सत्ताधारी आमदारांचे कोरम म्हणजेच गणसंख्या पुरेशी नसल्याने माथाडी कायद्यामध्ये बदल सुचवणाऱ्या विधेयकावर मतदान होऊ शकले नाही आणि विधानसभेचे कामकाज दहा मिनिटे होऊ शकले नाही. तालिका अध्यक्ष योगेश सागर कोरम म्हणजे गणसंख्या नसल्याने बेल म्हणजेच घंटा वाजवून विधानभवनात असलेल्या आमदारांना सभागृहात येण्याची सूचना दिली. सलग दहा मिनिटे घंटा वाजूनही सदस्य सभागृहात आले नाहीत.
मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील तसेच आशिष शेलार यांनी विरोधी पक्षांना सहकार्य करण्याची विनंती केली. विखे-पाटील म्हणाले की, शुक्रवार असल्याने अनेक आमदारांचे त्यांच्या मतदारसंघात कार्यक्रम घेतलेले असतात. त्यामुळे यापूर्वीही असे प्रसंग आलेले आहेत आणि विरोधकांनीही सहकार्य करायला हवे. आशिष शेलार यांनी विरोधकांना विनंती करताना सांगितले की, विधेयक मंजूर होण्याने जनतेच्या हिताचाच निर्णय होत असतो. कोरम म्हणजेच गणपूर्ती नसल्याचे नाना पटोले यांनी लक्षात आणून दिले होते. त्यामुळे दहा मिनिटे कामकाज थांबले होते. त्यावेळी तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी बेल वाजवली तेव्हापासून दहा मिनिटांपर्यंत सभागृहात सदस्य बसल्या जागेवरून शेरेबाजी करत होते. विरोधी पक्षांचे सदस्य सरकारची त्रेधातिरपीट करून शांतपणे बसून राहिले होते.
गणपूर्तीसाठी विधानसभेच्या एकूण २८८, या आमदारसंख्येच्या दहा टक्के म्हणजेच २९ आमदारांची सदनात उपस्थित आवश्यक असते. माथाडी काद्यातील बदलाचे विधेयक मांडले गेल्यानंतर चर्चेच्या वेळी अनेक आमदार होते. पण, मतदानाच्या वेळी सभागृहात बावीसच आमदार होते. त्यामुळे नाना पटोले यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यावेळी दोन मंत्र्यांनी विरोधकांना विनंती केल्यानंतर आमदार जितेन्द्र आव्हाड यांनी विरोधकांची संख्या खूप असल्याने विरोधकांना चेपण्याची भूमिका बदलायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच, तुम्ही आमच्या लक्षवेधी सूचना घेत नाही, घेतल्या तर वेळ देत नाही, आम्ही बोलताना सारखी घंटा वाजवता, पण आम्ही राग मानणार नाही. कारण आम्ही मूळ कॉँग्रेसी आहोत. त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आमचा छळ होतो, हे गेले पाहिजे, म्हणून आम्ही हे सांगत आहोत, असे ते म्हणाले.

मुनगंटीवार उपरोधिकपणे म्हणाले की, आम्ही इतक्या मोठ्या मनाचे आहोत आणि स्वातंत्र्यानंतर इतक्या मोठ्या मनाचा सत्तारूढ पक्ष पहिल्यांदाच आला आहे की जो विरोधकांना पक्षात घेतो आणि इतकी मोठी मोठी पदे देतो. त्यावर आव्हाड म्हणाले की, पण तुमचा जो छळ झाला आहे, त्याबद्दल आहाला वाईट वाटते.
नाना पटोले म्हणाले की, या सदनात आम्हाला जी आयुधे मिळाली आहेत, त्यांचा वापर करतो. पण, आम्हाला तुमची संख्या आहेच किती हे सांगितले जाते. विरोधी पक्षनेता बनवण्यासाठी संख्या नसली तरी पूर्वीच्या काळी विरोधकांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्यासारखी असली तरी नेमले जायचे. पण, आज हे होताना दिसत नाही. नियम २९३अन्वये होणाऱ्या चार चर्चा प्रलंबित आहेत. असे कामकाज यापूर्वी कधीही सभागृहाने बघितलेले नाही, कारण विधेयक आणायचेच होते तर शुक्रवारी का आणले. निधी न देऊन आमच्या मतदारसंघातील विकासाची चेष्टाच केली जाते आहे.
माध्यमांमधे तर अशी चर्चा आहे की सुधीर मुनगंटीवार विरोधी पक्षनेत्याचीच भूमिका बजावताहेत. त्यावर शेलार यांनी सांगितले की, सुधीरभाऊ काय भूमिका बजावत आहेत, हे त्यांनाच माहीत आहे. पण ते पक्षविरोधी भूमिका कधीही बजावणार नाहीत. या चर्चेनंतर मंत्री आकाश फुंडकर यांनी विधेयक मांडले आणि ते मंजूर करण्यात आले.