Homeब्लॅक अँड व्हाईटपुन्हा आपटला वेस्टइंडीज...

पुन्हा आपटला वेस्टइंडीज क्रिकेट संघ!

एका जमान्यात क्रिकेटविश्वावर एखाद्या‌ सम्राटाप्रमाणे राज्य करणाऱ्या, बलाढ्य वेस्टइंडीज क्रिकेट संघाची सध्या चांगलीच दाणादाण उडाली आहे. या संघाची कामगिरी दिवसेंदिवस‌ अधिकच खालावत चालली आहे. त्यामुळे‌ या संघाचे चाहते चिंताग्रस्त आहेत. एका जमान्यात वेस्टइंडीज क्रिकेट संघाचा सुवर्णकाळ होता. याच संघाने क्रिकेटविश्वाला एकापेक्षा एक सरस खेळाडू दिले. आक्रमक खेळाची भेट दिली. आग ओकणारे गोलंदाज दिले. फटकेबाज फलंदाज दिले. पण आता वेस्टइंडीज क्रिकेट संघाचा सुवर्णकाळ इतिहासजमा झाला आहे. २०२२-२३मध्ये वेस्टइंडीज क्रिकेट संघाने दुबळ्या झिम्बाब्वेविरुद्ध शेवटची कसोटी मालिका जिंकली. त्यानंतर आतापर्यंत झालेल्या आठ कसोटी मालिकेत त्यांची मालिकाविजयाची पाटी कोरीच राहिली आहे. तीन मालिका त्यांनी अनिर्णित ठेवल्या. पण पाच मालिकांमध्ये वेस्टइंडीज क्रिकेट संघाला पराभवाची कडू चव चाखावी लागली.

नुकत्याच झालेल्या बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत आपल्या घरच्या मैदानावर वेस्टइंडीज क्रिकेट संघावर “व्हाईटवॉश” स्वीकारण्याची नामुष्कीची पाळी आली. शेवटच्या जमैका येथील कसोटीत विजयासाठी त्यांना अवघ्या २०४ धावा करायच्या होत्या. पण अनुभवी ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज स्टार्कच्या अफलातून माऱ्यासमोर‌ त्यांचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे अवघ्या १४.३ षटकांत २७ धावांत कोसळला. कसोटी क्रिकेटमधील ही दुसऱ्या क्रमांकाची निच्चांकी धावसंख्या ठरली. कसोटीत एकाच डावात सर्वात कमी धावसंख्या (२६) न्यूझीलंड क्रिकेट संघाच्या नावावर आहे. तो नकोसा लाजीरवाणा विक्रम वेस्टइंडीजच्या नावे होता होता थोडक्यात राहिला. आपला शंभरावा सामना खेळणाऱ्या स्टार्कने आपल्या पहिल्याच षटकांत त्यांच्या ‌तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. नंतर बोलॅडंरने पुढच्या षटकात हटट्रिक घेऊन त्यांची दाणादाण उडवली. स्टार्कने अवघ्या ९ धावांत ६ बळी घेऊन हा सामना आपल्यासाठी संस्मरणीय केला. वेस्टइंडीजच्या सात फलंदाजांना भोपळादेखील फोडता आला नाही.

कसोटी सामन्यात असा नकोसा विक्रम वेस्टइंडीज क्रिकेट संघाच्या नावे‌ लागला. त्यांच्या जस्टिन ग्रीक्सने‌ एकट्याने सर्वात जास्त अकरा धावा केल्या. दुसऱ्या डावात दोन आकडी धावसंख्या काढणारा जस्टिन त्याचा एकमेव फलंदाज ठरला. पूर्ण मालिकेत सुरेख मारा करणाऱ्या स्टार्कने सामनावीर, मालिकावीर‌ ही दोन्ही पारितोषिके पटकावली. याअगोदर नवख्या अमेरिकन क्रिकेट संघाने त्यांना टी-२० विश्वचषक स्पर्धेतदेखील पराभवाचा धक्का दिला होता. पहिले दोन वन डे विश्वचषक याच वेस्टइंडीज संघाने जिंकले होते. पण याच संघावर काही‌ वर्षांपूर्वी भारतात झालेल्या वन डे विश्वचषक स्पर्धेत मुख्य स्पर्धेत प्रथमच प्रवेश मिळाला नव्हता. आजकाल टी-२० सामन्यातदेखील एव्हढी कमी धावसंख्या कुठला संघ करत नाही. वेस्टइंडीज क्रिकेट संघाच्या या लाजीरवाण्या पराभवामुळे वेस्टइंडीज क्रिकेट मंडळातील पदाधिकाऱ्यांची झोप मात्र उडाली आहे. वेस्टइंडीज संघाची दुबळी फलंदाजी हे त्यांच्या पराभवाचे मोठे कारण आहे. गेली अनेक वर्षं त्यांना चांगले फलंदाज मिळालेच नाहीत. टी-२० सामन्यांची संख्या कमालीची वाढल्यामुळे कसोटीत दीर्घ खेळी करणारे फलंदाज त्यांच्याकडे नाहीत. त्यामुळे अनेकवेळा फलंदाजी कोसळल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागत आहे. हे चित्र अनेक सामन्यात बघायला मिळाले.

