Homeबॅक पेजइंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत...

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत श्रेयसला डावलल्याचीच चर्चा!

आजपासून यजमान इंग्लंडविरुद्ध सुरु होणाऱ्या ५ सामन्यांच्या तेंडुलकर-अंडरसन चषकासाठीच्या कसोटी मालिकेत शुभमन गिलच्या पाहुण्या भारतीय संघाची खरी कसोटी लागणार आहे, असेच म्हणावे लागेल. कारण, विराट कोहली, रोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन या तीन दिग्गज भारतीय खेळाडूंच्या गैरहजेरीत भारत पहिल्यांदा कसोटी मालिकेत इंग्लंडशी‌ दोन हात करायला मैदानात उतरणार आहे. या तिघांनी कसोटी सामन्यातुन निवृत्ती जाहीर केली आहे. त्यांची उणीव भारताला या मालिकेत चांगलीच जाणवेल ह्यात शंका नाही. तसेच भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह या मालिकेत तीनच सामने खेळणार आहे. नवोदित शुभमन गिलकडे भारतीय संघाच्या भावी संघबांधणीच्या दृष्टीने या दौऱ्यासाठी कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. तसेच संघात बऱ्याच नवोदित खेळाडूंनादेखील संधी देण्यात आली आहे. वाशिंग्टन सुंदरचे सात वर्षांच्या मोठ्या अवधीनंतर कमबॅक झाले आहे. त्याने स्थानिक स्पर्धेत चांगली कामगिरी केल्यामुळे त्याची या दौऱ्यासाठी निवड झाली. मार्च २०१७मध्ये सुंदर शेवटची कसोटी खेळला होता. तो ६ कसोटीत भारतातफे खेळला आहे. त्याच्या नावावर एक त्रिशतक आहे.

मुंबईकर अष्टपैलू शार्दूल ठाकूरला पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. त्याने रणजी स्पर्धेत केलेल्या शानदार कामगिरीमुळे तो भारतीय संघात परतलाय. डिसेंबर २०२३मध्ये शार्दूल द. आफिकेविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. डावखुरा फटकेबाज फलंदाज साई सुर्दशन आणि पंजाबचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांना प्रथमच भारतीय कसोटी चमूत स्थान मिळाले. मुंबईकर श्रेयस अय्यरला मात्र या दौऱ्यासाठी संघात स्थान मिळू नये ही गोष्ट मात्र सर्वांनाच खटकली. यावर अनेक आजी-माजी भारतीय क्रिकेटपटूंनी निवड समितीवर जोरदार टीका केली. एकाला एक न्याय, दुसऱ्याला दुसरा न्याय ही गोष्टच चुकीची आहे. ज्याने स्थानिक स्पर्धेत खोऱ्यांनी धावा केल्या, आयपीएल स्पर्धेत दिल्ली, कोलकातापाठोपाठ पंजाब संघाला फायनलपर्यंत नेले. अशी कामगिरी करणारा तो या स्पर्धेतील एकमेव कर्णधार आहे. आणखी त्याने काय करून दाखवायला हवे होते की, जेणेकरुन इंग्लंड दौऱ्यासाठी त्याची निवड झाली असती, असा सवाल अनेक माजी क्रिकेटपटूंनी उपस्थित केला आहे.

आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर श्रेयसने बीसीसीआयच्या वार्षिक करारातही स्थान मिळवले. मुंबईकर अजित आगरकर निवड समितीचे अध्यक्ष असताना श्रेयसवर असा अन्याय होतो ही बाब निश्चितच खटकणारी आहे. निदान अय्यरच्या निवडीवरुन एव्हढे वादळ उठल्यावर खास बाब म्हणून त्याची निवड केली असती तरी चालले असते. शेवटी अध्यक्षांच्या मताला काही किंमत आहे की नाही? मर्यादित षटकांच्या सामन्यात गिलने आतापर्यंत नेतृत्त्व केले आहे. आता कसोटीत त्याच्या नेतृत्त्वाचा खरा कस लागेल. वास्तविक पंतला गिलपेक्षा कसोटी सामन्यांचा मोठा अनुभव होता. तो काहीसा आक्रमक आहे. त्यामुळे कर्णधारपदाची जबाबदारी त्याच्याकडे द्यायला हरकत नव्हती. तसे बघायला गेले तर भारतीय संघासाठी हा नाही तरी अभ्यासदौरा

आहे, असेच म्हणावे लागेल. लायन्स संघाविरुद्धचा सराव सामन्यात नायरने द्विशतक तर के. एल. राहुलने शतक काढले. त्यामुळे पहिल्या कसोटीत या दोघांचा अंतिम संघात समावेश नक्की आहे. राहुल, जैस्वाल डावाची सुरूवात करतील. तिसऱ्या क्रमांकावर नायर येईल. कप्तान गिलसाठी चौथा क्रमांक योग्य असेल जेणेकरुन तो मधली फळी भक्कम करु शकतो. पंत पाचव्या, जडेजा सहाव्या स्थानी खेळू शकतील. पहिल्या कसोटीत ठाकूर अथवा नितीशकुमार रेड्डी यांच्यातील एकाला संधी मिळू शकते. बुमराह, सिराज, कष्णा हे तीन वेगवान गोलंदाज आणि फिरकी गोलंदाज कुलदीप यादव पहिल्या कसोटीत भारताचे प्रमुख गोलंदाज असतील. बुमराचा भार कमी करण्यासाठी आता सिराजने पुढाकार घ्यायला हवा.

