रमेश सिप्पी दिग्दर्शित “शोले”तील (१९७५) प्रत्येक लहानमोठी व्यक्तीरेखा गाजली. एक सुपरहिट पिक्चर असे बरेच काही देत असतो. आपल्याकडील पब्लिकदेखील पिक्चर असा काही डोक्यावर घेतो की त्यातील छोटी भूमिका साकारणारा कलाकारदेखील त्यांच्या कायमच लक्षात राहतो. “शोले”त अर्धी मूछवाला कैदी बिरबलदेखील असाच कायम लक्षात राहिलाय. आठवला तरी हसू येते ना?
याचे खरे नाव सतेंदरकुमार खोसला. त्याचाच ‘बिरबल’ झाला. त्याने मूळ नावानेच चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले आणि ‘राजा’ (१९६४) चित्रपटातील एका गाण्यात अगदी किरकोळ भूमिका साकारली. अशा पद्धतीने अतिशय किरकोळ, छोट्याछोट्या भूमिका साकारत साकारत हळूहळू वाटचाल करणे, स्टुडिओतून चकरा मारणे, निर्मात्यांच्या कार्यालयातून फेऱ्या मारणे, त्यांना आपले काही फोटो देणे (पूर्वी तशीच पद्धत होती आणि फोटो स्टुडिओत जाऊन फोटो काढणे थोडे महागच होते. काम मिळाले नाही तर दिलेले फोटो वाया जात. मात्र “मिलते रहो” असे हुकमी आश्वासन नक्कीच मिळत असे.)
एकाद्या दृश्यात एखादाजरी संवाद मिळाला तरी दिग्दर्शकाची वाहव्वा करणे असे अनेक कलाकार या चित्रपटसृष्टीतील भटकंतीत पाहयला मिळतात. (एकच डायलॉग असलेली भूमिका संकलनात उडे आणि निराशा वाटेला येई.) तोही एक येथील कामाचाच भाग आहे. (अशा अगणित लहानलहान गोष्टींनीही चित्रपटसृष्टी भरलीय) आणि असे करत असतानाच सतेंदरकुमार खोसलाची भेट पटकथाकार, निर्माता, दिग्दर्शक, गीतकार मनोजकुमारशी झाली. त्याला अशा स्ट्रगलरची मानसिकता, गरजा, धडपड माहित होती. असे संधीसाठी धडपडत असलेले अनेक कलाकार त्याने पाहिलै होते. तेव्हा मनोजकुमार दिग्दर्शनात पाऊल टाकत ‘उपकार’च्या तयारीत होता. अशातच त्याने सतेंदरकुमारच्या चेहर्यावरचे हसू, त्याची एकूणच देहबोली पाहून त्याला नाव दिले, ‘बिरबल’.
‘उपकार’ (१९६७) सुपरहिट ठरला आणि बिरबलची करियर अशाच छोट्याछोट्या भूमिकांनी सुरु झाली. चित्रपती व्ही. शांताराम दिग्दर्शित ‘बूंद जो बन गये मोती’मध्ये लक्षवेधक भूमिका मिळाली. अशी संधी खूप आवश्यक असते. ती आत्मविश्वास वाढवते. बिरबलची अभिनेता म्हणून वाटचाल सुरु झाली आणि २०२२च्या ‘दस नही चालीस’ या चित्रपटांपर्यंत कार्यरत राहिली. टिकून राहणे ही गोष्ट चित्रपटसृष्टीत खूपच महत्त्वाची. ते बिरबलला साध्य झाले. त्याने छोट्याछोट्या भूमिकांचा कंटाळा केला नाही. संयम राखत वाटचाल केली. अखेर वयाच्या ८५व्या वर्षी १२ सप्टेंबर २०२३ रोजी वृद्धापकाळाने बिरबलचे निधन झाले.

“शोले”च्या पन्नाशीनिमित्त त्याचीही आठवण येणे स्वाभाविक आहेच. बिरबलच्या आयुष्याचा फ्लॅशबॅक रंजक आहे. बिरबल दिल्ली विद्यापीठाचा पदवीधर. एकेकाळी बिरबलच्या वडिलांचा पंजाबमधील एका गावात प्रिन्टींग प्रेस होता. पण त्या व्यवसायात न रमता बिरबल अभिनय क्षेत्रात आला. त्याने घेतलेला निर्णय प्रयत्नपूर्वक यशस्वी ठरला. संघर्षातून यश प्राप्त झाले. पण त्यातून बिरबल शिकत गेला. अभिनयाच्या क्षेत्रात, त्यातही चित्रपटसृष्टीत विनोदी कलाकारांचे सर्वात मोठे दुर्दैव असते ते त्यांना कोणीच फारसे गंभीरपणे घेत नाहीत. विनोदी व्यक्तिरेखा साकारणे अगदीच सोपे वाटते. पण प्रत्यक्षात तसे नसते. मला आठवतंय, आपले हुकमी क्राऊडपुलर निर्माता, दिग्दर्शक, अभिनेते दादा कोंडके यांच्या ‘आगे की सोच’ या चित्रपटाचे भोर तालुक्यातील इंगवलीतील दादांच्याच स्टुडिओत शूटिंग असताना मुंबईतील आम्हा काही सिनेपत्रकारांचा शूटिंग रिपोर्टींगसाठी दौरा होता. तेव्हा बिरबल आणि मनमौजी यांची भेट झाली होती. असे अनेक दौरे हितकारक ठरत. अनेकांच्या प्रत्यक्षात लहानमोठ्या भेटीगाठी होतात. दादा ओ. के. असे म्हणताच बिरबल सुखावायचा. आपण चांगला टेक दिल्याचे त्याचे ते समाधान होते. गोष्ट छोटी वाटते, पण खूप महत्त्वाची असते. तो आनंद प्रामाणिक होता आणि तेच त्याचे खरेपण त्याच्याशी बोलताना दिसे.