अनुभवी खेळाडूंच्या निवृत्तीनंतर त्यांची जागा घेणारे खेळाडू वेस्टइंडीज संघाला मिळाले नाहीत. वेस्टइंडीज क्रिकेट बोर्ड आणि खेळाडूत चांगला सुसवांद नाही. त्यामुळे त्याच्यांत वाद चालूच असतात. वशिल्याच्या खेळाडूंचा संघात सहज शिरकाव होतो. एकदा वेस्टइंडीज क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आला असता याच वादापाई वेस्टइंडीज क्रिकेट संघ दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतला होता. भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफिका या देशांच्या क्रिकेट बोर्डांनी खेळाडूंशी नेहमीच चांगला सवांद ठेवला. त्यामुळे त्या-त्या देशांचे खेळाडू आणि बोर्ड‌ यांच्यांत चांगले‌ नाते निमार्ण झाले. विडींज बोर्ड तिथे कमी पडले. त्यामुळेच‌ विडिंज क्रिकेटची पडझड सुरु झाली. याच मुद्यावरुन विडींजच्या अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी बोर्डाच्या कारभारावर‌ टिकेची झोड उठवलेय. टी-२० लीग आता इतर देशात मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्यामुळे त्यांचे युवा खेळाडू त्या लीगला जास्त प्राध्यान्य देऊ लागलेत. त्यात मिळणाऱ्या भक्कम पैशांमुळे त्यांना देशासाठी खेळण्यात फारसा रस‌ नसतो. त्यामुळेच त्यांच्या काही खेळाडूंनी लहान वयात आंतरराष्ट्रीय सामन्यांना रामराम करुन पूर्णपणे वर्षभर विविध देशात होणाऱ्या टी-२० लीगमध्ये नशीब अजमावयाचे ठरवले.

स्टार खेळाडू निकोलस पुरण आणि अष्टपैलू आंद्रे रसेल यांनी नुकतीच आंतरराष्ट्रीय सामन्यातून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याचाही मोठा फटका वेस्टइंडीज क्रिकेट संघाला‌ बसला आहे. वेस्टइंडीजमध्ये आता क्रिकेट खेळात तेव्हढा पैसादेखील राहिला नाही. त्यामुळे आता युवा क्रिकेटपटू सापडणे त्यांच्यासाठी दुर्मिळ झाले आहेत. एथलेटिक्स, फुटबाॅल, बास्केटबाॅल, गोल्फ, टेनिस या खेळात क्रिकेटच्या तुलनेत रगड पैसा असल्यामुळे त्या खेळाकडे वेस्टइंडीजच्या युवा खेळाडूंचा कल‌ वाढतोय. सद्यस्थितीत वेस्टइंडीज क्रिकेटची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. यातून वेस्टइंडीज क्रिकेट संघाला बाहेर काढण्याचे मोठे आव्हान वेस्टइंडीज क्रिकेट बोर्डासमोर आहे. त्यासाठी वेस्टइंडीज क्रिकेट बोर्डच्या अध्यक्षांनी वेस्टइंडीज क्रिकेट संघाचे माजी कर्णधार क्लाईव्ह लाॅईड, सर व्हिव्हियन रिर्चड, ब्रायन लारा, डेस्मंड हेन्स, शिवनरीन, चंद्रपाॅल यांना खास पाचारण केले आहे. त्यांच्यासोबत बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने बैठक बोलावली आहे. त्यातून काहीतरी चांगला मार्ग निघून वेस्टइंडीज क्रिकेटला परत “अच्छे दिन” येतील, अशी आशा करुया.

1 COMMENT

Comments are closed.

Continue reading

फलंदाजांना झुकते माप देणारे क्रिकेट पंच डिकी बर्ड!

हॅरोल्ड डिकी बर्ड यांच्या निधनामुळे क्रिकेट जगातील एक सर्वोत्तम पंच काळाच्या पडद्याआड गेला आहे. क्रिकेटपटूंना बरीच लोकप्रियता, क्रिकेटचाहत्यांचे भरपtर प्रेम मिळाल्याची अनेक उदाहरणे आहेत. परंतु याच खेळातील एखाद्या पंचाला‌ तेवढीच लोकप्रियता, क्रिकेटरसिकांचे प्रेम मिळाल्याचे‌ एकमेव उदाहरण म्हणजे इंग्लंडचे जगप्रसिद्ध...

आशियाई चषकाने शुभमन गिलवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह!

विश्वचषक टी-२० क्रिकेट स्पर्धेपाठोपाठ आता युएई‌ येथे झालेल्या‌ आशियाई‌ चषक टी-२०‌ क्रिकेट स्पर्धेत‌ भारताने जेतेपदावर सहज कब्जा करुन क्रिकेटजगतावर आशियातदेखील आम्हीच राज्य करीत असल्याचे पुन्हा एकदा दाखवून‌ दिले. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारतीय संघ यंदादेखील जिंकणार हे भाकित करायला कोणा...

अमेरिकन टेनिसमध्ये अरिना, कार्लोसची बाजी!

यंदाच्या शेवटच्या अमेरिकन ग्रॅन्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत महिला गटात बेलारुसच्या २७ वर्षीय अरिना सबालेंकाने आपले जेतेपद राखण्यात यश मिळवले तर पुरुष विभागात स्पेनचा युवा टेनिसपटू २३ वर्षीय कार्लोस अल्कराझने पुन्हा एकदा एका वर्षाच्या अवधीनंतर विजेतेपदाचा चषक उंचावला. या दोघांनी जेतेपदाला गवसणी घालून यंदाच्या...
Skip to content