Homeन्यूज अँड व्ह्यूजआयपीएलचे वैभव!

आयपीएलचे वैभव!

यंदाच्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत राजस्थान संघाचा सर्वात तरुण डावखुरा फटकेबाज फलंदाज १४ वर्षं आणि २३ दिवसांचा असलेल्या वैभव सुर्यवंशीने आपल्या पदार्पणाच्या लखनौविरुद्धच्या सामन्यात अवघ्या २० चेंडूत ३ षटकार आणि २ चौकार मारुन ३४ धावांची धमाकेदार खेळी करुन साऱ्या भारतीय क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधून घेतले. अनेक आजी-माजी खेळाडूंनी त्याच्या या खेळीचे भरभरून कौतुक केले. वैभवने आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात ही ३४ धावांची खेळी करताना काही नवे विक्रम साजरे केले. त्याने या छोट्या खेळीत शार्दूल ठाकूरच्या पहिल्याच चेंडूवर उत्तुंग षटकार खेचला. आयपीएलमध्ये असा पराक्रम करणारा तो सर्वात तरुण फलंदाज ठरला. त्यानंतर आपला पहिला चौकार ठोकून आणखी एक विक्रम नोंदवला. चौकार ठोकणारा तो सर्वात तरुण फलंदाज ठरला.

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पदार्पण करणारा वैभव आजवरचा सर्वात तरुण खेळाडू आहे. वैभवने अगोदरच्या बेंगळुरु संघाच्या रे बर्मनचा विक्रम मोडीत काढला. २०१९च्या स्पर्धेत हैद्राबादविरुद्धच्या लढतीत बर्मन बेंगळुरुतर्फ खेळला तेव्हा तो १६ वर्षे १५७ दिवसांचा होता. वैभवने या सामन्यात अनुभवी यशस्वी जयस्वालसोबत ८५ धावांची दमदार सुरूवात आपल्या संघाला करुन दिली. परंतु नशिबाची साथ राजस्थान संघाला मिळाली नाही. अवघ्या २ धावांनी लखनौ संघाने ही लढत जिंकली. जयपूर येथील ऐतिहासिक सवाई मानसिंग स्टेडियममध्ये लखनौविरुद्ध राजस्थान ही लढत रंगली. “छोटा पॅक बडा धमाका” असलेल्या वैभवने आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने या सामन्यात केले. आयपीएल स्पर्धा जेव्हा सुरु झाली तेव्हाच वैभवला राजस्थान संघ कधी संधी देणार याची उत्सुकता क्रिकेटप्रेमींमध्ये होती. कर्णधार संजू सॅम्सन जखमी असल्यामुळे लखनौविरुद्धच्या सामन्यात खेळला नाही. मग मुख्य प्रशिक्षक असलेल्या राहुल द्रविड यांनी वैभवला या सामन्यात खेळवण्याचा धाडसी निर्णय घेतला. वैभवने सुरेख खेळी करुन आपल्या प्रशिक्षकांचा विश्वास सार्थ ठरवला.

राहुल द्रविड यांना वैभव आपला आदर्श मानतो. त्यांच्यासारखीच कामगिरी वैभवला करून दाखवायची आहे. मुंबईकर वासिम जाफर यांचे नियमित मार्गदर्शन तो घेतच असतो. वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार आणि शैलीदार फलंदाज ब्रायन लारा हा वैभवचा आवडता फलंदाज आहे. वैभव बाद झाल्यानंतर मोठी खेळी न करता आल्यामुळे मैदानातून परतताना त्याला आपले अश्रू अनावर झाले. आणखी थोडा वेळ तो टिकला असता तर त्याने शतकी खेळीदेखील केली असती, असे मत त्याचे प्रशिक्षक मनीष ओझा यांनी व्यक्त केले. १०व्या वर्षापासून ओझा त्याचे प्रशिक्षक आहेत. तेव्हाच ओझा यांनी त्याच्यातील गुणवत्ता ओळखून त्याच्याकडून कसून सराव करुन घ्यायला प्रारंभ केला. त्याचेच हे फळ असल्याचे ओझा यांचे मत आहे.

आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासात सर्वात लहान वयात करोडपती होण्याचा मान बिहारचा युवा सलामीचा फलंदाज अवघ्या १३ वर्षे १८८ दिवसांचा असलेल्या वैभव सुर्यवंशीने मिळवला होता. २०२५च्या आयपीएल स्पर्धेसाठी संजू सॅम्सन कर्णधार असलेल्या राजस्थान रॉयल संघाने वैभवला करारबद्ध करून आयपीएलमध्ये नवा इतिहास रचला. आयपीएल लिलावातदेखील तेव्हा बाजी मारून वैभवने बिहारची एक वेगळी ओळख क्रिकेटविश्वाला करून दिली आहे. लिलावासाठी वैभवाची मूळ रक्कम सुरुवातीला ३० लाख रुपये ठेवण्यात आली होती. परंतु त्यानंतर त्याला आपल्या संघात घेण्यासाठी दिल्ली आणि राजस्थान संघात रस्सीखेच सुरु झाली. अखेर राजस्थानने या युवा खेळाडूला १ कोटी १० लाख रुपये देऊन आपल्या संघासाठी करारबद्ध करण्यात यश मिळविले. त्याच्या आयपीएल प्रवेशामुळे सारेच क्रिकेटविश्व अचंबित झाले.

सध्या वैभव ८व्या इयत्तेत शिकत आहे. वयाच्या अवघ्या १२व्या वर्षी वैभवने बिहारतर्फे रणजी करंडक सामन्यात पदार्पण केले. बलाढ्य मुंबईविरुद्ध तो आपला पहिला रणजी सामना खेळला. रणाजी स्पर्धेत पदार्पण करणारा १२ वर्षे २८४ दिवसांचा वैभव सर्वात तरुण खेळाडू ठरला. यंदा सप्टेंबर महिन्यात १९ वर्षांखालील युवा कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध वेगवान शतकी खेळी करून तो प्रकाशझोतात आला. चेन्नई येथे झालेल्या या सामन्यात त्याने अवघ्या ५८ चेंडूत १०४ धावा फटकावताना १४ चौकार आणि ४ षटकार ठोकले. आंतरराष्ट्रीय सामन्यातील त्याची ही विक्रमी खेळी ठरली. त्यानंतर झालेल्या १९ वर्षांखालील भारतीय अ संघ, ब संघ, बांगलादेश, इंग्लंड यांच्यातील चौरंगी मालिकेतदेखील त्याची बॅट चांगली चालली. त्याने ३ सामन्यांत २ अर्धशतके फटकावली. बिहार क्रिकेट संघटनेच्या रणधीर वर्मा एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत त्याने तिहेरी शतक फटकावून विक्रमी खेळी केली. गतवर्षी कूचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेत झारखंडविरुद्ध खेळताना वैभवने पहिल्या डावात १५१ आणि दुसऱ्या डावात ७६ धावांची शानदार खेळी केली. वयाच्या १२व्या वर्षी त्याने प्रतिष्ठेच्या विनू मंकड करंडक क्रिकेट स्पर्धेत पदार्पण केले.

बिहारमधील समस्तीपूर येथील ताजपूर गावचा हा युवा क्रिकेटपटू. त्याचे वडिल संजीव चांगले क्रिकेट खेळाडू होते. परंतु भारतातर्फे खेळण्याचे त्यांचे स्वप्न अधुरेच राहिले. मग आपल्या मुलाला चांगला क्रिकेटपटू तयार करण्याचा ध्यास त्यांनी घेतला. त्यासाठी स्वतः चांगले प्रशिक्षक बनले. या खेळातील बारकाव्यांचा अभ्यास केला. ५व्या वर्षी टेनिस बॉलने वैभवच्या क्रिकेट खेळाचा शुभारंभ झाला. सुरुवातीच्या काळात वैभवच्या वडिलांनी घराजवळच खेळपट्टी, मैदान तयार करून तेथेच त्याच्याकडून जास्तीतजास्त सराव करून घेतला. ती खेळपट्टी आणि मैदान तयार करण्यासाठी त्यांनी आपली शेतजमीनदेखील विकली. मग २ वर्षांनी त्याला समस्तीपूर येथील क्रिकेट अकादमीत पाठवले. तेथे ब्रजेश झा यांचे मार्गदर्शन सुरुवातीला त्याला मिळाले. काही वर्षांनी वडिल त्याला पाटणा येथील मनीष ओझा यांच्या जीसीसी अकादमीत घेऊन जाऊ लागले. त्यासाठी रोज अनेक मैलांचा प्रवास करून छोट्या वैभवला ते स्कूटरवरून पाटणा येथे नेत असत. मनीष ओझा यांच्या मार्गदर्शनाखाली वैभवच्या फलंदाजीत चांगलीच सुधारणा झाली. मग स्थानिक क्रिकेट स्पर्धेत वैभव आपल्या बॅटची चमक दाखवू लागला. बिहार क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष राकेश तिवारी यांनी छोट्या वैभवची फलंदाजीतील चमक बघून त्याला बिहार संघात लहान वयातच स्थान दिले. मिळालेल्या संधीचे वैभवने सोने केल्यामुळेच आता तो राजस्थान संघासाठी करारबद्ध झाला आहे.

