सोन्याला अनेकदा सुरक्षित गुंतवणूक मानले जाते, कारण सर्वसाधारणपणे ते राजकीय आणि आर्थिक अनिश्चिततेच्या काळात सुरक्षा कवच (Hedge) म्हणून काम करते. जागतिक व्यापार युद्धाच्या भीतीमुळे आणि अमेरिकेची अर्थव्यवस्था मंदीकडे ढकलली जाण्याची शक्यता जागतिक भांडवली बाजाराला वाटत असल्यामुळे सध्या सोन्याच्या किंमती वाढत आहेत. काही विश्लेषकांना वाटते की, सोन्याच्या किंमती आता शिखरावर पोहोचल्या आहेत. सध्या आपण सोन्याबद्दल जास्तीतजास्त आशावादाच्या जवळ आहोत असे, वेल्स फार्गो इन्व्हेस्टमेंट इन्स्टिट्यूटमधील जागतिक इक्विटी आणि रिअल ॲसेट्सचे प्रमुख समीर सामना ह्यांचे मत आहे. त्यांच्या मते सोन्यावर आणखी परतावा मिळू शकतो असे वाटणाऱ्या गुंतवणूकदारांना नंतर मात्र पश्चात्ताप होऊ शकतो.
माझ्या मते भांडवली बाजाराबद्दल नकारात्मक भावना निर्माण झाल्यामुळे सोन्याची खरेदी खूपच जास्त झाली आहे. ह्यापुढे सोने खरेदी करणे फायद्याचे असेलच असे नाही. सोने खरेदीची पार्टी जोमात चालू असताना ज्यांनी खरेदी केली ते फायद्यात असले तरी आता यापुढे या पार्टीत येणे म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण म्हणता येऊ शकते. याचा अर्थ असा नाही की सोने खरेदीची पार्टी संपली आहे. परंतु आता सोने खरेदीसाठी पुढाकार घेणारे अंमळ उशिरा आले आहेत असे मात्र नक्की म्हणावे लागेल. या वर्षी आतापर्यंत, सोन्याच्या किमतींनी एक डझनहून अधिक वेळा विक्रमी उच्चांक गाठला आहे. भांडवली बाजारातील हालचालींमुळे सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याने सोन्याचे भाव वाढले. शुक्रवार दुपारपर्यंत सोन्याच्या फ्युचर्सच्या किमती सुमारे २१% वाढल्या होत्या. आणि गेल्या वर्षीच्या किमतीच्या तुलनेत त्या ३०%हून जास्त होत्या. कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर म्हणजे मार्च २०२०मध्ये वाढलेल्या किंमतीच्या मानाने या आठवड्यातच किंमती सुमारे ७% वाढल्या आहेत. परंतु अनिश्चित काळात भौतिक सोने खरेदी करणे गुंतवणूकदारांसाठी अर्थपूर्ण ठरेलच असे नाही.
सोन्याचे दागिने खरेदी करणे ही एक वेगळीच गोष्ट आहे. सोन्याच्या दागिन्यांचे मूळ मूल्य त्यात असलेल्या मौल्यवान धातूशी जोडलेले आहे. २४ कॅरेट, २२ कॅरेट आणि १८ कॅरेटच्या सोन्याच्या दागिन्यांमध्ये असलेल्या उच्च मूल्याच्या सोन्यामुळे त्याची किंमत टिकते. परंतु सर्वच सोन्याचे दागिने उच्च मूल्याच्या धातूचे असतीलच असे नाही. त्यात मिश्रणही असू शकते.
उच्च-गुणवत्तेचे सोन्याचे दागिने काळजीपूर्वक निवडल्यास वैयक्तिक आनंद आणि संभाव्य आर्थिक फायदे दोन्ही देऊ शकतात. सोन्याचे दागिने बनवण्यासाठी ची कारागिरी आणि त्यात

असलेली कलात्मकतादेखील कालांतराने महत्त्वाची भूमिका बजावतात, म्हणुन कार्टियर, व्हॅन क्लीफ अँड आर्पल्स, टिफनी अँड कंपनीसारख्या ब्रँडचे दागिने घेण्याकडे लोकांचा कल असतो. प्राचीन काळापासून लोक दागिन्यांमध्ये गुंतवणूक करत आहेत. आधुनिक काळात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध असतानासुद्धा लोकांना सोने गुंतवणूक अत्यंत सुरक्षित वाटते. कारण कठीण काळात सोनेच कामाला येते.
सोने खरेदी विक्रीच्या मागील सत्रात विक्रमी उच्चांकानंतरसुद्धा सोन्याच्या किंमतीत वाढ झाली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेल्या टॅरीफ वॉरमुळे भांडवली बाजारात प्रचंड पडझड झाली. टॅरीफ वॉरच्या संभाव्य परिणामाच्या अपेक्षेने गुंतवणूकदारांनी भांडवली बाजाराकडे आपली पाठ फिरवली आणि सोन्याकडे आपला मोर्चा वळवला. जागतिक व्यापार युद्धामुळे भांडवली बाजारात प्रचंड खळबळ माजली. सोन्याबद्दल जगातील आर्थिक सल्लागारांची वेगवेगळी मते आहेत. टॅरीफ-प्रेरित बाजारातील चढउतारांमुळे वाढलेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवरही काही आर्थिक सल्लागार आपल्या क्लायंटना सोन्यात गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाहीत. त्याऐवजी ते आपल्या गिर्हाईकांना रोख पैसा हातात राखण्याचा, आपत्कालीन बचतीसाठी निधी बाजूला काढून ठेवण्याचा आणि बदल होत असलेल्या आर्थिक उद्दिष्टांवर आधारित आवश्यकतेनुसार गुंतवणूक निर्णय बदलत राहण्याचा सल्ला देतात. व्यापार युद्धामुळे विकास होणार नाही अशी भीती अनेक गुंतवणूकदारांना वाटते. म्हणुन ते सोन्यात पर्यायी गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक आहेत.
काही वित्तीय सल्लागारांच्या मते, मंदीच्या भीतीने का होईना पण आपल्या पोर्टफोलिओमध्ये सोन्याचा समावेश करणे चांगले असते. हे सल्लागार आपल्या गिर्हाईकांना गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्याची शिफारस करतात. विपरीत परिस्थितीत थेट सोन्याची खरेदी करण्यापेक्षा सोन्याच्या खाणीची मालकी असलेल्या कंपन्यांचे शेअर्स किंवा तत्सम म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. कारण प्रत्यक्ष सोने खरेदी केल्यास ते साठवण्यासाठी बँक लॉकर घ्यावा लागतो. घरी ठेवल्यास ते जोखमीचे असते. तसेच सोन्याचा विमाही उतरावा लागतो. त्याचा अतिरिक्त खर्च येतो. अक्षयतृतिया तोंडावर आहे. हा मुहूर्त साधून सोने खरेदी करण्याकडे भारतीयांचा कल जास्त असतो. पण मी सांगेन, मुहूर्त कोणताही असो. सोने खरेदी जरा जपूनच!
लेखक मार्केट ॲनालिस्ट आहेत.
संपर्क- 9820182805