पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, शनिवारी गुजरातच्या सूरतमधल्या बांधकामाधीन बुलेट ट्रेन स्थानकाला भेट देणार असून मुंबई–अहमदाबाद उच्चगती रेल्वे मार्गिकेच्या (बुलेट ट्रेन) प्रगतीचा आढावा घेणार आहेत. या बुलेट ट्रेनमुळे मुंबई–अहमदाबाद प्रवासाचा कालावधी सुमारे दोन तासांवर येणार आहे.
पंतप्रधान मोदी आज गुजरातला भेट देणार आहेत. सकाळी 10 वाजता ते सूरतमधल्या बांधकामाधीन बुलेट ट्रेन स्थानकाला भेट देऊन मुंबई–अहमदाबाद उच्चगती रेल्वे मार्गिका, या देशातल्या सर्वात महत्त्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतील. हा प्रकल्प भारताच्या उच्च-गती रेल्वे युगातल्या पदार्पणाचे प्रतीक मानला जातो. मुंबई–अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर जवळजवळ 508 किलोमीटर लांबीचा असून त्यापैकी 352 किलोमीटरचा भाग गुजरात आणि केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगरहवेलीमधून जातो. 156 किलोमीटरचा भाग महाराष्ट्रात येतो. हा कॉरिडॉर साबरमती, अहमदाबाद, आनंद, वडोदरा, भरूच, सूरत, बिलीमोरा, वापी, बोईसर, विरार, ठाणे आणि मुंबई अशी महत्त्वाची शहरे जोडणार आहे.
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा वापर करून उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पातला 465 किलोमीटरचा मार्ग (सुमारे 85 टक्के) उड्डाणपुलांवर असणार आहे. त्यामुळे जमिनीचा कमी वापर आणि अधिक सुरक्षितता सुनिश्चित होते. आतापर्यंत 326 किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलांचे काम पूर्ण झाले असून 25पैकी 17 नदीवरील पूल बांधले गेले आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई आणि अहमदाबादमधील प्रवासाचा कालावधी दोन तासांवर येईल. यातून अनेक शहरांमधला प्रवास अधिक वेगवान, सुलभ आणि आरामदायी ठरेल. या बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे व्यवसाय, पर्यटन आणि आर्थिक उलाढालीला चालना मिळेल तसेच संपूर्ण कॉरिडॉर परिसराचा विकास होईल.
सूरत–बिलीमोरा विभाग सुमारे 47 किलोमीटर लांबीचा असून हा विभाग कामाच्या अंतिम टप्प्यात आहे. येथील नागरी बांधकाम आणि ट्रॅक-बेड घालण्याचे काम पूर्ण झाले आहे. सूरत स्थानकाचे डिझाइन शहराच्या जगप्रसिद्ध हिरे उद्योगापासून प्रेरित आहे. यामध्ये सौंदर्य आणि कार्यक्षमतेचा संगम दिसून येतो. प्रवाशांच्या सोयीसाठी प्रशस्त प्रतीक्षालये, स्वच्छतागृहे आणि किरकोळ विक्री केंद्रे, आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या स्थानकाला सूरत मेट्रो, शहर बससेवा आणि रेल्वे नेटवर्कची सुसंगत जोडणी दिली जाणार आहे.