आपल्यासाठी भूमिका लिहिल्या जात नाहीत. पण आपल्या वाटेला आलेली भूमिका आपण चोख बजावायची हे माझे सूत्र आहे, असे बिरबल म्हणाल्याचे माझ्या कायमच लक्षात राहिलेय. अशा अनेक छोट्याछोट्या कलाकारांसाठी फार कधी भूमिका लिहिल्या जात नाहीत. अनेकदा ऐनवेळी फोन येतो आणि तारख्या उपलब्ध असतील तर काम मिळते ही वस्तुस्थिती आहे आणि ती बदलता येणे शक्यही नाही. ती स्वीकारली तरच निभाव लागेल. वांद्र्यातील मेहबूब स्टुडिओ, अंधेरीतील नटराज स्टुडिओ, गोरेगाव येथील फिल्मीस्तान स्टुडिओ येथे अनेक चित्रपटांच्या मुहूर्तांना हमखास भेटायचा. या चित्रपटात तो असावा असे वाटे. पण ती त्याची सदिच्छा भेट असे, हे लक्षात येई. नवीन चित्रपटाच्या मुहूर्तांना एकाचवेळेस अनेक निर्माता व दिग्दर्शकांना हमखास भेटता येते हादेखील एक फिल्मी रिवाज. असे करतकरत त्याने हिंदी, पंजाबी, भोजपुरी, मराठी या भाषांत मिळून जवळपास साठ वर्षांच्या कारकीर्दीत पाचशे चित्रपटात भूमिका साकारल्या. अर्थात ही संख्या कमीजास्त होईलही. मराठीत वऱ्हाडी झटका, पुणेरी फटका, उपकार दुधाचे या चित्रपटात काम केले. याही भूमिका किरकोळच. पण मुंबईने आपल्याला बरेच काही दिले याची ती एक प्रकारची परतफेड.
शक्ती सामंता दिग्दर्शित ‘अनुरोध’ (१९७६)मध्ये त्याने ड्रग ॲडिक्ट साकारला. याशिवाय दो बदन, आराधना, मेरा नाम जोकर, गॅम्बलर, अमर प्रेम, मेरा गाव मेरा देश, रोटी कपडा और मकान, चरस, अमीर गरीब, विश्वनाथ, कर्ज, क्रांती, सुरमा भोपाली, हम है राही प्यार के, कैदी, कामयाब, याराना, सदमा, चोर के घर चोर, मेरा आशिक, अंजाम अशा अनेक चित्रपटांत भूमिका साकारत वाटचाल केली. एक लक्षात येते की, बिरबलला अनेक बड्या दिग्दर्शकांच्या चित्रपटात भूमिका साकारायला मिळाली. पण त्याचवेळेस प्रश्न असतो की, अशा कलाकारांची तारखांची डायरी कधीच फुल्ल नसते. कधी चार दिवस काम तर कधी दहा दिवस कामाचा शोध. तरीही आपल्या कामाचा भरभरून आनंद घेत घेत आणि तो इतरांना देत देत ते आपली कारकीर्द खुलवतात. एकाद्या इव्हेन्टमध्ये संधी मिळाली की सुखावतात. अधिकाधिक मोकळेपणाने काम करतात, दाद मिळवतात. आपल्या कामाला प्रसिद्धी मिळेल अथवा नाही असा व्यवहार वा आडाखे त्यांच्याकडे नसतात. सुरुवातीस कलेसाठी कला आणि मग जीवनासाठी कला.. अशा वृत्तीने कायमच कामावरचा फोकस ठेवलेल्या पिढीचा बिरबल प्रतिनिधी होता. “शोले”मधली त्याची ती अर्धी मुच्छ डोळ्यासमोर येतेच.. चित्रपटातील मिशी अर्थात मुच्छ यावर फोकस टाकताना शोलेतील अर्धी मिशीवाला बिरबलचा उल्लेख त्यात नक्कीच असणार!