विश्वचषक टी-२० क्रिकेट स्पर्धेपाठोपाठ आता युएई येथे झालेल्या आशियाई चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत भारताने जेतेपदावर सहज कब्जा करुन क्रिकेटजगतावर आशियातदेखील आम्हीच राज्य करीत असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारतीय संघ यंदादेखील जिंकणार हे भाकित करायला कोणा ज्योतिषाची गरज नव्हती. कारण, सहभागी झालेल्या एकूण आठ संघात खेळाच्या दोन्ही प्रमुख अंगात, फलंदाजी आणि गोलंदाजीत इतर संघाच्या तुलनेत, सूर्यकुमार यादवचा भारतीय संघ खूप ताकदवान होता. त्यामुळे भारत ही स्पर्धा जिंकला नसता तरच क्रिकेटरसिकांना आश्चर्य वाटले असते. पण तसे झाले नाही. भारताने आपल्या सर्व लढती आरामात जिंकून आपले विक्रमी नववे जेतेपद लीलया पटकावले. गतवर्षी अमेरिकेत झालेली टी-२० विश्वचषक स्पर्धा जिंकल्यानंतर भारताची विजयी दौड जोरात सुरु आहे. आतापर्यंत २३ सामने जिंकताना अवघ्या ३ सामन्यांत भारताने हार स्वीकारली आहे. त्यातच आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला या स्पर्धेत तब्बल तीनवेळा आरामात धोबीपछाड देऊन विजेतेपद मिळवल्याने या जेतेपदाला एक वेगळी किनार आहे.
आशिया खंडातील हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रथमच आमनेसामने आले. १९८४ साली या स्पर्धेला सुरुवात झाली. पण याअगोदर भारत, पाकिस्तान संघात निर्णायक लढत कधी झाली नव्हती. यंदा तो इतिहास लिहीला गेला. एकाच स्पर्धेत पाकिस्तानला सलग तीनवेळा नमवून विजयाची शानदार हॅटट्रिक साधून भारतीय संघाने पहिल्यांदा आगळा पराक्रम केला. अंतिम सामन्यात तिलक वर्माची शानदार फलंदाजी आणि फिरकी गोलंदाज कुलदिप यादवच्या सुरेख गोलंदाजीमुळे भारताने चुरशीच्या लढतीत पाकिस्तानचा ५ गडी आणि २ चेंडू राखून पराभव करत त्यांच्या तिसऱ्या विजेतेपदाचे स्वप्न धुळीस मिळवले. कप्तान यादवने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला पहिली फलंदाजी दिली. फरहान, झमानने त्यांना ८४ धावांची जोरदार सुरूवात करुन दिली. तेव्हा त्यांना प्रथम फलंदाजी देण्याचा निर्णय धोकादायक ठरतोय की काय अशी शंका भारतीय क्रिकेटप्रेमींमध्ये येऊ लागली. पण चांगल्या सुरूवातीचा फायदा पाकिस्तानच्या इतर फंलदांजाना घेता आला नाही. १२ षटकांत १ बाद ११३ धावा अशा सुस्थितीत असलेल्या पाकिस्तानचा डाव नंतर १४६ धावांत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. त्यांचे ९ फंलदाज ३३ धावांत, ३९ चेंडूत माघारी परतले. कुलदिप यादव, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्तीच्या सुरेख फिरकी माऱ्यासमोर पाकिस्तान फलंदाजांनी नांगी टाकली. यादवने अवघ्या ३० धावांत ४ बळी टिपून त्यांची फंलदाजी मोडित काढली. फरहान ५७, झमान ४६, अयुब १४ धावा, या तिघांचा अपवाद वगळता त्यांच्या इतर फंलदाजाना दुहेरी धावसंख्या काढता आली नाही.

१४७ धावांचा पाठलाग करताना भारताची सुरूवात मात्र खराब झाली. शर्मा, गिल, यादव हे तिघेजण अवघ्या काही धावांतच माघारी परतले. पण त्यांनतर तिलक वर्माने ६९ धावांची नाबाद जबरदस्त खेळी करुन भारतीय संघाच्या माथी विजयाचा तिलक लावला. त्याने यष्टिरक्षक संजू सॅमसनसोबत चौथ्या विकेटसाठी ५७ आणि शिवम दुबेसोबत पाचव्या विकेटसाठी ६० धावांची महत्त्वपूर्ण भागिदारी करुन भारताची नौका सुखरुप किनाऱ्याला लावली. शेवटी रिंकू सिंगने चौकार ठोकून भारतीय विजयावर शिक्कामोर्तब केले. स्पर्धेत आतापर्यंत बलाढ्य भारतीय संघाचाच दबदबा राहिला आहे. विक्रमी नऊ वेळा ही स्पर्धा जिंकणारा भारत तीनवेळा उपविजेतादेखील राहिला आहे. त्यावेळी भारताला तीनही वेळा श्रीलंकेकडून हार खावी लागली होती. गेल्या ४१ वर्षांत १८ स्पर्धा झाल्या. त्यात भारताने ९ तर श्रीलंकेने ६ वेळा विजेतेपद मिळवले. पाकिस्तानने दोनवेळा जेतेपद पटकावले.
