तब्बल ८ वर्षांच्या मोठ्या अवधीनंतर पुन्हा एकदा पाकिस्तान-युएईमध्ये सुरू झालेल्या आयसीसीच्या ९व्या “चॅम्पियन्स” चषक क्रिकेट स्पर्धेत कोण होणार “चॅम्पियन” याबाबत कोट्यवधी क्रिकेटप्रेमींमध्ये कमालीची उत्सुकता आहे. क्रिकेट जगतात मिनी विश्वचषक स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेचे शेवटचे आयोजन २०१७मध्ये इंग्लंड-वेल्स देशांनी संयुक्तपणे केले होते. त्या शेवटच्या स्पर्धेत पाकिस्तानने भारताचा आरामात पराभव करुन आपले या स्पर्धेतील पहिले विजेतेपद मिळविण्याचा पराक्रम केला होता.
१९९८मध्ये पहिली स्पर्धा बांगलादेशमध्ये घेण्यात आली होती. पहिल्या स्पर्धेत द. आफ्रिकेने वेस्ट इंडिजला नमवून पहिली स्पर्धा जिंकण्याचा मान मिळवला होता. आतापर्यंत झालेल्या एकूण ८ स्पर्धांत ऑस्ट्रेलिया आणि भारताने प्रत्येकी २ वेळा विजेतेपद मिळविले, तर द. आफ्रिका, वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि पाकिस्तानने एकवेळा ही स्पर्धा जिंकली. २००२मध्ये श्रीलंकेत झालेल्या या स्पर्धेत पावसामुळे अंतिम सामना होऊ शकला नव्हता. त्यावेळी भारत-श्रीलंका संघाला संयुक्त विजेतेपद देण्यात आले होते. यंदाच्या या स्पर्धेत तिसरे विजेतेपद मिळवून ही स्पर्धा विक्रमी जिंकण्याची ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन्ही संघांना संधी आहे.
स्पर्धा सुरू होण्यापूर्वी संभाव्य विजेता म्हणून भारतालाच क्रिकेट जाणकारांनी आणि काही आजी-माजी खेळाडूंनी पहिली पसंती दिली. भारतीय संघाची फलंदाजीची मोठी ताकद आहे. परंतु गोलंदाजीचं काय? हा मोठाच प्रश्न भारतीय संघाला सतावतोय. भारतीय गोलंदाजांनी या स्पर्धेत आपल्याला साजेशी कामगिरी केली तर भारत तिसऱ्यांना चॅम्पियन होऊ शकतो. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल, ऋषभ पंत असे एकापेक्षा एक सरस फलंदाज भारताकडे आहेत. हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर हे आपल्या बॅटचादेखील तडाखा देऊ शकतात. त्यामुळे कागदावर तरी भारताची फलंदाजी मजबूत आहे. ८व्या क्रमांकापर्यंत भारताची खोलवर फलंदाजी आहे. नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेत कर्णधार रोहितने शानदार शतक ठोकले होते. विराटनेदेखील एकमेव सामन्यात अर्धशतकी खेळी केली होती. त्यामुळे या दोघांना सूर गवसला असे म्हणायला हरकत नाही. आता या स्पर्धेत त्यांच्या बॅटमधून धावांची बरसात होईल अशी आशा भारतीय क्रिकेटप्रेमी करत असतील.
