मुंबईत गोरेगावच्या (पू) आरे कॉलनीला लागूनच महानंदा दुग्ध प्रकल्पाचे मुख्य कार्यालय व दूध डेअरी आहे. गेली अनेकवर्षे या आवारात असलेल्या दूध केंद्रावरून महानंदाची विविध दुग्धउत्पादने मिळत आहेत. दूधही तेथे मिळते. गोरेगाव (पू) नागरी वस्तीही वाढली असून सकाळी फेरफटका मारायला जाणारी मंडळी या केंद्रातूनच दूध घेऊन जाणे पसंत करतात. कारण बाहेरच्या कुणाला दूध घरी टाकायला सांगितले तर ती व्यक्ती दरपिशवीमागे किमान एक ते दीड रुपया जास्त चार्ज करते. परंतु गेल्या काही दिवसांपासून या मुख्य प्रकल्पातून घेतलेले दूध नासत असल्याच्या (खराब होते) नागरिकांच्या तक्रारी आहेत. दूध नासल्याची तक्रार घेऊन केंद्रावर गेले असता नेहमीप्रमाणे केंद्रचालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर गिऱ्हाईकाने कार्यालयात जाऊन तक्रार करण्याचे सांगितल्यानंतर तो केंद्रचालक वरमला व त्याने दूध बदलून दिले.

योगायोगाची गोष्ट म्हणजे गेल्या काही दिवसांपासून हे दूधकेंद्र परप्रांतीयाने चालवायला घेतल्याचे बोलले जात आहे. याचबरोबर महानंदामध्ये टप्प्याटप्प्याने VRS / स्वेच्छानिवृत्ती देण्यात येत असल्याने कर्मचारी-कामगारवर्गात असंतोष आहे. त्यातच राज्यातल्या एका बड्या नेत्याने आपल्या अनुयायांना महानंदाचा कामगार वा कपातीचा प्रश्न माझ्याकडे आणू नका असे सूचित केल्याने कामगार हतबल झाले आहेत. संतापाची बाब म्हणजे कोणतीच कामगार संघटना याप्रकरणी आवाज उठवण्यास राजी नाही. येत्या एक-दोन वर्षात हा दुग्धप्रकल्प हळूहळू बंद पाडून त्याजागी टोलेजंग टॉवर्स उभे राहिले तर आश्चर्य वाटायला नको असे तेथील नागरिकांनी सांगितले.
छायाचित्र मांडणीः सोनाली वऱ्हाडे