष आहे तो मुख्यतः गांधी घराण्याचा पक्ष आहे. मूळचा काँग्रेस पक्ष जो १९६९मध्ये बंगलोर येथे विभाजित होण्याआधी जो होता तो… विभाजन झाले आणि गायवासरु चिन्ह घेऊन इंदिरा गांधी लोकांसमोर आल्या. वास्तविक जवाहरलाल नेहरु यांच्या निधनानंतर लालबहादूर शास्री पंतप्रधान झाले तो काँग्रेस पक्ष प्रातिनिधिक होता. अनेक उत्तुंग असे नेते पक्षात होते. मोरारजी देसाई हेदेखील नेतृत्त्व करण्यासाठी सज्ज होते. बाबू जगजीवनराम तर जवाहरलाल नेहरु यांच्या पहिल्या हंगामी मंत्रिमंडळातदेखील होते. जवाहरलाल नेहरु यांची इच्छा आपल्या कन्येकडे आपला राजकीय वारसा जावा अशीच होती. त्यासाठी नेहरुंनी कन्या इंदिरा यांना तयार केले होते. जगभर दौरे केले. पक्षाचे अध्यक्षपद दिले. दुर्दैवाने आपल्या हयातीत नेहरुंना आपला वारसा कन्येकडे देता आला नाही. पुढे लालबहादूर शास्त्री यांचे दुर्दैवी निधन झाल्यानंतर काँग्रेसच्या सारीपाटावरील सगळ्या सोंगट्या अस्ताव्यस्त झाल्या. त्याचे परिणाम देशाच्या राजकीय वर्तुळात जाणवू लागले. काँग्रेस नावाच्या झाडाची सालपटे निघू लागली. शरद पवार यांच्याकडे असे एक सालपट काढण्याचे श्रेय जाते.

पवार यांच्या राजकीय डावपेचांचा वेगळा उल्लेख नको, पण काँग्रेस पक्षाची कार्यपद्धती आणि नेते/कार्यकर्ते यांची मानसिकता लक्षात घेतली तर पक्षाची वाटचाल चुकीच्या मार्गाने नेण्याचे खापर पक्षाची रचना आणि मानसिकता यावर फोडणे आवश्यक आहे. राजकीय पक्ष यशस्वी व्हायला हवा असेल तर लीडर आणि केडर यांचा समन्वय साधणे आवश्यक आहे. पण इंदिरा गांधी यांचे राजकीय पटलावर आगमन झाल्यानंतर काँग्रेस पक्षात अघोषित हुकूमशाही निर्माण झाली. इंदिरा गांधी यांची वर्णने करुनकरुन त्यांची वाट लावण्याचे काम खुषमस्करे आणि चमचे यांनी सुरु केले. चौकडी ही संकल्पना त्यातूनच आली. नेतृत्त्व असुरक्षित असते तेव्हा आजूबाजूला अशा लोकांची गरज असते. जो बोलण्यात तरबेज तो पुढेपुढे करण्यात तरबेज होतो. अनेक लोकांना ही कला अवगत असते. त्यातून पक्षश्रेष्ठी ही संकल्पना तयार झाली. माझे एक मित्र जे काँग्रेसचे निरीक्षक म्हणून जिल्ह्याच्या ठिकाणी गेले होते, त्यांना खूष करण्यासाठी त्यांची हत्तीवरुन मिरवणूक काढण्यात आली होती. श्रेष्ठी आले की त्यांची तारांकित व्यवस्था करुन पुढे उमेदवारी वगैरे मिळण्याची सोय करण्याचे कसब काँग्रेसच्या लोकांनी आत्मसात केले. त्याचा परिणाम पुढे पक्ष हळूहळू कमकुवत होण्यात गेला.
गांधी घराणे आणि अवलंबित्व
गांधी घराण्यावर काँग्रेसचे अवलंबित्व ही सगळ्यात मोठी कमकुवत बाजू ठरली. पण भीतीने अन्य कोणी नेतृत्त्व पक्षात उभे राहीना. ज्यांना जमले त्यांनी वेगळे पक्ष काढले. काही यशस्वी झाले. अशा यशस्वी नेत्यांमध्ये शरद पवार आणि ममता बँनर्जी यांचा उल्लेख करता येईल. अनेक राज्यांमध्ये काँग्रेस कमकुवत होत गेली. आज केवळ तीन किंवा चार राज्यांमध्ये काँग्रेस पक्ष उरला आहे. सोनिया गांधी यांनी १९९७/९८मध्ये पक्षाची सूत्रे हाती घेतली खरी. त्यामुळे पक्ष फुटण्याची प्रक्रिया थांबली नाही. पण गांधी वगळता अन्य कोणी नेतृत्त्व पुढे येण्याचा विषय संपला. त्याचवेळी म्हणजे २००४मध्ये भाजपच्या चुकीमुळे काँग्रेस आणि मित्रपक्षांना सत्ता मिळाली. ती २००९मध्ये कायम राहिली. पण २०१४मध्ये आश्वासक पर्याय मिळाला आणि काँग्रेसची परिस्थिती दारुण झाली. त्यानंतर गेल्या अकरा वर्षांमध्ये काँग्रेसने जी वाटचाल केली आहे ती पाहता पुन्हा उभे राहण्याची काँग्रेसला इच्छा आहे किंवा कसे असा प्रश्न निर्माण होतो.

पवार हे काँग्रेसचे नेते नाहीत. त्यांचा पक्षच मुळी वेगळा आहे. असे असूनही पवार यांना काँग्रेस टिकावी किंवा संपणार नाही असे वाटते. यामागे भूमिका काय हे लक्षात येत नाही. चौकातील पोलीस जर सगळीकडे हातवारे करीत असेल तर वाहनचालकांनी कुठे जावे, हे कळत नाही आणि वाहने एकमेकांना धडकतात तसे पवार यांच्या विधानाने होते. काँग्रेस संपेल असे कोणी म्हणत नाही, पण आज ज्या नकारात्मक पद्धतीने पक्ष काम करतो आहे, ते बघितले तर पक्ष खरोखरच पुन्हा कधी उभा राहणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. गांधी-नेहरु यांचा विचार नव्या पिढ्यांना माहिती नाही. तो माहिती व्हावा यासाठी काँग्रेस पक्ष काही करायला तयार आहे, असे दिसत नाही. उलट, केवळ वैयक्तिक द्वेष आणि नको तेवढा आत्मविश्वास यामुळे काँग्रेस पक्ष पछाडलेला आहे. आहे ते नेतृत्त्व प्रभावी नाही आणि नवे नेतृत्त्व तयार करण्याची पक्षाकडे कोणतीही यंत्रणा नाही. पक्षाची बाजू मांडणारे प्रवक्ते अर्धशिक्षित आहेत आणि पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांना नेमके काय म्हणायचे आहे हे माहिती नाही. नव्या खासदारांना संसदीय गोंधळ घालण्यास सांगण्यात येते आणि सरकारच्या विरोधात सतत आक्रमक असा प्रचार करण्याने पक्ष वाढेल ही शक्यता बरीच कमी आहे. काँग्रेस संपणार नाही असे नुसते म्हणून उपयोग काय? जुनी इमारत कोसळू नये म्हणून डागडुजी करावी लागते. दगडविटा बदलाव्या लागतात. नुसते वरवर पाणी मारले तर इमारत लवकर ढासळण्याची भीती असते. काँग्रेस पक्षाची परिस्थिती तशीच आहे. तरीही पवार यांना आशा आहे, हे एक बरे!
संपर्कः 99604 88738

