राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी 2026पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश कोर्टाने दिल्यानंतर या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. त्याचबरोबर राजकीय पक्षांनी मोर्चे, आघाडी या पातळीवर बांधणी सुरू केली आहे. महानगरपालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये कोण कोणाशी युती करणार, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. सध्या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उबाठा) हे प्रमुख पक्ष आहेत. त्याचबरोबर शेकापसारखे पक्षही आघाडीसोबत आहेत. महायुतीमध्ये शिवसेना, भारतीय जनता पक्ष, अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस हे प्रमुख पक्ष आहेत. मात्र यावेळी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असे चित्र असणार नाही हे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीमध्ये नव्याने राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना, हा पक्ष सामील होणार का याविषयी अद्यापही शंका आहे. त्यामुळे शिवसेना (उबाठा) आणि राज ठाकरे यांची मनसे हे महाविकास आघाडीतून बाहेर पडून वेगळे लढणार का? याविषयी अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. काँग्रेसनेही मुंबईत तरी स्वतंत्र लढ्याची मानसिकता बनवली आहे. मात्र उद्धव ठाकरे कोणतीही जोखीम घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे राज ठाकरे यांना सोबत घेऊन काँग्रेसही कशी सोबत राहील याकडे त्यांचे बारीक लक्ष आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत अपेक्षित असताना महाविकास आघाडीतून बाहेर पडावे आणि स्वतंत्रपणे निवडणुका लढवाव्यात असा काँग्रेस कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. कारण विधानसभा निवडणुकीत शिवसेना (उबाठा) पक्षाने काँग्रेसच्या जागांवर हक्क सांगितला होता. वर्सोवासारखी काँग्रेसची हक्काची जागा शिवसेनेने काढून घेतली होती. तेथे शिवसेनेचा मुस्लिम उमेदवार निवडून आला. आताही मुस्लिमबहुल भागात शिवसेनेला जास्त रस आहे. मात्र शिवसेना महाविकास आघाडीसोबत राहिल्यास काँग्रेसच्याही जागा खिशात घालण्याची शक्यता आहे. त्यामुळेच काँग्रेस कार्यकर्त्यांना स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. दुसऱ्या बाजूला महायुतीमध्येही फारसे आलबेल नाही. गेल्या महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना एकसंघ असताना ज्या जागांवर निवडणुका लढली त्यासाठी शिवसेनेचा आग्रह असणार आहे. मात्र भाजप 150च्या खाली जागा घेणार नाही. उर्वरित 77 जागा शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. ठाणे महानगरपालिकेत एकनाथ शिंदे यांचा प्रभाव असला तरी यावेळी भाजपने स्वतंत्र लढण्यासाठी फक्त ठाणे महानगरपालिका नव्हे तर पूर्ण ठाणे जिल्ह्यातील महापालिका आणि नगरपालिका स्वतंत्रपणे लढण्याचा आग्रह पक्षश्रेष्ठींकडे धरला आहे. विशेष म्हणजे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अप्रत्यक्षपणे दुजोरा दिला आहे. त्यामुळे ठाणे, भिवंडी, उल्हासनगर आदी महानगरपालिकांमध्ये महायुती कायम राहणार का याविषयी शंका आहे. त्याचबरोबर बदलापूर आणि अंबरनाथ या क्रीम नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू आहे.

ठाणे शहरात भाजप आमदार संजय केळकर आणि बदलापूरमध्ये भाजप आमदार किसन कथोरे, भाजपने स्वतंत्रपणे निवडणुका लढवाव्यात यासाठी विशेष आग्रही आहेत. ‘हम जिनको साथ मे लेते है उनको हजम करते है’ हे भाजपचे ब्रीदवाक्य या निवडणुकांमध्ये खरे ठरणार का? असाही प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. 2024च्या विधानसभा निवडणुकांनंतर शिवसेनेची उपयुक्तता संपली आहे का? असाही एक मोठा प्रश्न पुढे आला आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी सुरू केलेल्या योजना पाठोपाठ बंद केल्यानंतर आता ठाणे जिल्हा हा एकनाथ शिंदे यांचा श्वास समजला जातो. या ठाणे जिल्ह्यातही शिंदेंचे अस्तित्त्व औषधापुरता शिल्लक ठेवावे असा निर्धार भाजपचे ठाणे जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि त्यांना पाठीशी घालणारे पक्षश्रेष्ठी यांनी केल्याचे दिसत आहे.

मुंबईत राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर परिस्थिती शिवसेना (उबाठा) तसेच मनसेसाठी आशादायक असेल असे चित्र सध्या विविध अहवालातून पुढे येत आहे. त्यामुळे भाजप नेते अजिबात निर्धास्त नाहीत. माध्यमांसमोर कितीही बढाया मारल्या तरी ग्राउंडवर परिस्थिती आपल्याला सोयीची नाही हे मुंबई भाजप नेत्यांच्या लक्षात आले आहे. निवडणुकीच्या ऐन तोंडावर भाजपनेही मुंबईत नेतृत्त्वबदल केल्याने त्यांना ही निवडणूक कठीण जाणार आहे असे चित्र आहे. आशिष शेलार यांच्यासारख्या अनुभवी नेत्याला बाजूला सारून अमित साटम यांच्यासारखा नवा युवा चेहरा पुढे आणण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. परंतु हा प्रयत्न फायदेशीर ठरतो की त्यांच्या अंगलट येतो हे येणारा काळच ठरवेल.
संपर्क- 9820355612