दरम्यान, इंग्लंडचे तीन प्रमुख अनुभवी वेगवान गोलंदाज वूड, आर्चर, ऑटकिन्सन दुखापतीमुळे पहिल्या कसोटीला मुकणार आहेत. त्याचा कितपत फायदा भारतीय फलंदाज घेतात ते बघणे महत्त्वाचे ठरेल. कागदावर इंग्लंडची फलंदाजी भक्कम वाटते. रुट, पोप, क्रावली, ब्रुक, डकेत हे चांगले फलंदाज त्यांच्याकडे आहेत. अष्टपैलू स्टोक्स, वोक्स हेपण जोरदार फलंदाजी करतात. भारतीय मालिका संपली‌ की इंग्लंडची नंतर लगेचच महत्त्वाची ऑशेस‌ मालिका आस्ट्रेलियाविरुद्ध सुरु होणार आहे. त्यामुळे भारताविरुद्धची मालिका ऑशेस मालिकेच्या तयारीच्या दृष्टीने इंग्लंडला फायदेशीर ठरणार आहे. भारतीय संघातील युवा खेळाडूंसाठी ही मालिका अनुभवाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. आपले संघातील स्थान भक्कम करण्यासाठी मोठी संधी आहे. कुठल्याही पाहुण्या संघासाठी इंग्लंडमधील मालिका नेहमीच आव्हानात्मक राहिल्या आहेत. तेथील लहरी हवामान, वेगवान गोलंदाजीला साथ देणाऱ्या खेळपट्ट्या, थंड वातावरणामुळे चेंडू चांगलाच मुव्ह, सीम, स्वींग होतो. त्यामुळे अशा वातावरणात खेळताना फलंदाजांची खरी कसोटी लागते. त्यामुळे भारतीय संघ त्याला अपवाद‌ नाही.

१९३२पासून भारतीय संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. आतापर्यंत तेथे उभय‌ संघात १९ मालिका झाल्या. त्यात अवघ्या ३ मालिका भारताला जिंकता आल्या आहेत. ११ यजमान इंग्लंडने जिंकल्या तर ५ मालिका अनिर्णित राहिल्या. १९७१ साली अजित वाडेकर यांच्या नेतृत्त्वाखाली भारताने‌ इंग्लंडमध्ये पहिली मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता. मग त्या विजयाची पुनरावृत्ती १९८६ साली कपिल देवच्या भारतीय संघाने आणि २००७ साली राहुल द्रविडच्या भारतीय संघाने केली होती. उभय संघात २०२०-२१मध्ये शेवटची कसोटी मालिका झाली होती. ती दोन-दोन अशी बरोबरीत सुटली. त्यावेळी भारताचा कर्णधार विराट कोहली होता. १९५९, १९६७, १९७४ या तीन मालिकांत पाहुण्या भारतीय संघाला व्हाईटवॉश मिळाला होता. या मालिकेतील सामने आयसीसी कसोटी विश्व अजिंक्यपदाच्या‌ स्पर्धेसाठी धरले जातील. त्यामुळे दोन्ही संघांसाठी मालिकेत मिळणारे गुण महत्त्वाचे आहेत. आता भारताची यंग ब्रिगेड यजमान इंग्लंडचा मुकाबला करण्यात कितपत यशस्वी ठरते ते बघायचे.

Continue reading

भारतीय हॉकी संघाचे पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’!

ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय हाॅकी संघाने सलग दोन कांस्यपदकं जिंकून भारतीय हॉकीसाठी पुन्हा अच्छे दिन आणले. त्यामुळे सहाजिकच भारतीय हाॅकीला एक नवी झळाळी मिळाली. भारतीय हाॅकीप्रेमींच्या भारतीय हाॅकी संघाकडून पुन्हा मोठ्या अपेक्षा बाळगल्या जाऊ लागल्या. पण नुकत्याच झालेल्या मानाच्या एफ.आय.ई.एच....

जाणून घ्या जगप्रसिद्ध विम्बल्डन टेनिस स्पर्धेविषयी…

जून महिना उजाडला की साऱ्या टेनिसविश्वाला वेध लागतात ते लंडनमध्ये होणाऱ्या जगप्रसिद्ध विम्बल्डन ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेचे. टेनिस जगतात ऑस्ट्रेलियन, फ्रेंच, विम्बल्डन आणि अमेरिकन या चार ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धा मानाच्या, प्रतिष्ठेच्या म्हणून समजल्या जातात. पण या चार स्पर्धांत विम्बल्डन स्पर्धेची...

दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाला मिळाली नवसंजीवनी!

क्रिकेटच्या पंढरीत लॉर्डस मैदानात झालेल्या आयसीसी कसोटी जगज्जेतेपदाच्या लढतीत आपल्या पहिल्याच प्रयत्नात दक्षिण आफ्रिकेने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा पाच गडी राखून आरामात पराभव करून जेतेपदावर कब्जा केला. या विजयाबरोबरच द .आफ्रिकेने आयसीसी स्पर्धा विजयाचा २७ वर्षांचा दुष्काळ संपवला. तब्बल ९७२२ दिवसांनी आयसीसी स्पर्धा...
Skip to content