अ गटात असलेल्या भारताने सलामीच्या लढतीत दुबळ्या युएईचा ९ गडी राखून सहज पराभव करून आपल्या विजयी अभियानाला सुरूवात केली. दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा ७ गडी राखून आरामात पराभव केला. गटातील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात नवख्या ओमान संघाला २७ धावांनी नमविले. अर्धशतकी खेळी करणारा कलिम, मिर्झा जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी करुन ओमानच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या होत्या. पण हे दोघे बाद झाल्यानंतर त्यांची पडझड झाली आणि विजय हुकला. पण ओमानने भारताला दिलेली झुंज कौतुकास्पद होती. ओमानवर विजय मिळवत भारताने स्पर्धेच्या सुपर फोरमधील आपला प्रवेश पक्का केला. सुपर फोरमधील पहिल्या सामन्यात भारताने परत पाकिस्तानवर ६ गडी आणि ७ चेंडू राखून सहज विजय मिळवला. दुसऱ्या लढतीत भारताने बांगलादेशचा ४१ धावांनी आरामात पराभव करून स्पर्धेच्या अंतिम फेरीतील आपला प्रवेश पक्का केला. तिसरा आणि शेवटचा भारत, श्रीलंका मुकाबला चांगलाच रंगला. भारताने सुपर ओवरमध्ये बाजी मारली. श्रीलंकेच्या निशांकाची नाबाद झुंजार शतकी खेळी व्यर्थ ठरली. त्याचे हे टी-२० सामन्यातील पहिलेच शतक होते. युएई, ओमान, हाँककाँग हे तीन संघ लिंबूटिंबूच होते. त्यामुळे खरी स्पर्धा भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश या चार संघातच होती. अपेक्षेप्रमाणे या चार संघांनी स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात सहज प्रवेश केला.

स्पर्धेत फारशा धक्कादायक निकालांची नोंद झाली नाही. बरेच सामने एकतर्फी झाले. सुपर फोरमध्ये बांगलादेशने श्रीलंकेचा पराभव करून आपला पहिल्या टप्प्यात झालेल्या पराभवाचा बदला घेतला. अफगाणिस्तान, बांगलादेशने काहीशी निराशा केली. श्रीलंका संघ पण आता पहिल्याएव्हढा ताकदवान राहिलेला नाही. तेव्हा आशिया खंडात भारत, पाकिस्तान यांचीच ताकद आहे हे पुन्हा एकदा या स्पर्धेने दाखवून दिले. भारतीय विजयात सलामीवीर अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, कुलदिप यादव या तिघांचा मोठा हातभार लागला. अभिषेक, तिलकने सातत्याने झकास फलंदाजी करत धावांचा सतत अभिषेक केला. या दोघांनी २००पेक्षा जास्त धावा काढल्या. या दोघांना अध्येमध्ये दुबे, सॅमसन, गिलची थोडीफार साथ मिळाली. कुलदिप यादवने या स्पर्धेत तब्बल १७ बळी घेऊन गोलंदाजीत मोठी भूमिका बजावली. त्याला अक्षय पटेल, वरुण चक्रवर्तीने चांगली साथ दिली. कप्तान सूर्यकुमार यादव या स्पर्धेत फलंदाजीत साफ अपयशी ठरला. त्याला ७ सामन्यांत अवघ्या ७२ धावा करता आल्या. त्याला एकही अर्धशतकी खेळी करता आली नाही. त्याच्या सर्वाधिक धावा होत्या नाबाद ४७. यादवने त्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध केल्या होत्या. त्याने आपल्या फलंदाजीच्या क्रमवारीत बरेच बदल केले. पण त्याचाही फारसा फायदा यादवला झाला नाही.
भारताने स्पर्धा जिंकली खरी, पण भारताचा क्षेत्ररक्षणाचा दर्जा अंत्यत सुमार होता. बांगलादेशविरुद्ध तर भारतीय क्षेत्ररक्षकांनी तब्बल ५ झेल सोडले. त्यांचा सलामीवीर हसनने या सामन्यात सर्वाधिक ६९ धावा केल्या. त्याचे तब्बल ४ झेल भारतीय क्षेत्ररक्षकांनी सोडले. म्हणजे जणूकाही तो भारतीय क्षेत्ररक्षकांना झेलांचा सराव देत होता असे म्हणावे लागेल. भविष्यात भारतीय संघाने क्षेत्ररक्षणाकडे गांभिर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. शुभमन गिल टी-२० सामन्यासाठी फिट नाही याचादेखील प्रत्यय स्पर्धेत आला. सलामीत फारशी चमक त्याने दाखवली नाही. त्याला सलामीत खेळवण्याचा संघ व्यवस्थापनाचा निर्णय चुकला. त्यामुळे नियमीत सलामीवीर यष्टिरक्षक फटकेबाज फलंदाज संजू सॅमसन बळीचा बकरा झाला. त्याला खाली खेळवल्यामुळे तो फारसा न्याय देऊ शकला नाही. अंतिम सामन्यातील त्याची २४ धावांची खेळी मात्र खूप महत्त्वपूर्ण होती. भारत, पाकिस्तान यांच्यातील सामन्यांच्या वेळी मैदानात आणि मैदानाबाहेर अनेक नाट्यपूर्ण घडामोडी घडल्या. त्या मात्र हा जंटलमन्स खेळाडूंचा खेळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेळासाठी नक्कीच चांगल्या नव्हत्या. त्याचे गालबोट या स्पर्धेला लागले. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांना या विजयाचा खराखुरा आंनद घेता आला नाही. मुळात खेळ आणि युद्ध यांची सांगड घालणे चुकीचे आहे. बीसीसीआयने विजेत्या भारतीय संघासाठी २१ कोटींचे बक्षिस जाहीर केले आहे. या स्पर्धेचा दर्जा पाहता हे बक्षिस जाहीर करणे कितपत योग्य आहे? बीसीसीआयच्या तिजोरीत बक्कळ पैसा आहे म्हणून तो खिरापतीसारखा वाटणे चुकीचे आहे. एरव्ही खेळाडूंना प्रत्येक सामन्यामागे लाखो रुपये मानधन म्हणून मिळतेना..