ठाणे शहरातील सर्व सरकारी व नीमसरकारी यंत्रणानी राममारुती रोडवरील व्यापारी संघ तसेच ठाण्याच्या समस्त व्यापाऱ्यांना राममारुती रोडवरील पदपथ ‘आंदण’ दिलेले आहेत काय? हे जाहीरच करून टाकले तर बरे होईल. कारण, उठसुठ काही नियम आले की बंडाचा झेंडा हातात घेणारे व्यापारी बंधू (?) जनतेच्या हक्काचे असलेले पदपथही मोकळे सोडायला तयार होत नाहीत. देशात वा राज्यात कुठेही रस्त्याच्या दोन्ही बाजूस पार्किंग असतानाही गेले तीन दिवस काही कारणाने राममारुती रोडवर कामानिमित्त येणेजाणे झाले तेव्हा पदपथ गायबच असलेले दिसले. शिवाय कुणीतरी बड्या आसामीने आपल्या पित्याच्या आठवणीसाठी बांधलेल्या इमारतीने तर पदपथ गिळंकृत केलेला दिसला. तेथेच त्यांनी आपल्या गाडीसाठी उतरण्ड तयार केलेले दिसले.

त्याच्यापुढे तर एका दुकानदाराने आपल्या दुकानाची पायरीच पदपथावर आणली आहे. याचा अर्थच या व्यापारी मंडळीचा ‘देवपिता’ कुणी सॉलिड माणूस असणार हे उघडच आहे. कारण महापालिका प्रशासन वा पोलीस / वाहतूक प्रशासनाला न जुमानण्याची हिंमत ‘देवपित्या’शिवाय होणारच नाही.. म्हणजे आता येत्या नववर्षापर्यन्त गोखले रोड, राममारुती रोडवरील वाहतूककोंडीबाबत बोलायलाच नको. आता ठाणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनीच याकडे लक्ष दयावे, असे वाटायला लागले आहे.