नेहमीप्रमाणे ठाणे शहरातील कोर्टनाका परिसरात फेरफटका मारून ढोकाळी नाक्यानजिक असलेल्या घरी जायला बस घेतली. तुम्ही विचाराल की तुम्ही दररोज किंवा आलटूनपालटून कोर्टनाक्याला का जाता? उत्तर सोपं आहे. राजकीय नेत्यांच्या पंटर्सची या परिसरात उठबस असते. जिल्हाधिकारी कार्यालय आहे. समोरच जिल्हा न्यायालय आहे. तेथूनच जवळ सरकारी विश्रामधाम आहे. जवळच पोलीस आयुक्तांचे कार्यालय आहे. समोरच्या बाजूस बाबा आदमच्या काळातील गुन्हे शाखेचे कार्यालयही खुणावत असते. जीएसटीचेही कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयाला खेटूनच उभे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनेकांचे श्रद्धास्थान असलेले ‘आनंदाश्रम’ही येथून दहा पावलांवरच आहे.

काही दिवसांपूर्वीच ठाणे महापालिका मुख्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पालिकेच्या एका बड्या अधिकाऱ्याला रांगेहाथ पकडले होते. अगदी दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातही दुसऱ्या मजल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकून दोन अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्याचे समजले. आता नंबर नक्की पोलीस आयुक्त कार्यालयाचाच लागणार अशी दबकी चर्चा कोर्टनाका परिसरात केली जात आहे. पालिकेत एकनाथ शिंदे गटाचे वर्चस्व तर जिल्हाधिकारी कार्यालयात भाजपचे वर्चस्व आहे, असे बोलले जात असून या दोन्ही धाडींना राजकीय किनार असल्याची चर्चा ठाण्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. आता टार्गेट ठाणे पोलीस मुख्यालयाचे म्हणजे थेट गृह मंत्री असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! म्हणूनच की काय जिल्हाधिकारी कार्यालयात पडलेल्या धाडीबाबत कुणीच बोलत नसल्याचे दिसून आले.

बघा कोर्टनाक्याबाबत सांगायला गेलो आणि किती विषयात गुरफटलो! असेच होतं हल्ली.. कुठला विषय कुठे गुंतलेला आढळेल ते सांगता येत नाही. तर कोर्टनाक्याहून निघालो आणि काही औषधे घ्यायची असल्याने काव्याधारा थांब्यावर उतरलो. केमिस्टकडे जाताना एक छोटी, पण देखणी व आलिशान अशी सफेद रंगाची महिंद्राची गाडी दिसली. भाजीवाल्यासमोर दिमाखात उभी होती. मला औषधाची घाई होती. मी झटकन पास झालो. औषधे घेतली व सावकाश परतत असताना मात्र त्या छोट्या गाडीला संपूर्ण न्याहाळले! तो काय आश्चर्य! आधी त्या गाडीची नंबर प्लेटच दिसेना (वयाचा परिणाम!) जरा जवळ गेलो तर फक्त अतिशय छोट्या टाईपातला १०० नंबर दिसला! पण बाकी काहीच नव्हते. ते एम एच वगैरे काही असते ना? ते काहीच नव्हते. आम्ही चाट पडलो खिशात फोन होता. पण ड्राइव्हवरच्या सीटवर कुणीतरी होते. मग म्हटले जाऊ दे.. फोटो काढतेवेळी गाडी अंगावर घातली तर.. (किंवा पोलिसांच्या भाषेत आली असती तर..) म्हणून तो खुळा नाद सोडला.
त्या सुबक गाडीच्या मागे गेलो आणि अहो आश्चर्य पुन्हा त्या गाडीच्या मागील काचेवर हिरव्या रंगाचा देशाची मुद्रा असलेला एक स्टिकर लावलेला दिसला! त्यावर ‘खासदार’ असे लिहिलेले आढळले. ते पाहून माझ्यातील पत्रकार जिवन्त झाला व विचारू लागला की गाडीच्या नंबर प्लेटवरची अक्षरे व क्रमांक तरी ठळक अक्षरात असावेत, असा परिवाहन खात्याचा नियम आहे म्हणे! मनात म्हटले परिवहन खात्याचे असले नियम फक्त सामान्यजनासाठी असतात,’महत्त्वाच्या’ माणसांसाठी नसतात! लोकसभा अध्यक्षांनी स्वतःच्या अधिकारात असे काही नियम केले आहेत किंवा नाहीत याची माहिती जाहीर करण्याची वेळ आली आहे, कारण येत्या काही दिवसात निवडणुकांचे बिगुल वाजणार आहेत. अशा स्टिकरच्या गाड्यांतून कशाचीही वाहतूक केली जाऊ शकते, याची सर्वच राजकीय पक्षांनी नोंद घेणे गरजेचे आहे.

जाता जाता आचार्य अत्रे यांनी केलेले एक काल्पनिक विडंबनकाव्य आठवले…
“आम्ही कोण म्हणुनी काय पुसता दाताडं वेंगाडूंनी|
फोटो पेपरात वा टीव्हीवरी न तुम्ही का अमुचा पाहिला?
चाले ज्यावरती अखंड स्तुतीचा वर्षाव संसदेतुनी!
आम्हाला वगळा गतप्रभ होतील ठाण्यातील दैनिके|
आम्हाला वगळा खलास सगळी होईल धोबी गल्ली व कोपरी|| (आचार्यांची क्षमा मागून)
छायाः प्रवीण वराडकर


आवडला लेख …