केप टाऊन, दक्षिण आफ्रिका येथे झालेल्या इक्विप्ड व क्लासिक जागतिक मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या दत्तात्रय अर्जुन उत्तेकर यांनी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व मास्टर्स-४ (६६ किलो वजनी गट) मध्ये केले. त्यामध्ये त्यांनी इक्विप्ड गटात चार सुवर्णपदके मिळवली. क्लासिक स्पर्धेत त्यांनी एक रौप्य आणि तीन कांस्यपदके प्राप्त केली.
उत्तेकर युनायटेड क्लब व्यायामशाळा, चेंदणी कोळीवाडा, ठाणे येथे अनंत चाळके सरांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात. वयाच्या ७०व्या वर्षी त्यांनी आपली शारीरिक तंदुरुस्ती राखून हे यश संपादन केले आहे. त्यांनी हे यश आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना आणि देशातील नागरिकांना समर्पित केले आहे. या यशाबद्दल संजय सरदेसाई (राज्य संघटना सचिव) यांनी त्याचे खास अभिनंदन केले आहे.
उत्तेकर इंडियन एअर फोर्सच्या सेवेत अधिकारीपदावर कार्यरत असताना त्यांनी आपल्या देशाची सेवा कर्तव्यनिष्ठेने बजावली. कारगिल युद्ध, श्रीलंकेतील शांतता मोहीमेत त्यांचा सहभाग होता. त्यांच्या या सेवेसाठी भारतीय वायुसेनेने त्यांना गौरविले होते. ते लायन्स क्लब व इतर माध्यमांतून समाजसेवेचे काम करत आहेत. ते उच्च विद्याविभूषितही आहेत.