Homeपब्लिक फिगरसी.पी. राधाकृष्णन भारताचे...

सी.पी. राधाकृष्णन भारताचे १५वे उपराष्ट्रपती!

महाराष्ट्राचे कालपर्यंतचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज दिल्लीत भारताचे १५वे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधीच्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना अधिकारपदाची तसेच गोपनीयतेची शपथ दिली. शपथविधीनंतर राधाकृष्णन यांनी महात्मा गांधींच्या समाधीला श्रद्धांजली वाहण्यासाठी राजघाटाला भेट दिली. त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना सदैव अटल येथे, पं. दीनदयाळ उपाध्याय यांना दीनदयाळ उपाध्याय मार्ग येथील त्यांच्या स्मृतीस्थळावर आणि माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांना किसान घाट येथे श्रद्धांजली वाहिली.

सी. पी. राधाकृष्णन यांची संक्षिप्त ओळख-

४ मे १९५७ रोजी तिरुप्पूर, तामिळनाडू येथे जन्मलेले चंद्रपुरम पोन्नूसामी राधाकृष्णन यांनी व्यवसाय प्रशासनात बॅचलर पदवी प्राप्त केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून सुरुवात केल्यानंतर, ते १९७४मध्ये भारतीय जनसंघाचे राज्य कार्यकारी समिती सदस्य बनले. सार्वजनिक जीवनात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी वस्त्र निर्यातदार म्हणून दीर्घ आणि यशस्वी कारकीर्द केली होती. १९९६मध्ये राधाकृष्णन यांना तामिळनाडूमध्ये भारतीय जनता पार्टीचे सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले. १९९८मध्ये ते पहिल्यांदा कोइम्बतूर येथून लोकसभेवर निवडून गेले आणि १९९९मध्ये पुन्हा ते निवडून आले. खासदार असताना त्यांनी वस्त्रोद्योगावरील संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. ते सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांवरील संसदीय समिती आणि वित्त सल्लागार समितीचे सदस्यदेखील होते. याव्यतिरिक्त, ते स्टॉक एक्सचेंज घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या संसदीय विशेष समितीचे सदस्य होते. २००४मध्ये राधाकृष्णन यांनी संसदीय शिष्टमंडळाचा भाग म्हणून संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित केले. ते तैवानला गेलेल्या पहिल्या संसदीय शिष्टमंडळाचे सदस्यदेखील होते.

२००४ ते २००७दरम्यान राधाकृष्णन यांनी तामिळनाडूमध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिले. या भूमिकेत त्यांनी ९३ दिवस चालणारी १९ हजार किमीची ‘रथयात्रा’ काढली. सर्व भारतीय नद्या जोडणे, दहशतवादाचे उच्चाटन करणे, समान नागरी कायदा लागू करणे, अस्पृश्यता दूर करणे आणि अंमली पदार्थांच्या धोक्याचा सामना करणे या त्यांच्या मागण्या अधोरेखित करण्यासाठी ही यात्रा आयोजित करण्यात आली होती. त्यांनी वेगवेगळ्या कारणांसाठी दोन अतिरिक्त पदयात्रादेखील आयोजित केल्या. २०१६मध्ये राधाकृष्णन यांना कोची येथील कॉयर बोर्डाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. हे पद त्यांनी चार वर्षे भूषवले. त्यांच्या नेतृत्त्वाखाली, भारतातून कॉयर निर्यात २,५३२ कोटी रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली. २०२० ते २०२२ पर्यंत, ते केरळसाठी भाजपाचे अखिल भारतीय प्रभारी होते.

१८ फेब्रुवारी २०२३ रोजी राधाकृष्णन यांना झारखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांच्या पहिल्या चार महिन्यांत, त्यांनी राज्यातील सर्व २४ जिल्ह्यांचा प्रवास केला. नागरिकांशी आणि जिल्हा अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी तेलंगणाचे राज्यपाल आणि पुद्दुचेरीचे उपराज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभारही सांभाळला. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी राज्यभरात मोठ्या प्रमाणात प्रवास केला. लोकप्रतिनिधी, अधिकारी, व्यावसायिक नेते आणि समाजाच्या विविध घटकांशी संवाद साधला. राधाकृष्णन यांनी उच्च शिक्षणाची गुणवत्ता आणि प्रवेश वाढविण्यात खूप रस घेतला. त्यांनी आदिवासी कल्याणाच्या क्षेत्रात अनेक पावले उचलली. उच्च शिक्षणात त्यांनी सुधारणावर लक्ष केंद्रित केले. त्यांनी महाराष्ट्रातील २९ अनुदानित विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत ‘स्कूल कनेक्ट’ कार्यक्रमाच्या प्रगतीचे बारकाईने निरीक्षण केले. आदिवासी मुली आणि मुलांना उच्च शिक्षण घेण्यास प्रोत्साहित केले. एक उत्साही खेळाडू म्हणून राधाकृष्णन टेबल टेनिसमध्ये महाविद्यालयीन विजेता आणि लांब पल्ल्याचे धावपटू होते. त्यांना क्रिकेट आणि व्हॉलीबॉलचाही छंद होता. त्यांनी अमेरिका, युके, फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन, पोर्तुगाल, नॉर्वे, डेन्मार्क, स्वीडन, फिनलंड, बेल्जियम, हॉलंड, तुर्की, चीन, मलेशिया, सिंगापूर, तैवान, थायलंड, इजिप्त, युएई, बांगलादेश, इंडोनेशिया आणि जपान या देशांनाही भेटी दिल्या आहेत.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content