क्रिकेट हा खेळ त्याच्या नसानसात भरला आहे. सतत क्रिकेटचाच तो विचार करत असतो. तो चाणाक्ष असून त्याची बुद्धिमत्तादेखील तल्लख असल्याचे बिहार रणजी संघाचे प्रशिक्षक प्रमोद कुमार सांगतात. उपहार आणि चहापानाच्या वेळीदेखील वैभव तुम्हाला सतत कसला ना कसला सराव करत असताना दिसेल. या वयात त्याने चेंडूला कसे सामोरे जायचे आणि फटक्यांची निवड कशी करायची याचा चांगला अभ्यास केलाय. बचाव आणि आक्रमण हे दोन्ही गुण त्याच्या फलंदाजीत बघायला मिळतात. ड्राइव्हज, कट, पूल या फटक्यांवर त्याने आताच चांगली हुकूमत मिळविली असल्याचे प्रमोद कुमार यांचे मत आहे. भविष्यात त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा बाळगायला हरकत नसल्याचे कुमार स्पष्ट करतात. आयपीएलच्या मोठ्या अनुभवामुळे त्याच्या फलंदाजीत आणखी बरीच सुधारणा दिसेल, असा कुमार यांना विश्वास आहे. राजस्थान संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आहेत. द्रविड यांनी वैभवसाठी होकार दिल्यामुळे त्याच्यात नक्कीच चांगली गुणवत्ता असेल यात शंका नाही. आपल्या पहिल्याच आयपीएल लढतीत वैभवने झकास फटकेबाजी करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. आता भविष्यात त्याच्या बॅटमधून आणखी धावांची किती बरसात होते हे बघणे महत्त्वाचे ठरेल. मोठ्या सामन्यांमध्ये दडपणाखाली तो कशी फलंदाजी करतो याबाबतदेखील उत्सुकता आहे. भारतीय क्रिकेटसाठी तो लंबे रेसचा घोडा आहे का, हे येणारा काळच ठरवेल.

Continue reading

दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाला मिळाली नवसंजीवनी!

क्रिकेटच्या पंढरीत लॉर्डस मैदानात झालेल्या आयसीसी कसोटी जगज्जेतेपदाच्या लढतीत आपल्या पहिल्याच प्रयत्नात दक्षिण आफ्रिकेने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा पाच गडी राखून आरामात पराभव करून जेतेपदावर कब्जा केला. या विजयाबरोबरच द .आफ्रिकेने आयसीसी स्पर्धा विजयाचा २७ वर्षांचा दुष्काळ संपवला. तब्बल ९७२२ दिवसांनी आयसीसी स्पर्धा...

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत श्रेयसला डावलल्याचीच चर्चा!

आजपासून यजमान इंग्लंडविरुद्ध सुरु होणाऱ्या ५ सामन्यांच्या तेंडुलकर-अंडरसन चषकासाठीच्या कसोटी मालिकेत शुभमन गिलच्या पाहुण्या भारतीय संघाची खरी कसोटी लागणार आहे, असेच म्हणावे लागेल. कारण, विराट कोहली, रोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन या तीन दिग्गज भारतीय खेळाडूंच्या गैरहजेरीत भारत पहिल्यांदा कसोटी...

क्ले कोर्टवरचे नवे ‘राजा-राणी’!

टेनिस विश्वात लाल मातीच्या क्ले कोर्टवर खेळल्या जाणाऱ्या एकमेव फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत स्पेनचा कार्लोस अल्कराझ आणि अमेरिकेची कोको गॉफ हे आता नवे राजा-राणी झाले आहेत. फ्रांसमधील जगप्रसिद्ध पॅरिसमध्ये नुकत्याच झालेल्या यंदाच्या स्पर्धेत टेनिसमधील या युवा खेळाडूंनी शानदार...
Skip to content