भारताचा प्रमुख अनुभवी गोलंदाज बुमराह दुखापतीमुळे या स्पर्धेला मुकणार आहे. त्याची मोठी उणीव भारतीय संघाला जाणवेल. कारण सध्याच्या काळात सर्वच प्रकारच्या सामन्यांत बुमराह हा भारतीय गोलंदाजीचा प्रमुख आधारस्तंभ राहिला आहे. २०२४मधील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून आयसीसीनी बुमराहची दखल घेऊन त्याची या पुरस्कारासाठी उचित निवड केली होती. आता त्याच्या गैरहजेरीत भारतीय संघात पुन्हा कमबॅक करणारा मोहम्मद शमी भारतीय संघासाठी कितपत उपयुक्त ठरतो. ते बघणे महत्त्वाचे ठरेल. बुमराहच्या गैरहजेरीत शमीकडून मोठ्या अपेक्षा बाळगल्या जात आहेत. इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेत तो फारशी छाप पाडू शकला नव्हता. चॅम्पियन स्पर्धेत तो आपला प्रभाव पाडू शकला नाही तर भारतासाठी आंतरराष्ट्रीय सामन्यात शमीसाठी दारे बंद होऊ शकतात. शमीला अर्शदीप सिंग, हर्षित राणा हे वेगवान गोलंदाज कशी साथ देतात हेदेखील बघणे महत्त्वाचे आहे. हार्दिक पंड्याचा मध्यमगती मारादेखील भारतासाठी उपयुक्त ठरू शकतो. वनडे सामन्यात तो नेहमीच भारतासाठी महत्त्वपूर्ण गोलंदाज ठरला आहे. तेव्हा भारताची मदार या स्पर्धेत हार्दिकच्या खांद्यावर आहे.

भारताने या स्पर्धेसाठी तब्बल ५ फिरकी गोलंदाजांचा आपल्या संघात समावेश केला आहे. भारताचे सर्व सामने युएईमध्ये होणार आहेत. तेथील खेळपट्ट्या फिरकी गोलंदाजांना साथ देतात हा आजवरचा अनुभव असल्यामुळे भारताने ५ फिरकी गोलंदाजांना आपल्या संघात स्थान दिले. रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर हे ५ फिरकी गोलंदाज भारतीय संघात आहेत. वरुणने टी-२० सामन्यात आपला प्रभाव पाडल्यामुळे शेवटच्या क्षणी चॅम्पियन स्पर्धेसाठी त्याला निवडण्यात आले. आता वन डे सामन्यात तो कितपत यशस्वी ठरतो ते या स्पर्धेत कळेल.
या स्पर्धेसाठी भारताचा अ गटात समावेश करण्यात आला. याच गटात भारताला बांगलादेश, पाकिस्तान, न्युझिलंड यांच्याशी पहिल्या टप्प्यात मुकाबला करायचा आहे. स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्यास भारताला जड जाऊ नये. नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आणि वनडे मालिकेत भारताने सहज विजय मिळवला होता. त्यामुळे भारतीय संघाचे मनोधैर्य निश्चितच उंचावले असेल. या गटातून दुसऱ्या उपांत्य फेरीतील संघासाठी यजमान पाकिस्तान आणि न्युझिलंड यांच्यात चुरस असेल. यजमान असल्यामुळे पाकिस्तान संघ आपली कामगिरी उंचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल.
१९९६च्या विश्वचषक स्पर्धेनंतर पुन्हा एकदा मोठी स्पर्धा चॅम्पियन्स चषक स्पर्धेमुळे पाकिस्तानमध्ये होत आहे. पाकिस्तानची गोलंदाजी वैविध्यपूर्ण आहे. फलंदाजीत मधली फळी सक्षम आहे. परंतु चांगले फिनिशर त्यांच्याकडे नाहीत ही मोठी उणीव संधाला जाणवत असेल. माजी कर्णधार बाबर आझमचा फॉर्म हा त्यांच्या संघासाठी चिंतेचा विषय आहे. त्याला चांगला सूर गवसेल अशी आशा संघ व्यवस्थापन करत असेल. न्युझिलंडने भारतभूमीत प्रथमच कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता. चांगले अष्टपैलू फिरकी गोलंदाज त्यांच्या संघात आहेत. चांगली वेगवान गोलंदाजीदेखील त्यांच्याकडे आहे. तिसरा चांगला वेगवान गोलंदाज मात्र त्यांच्याकडे नाही. महत्त्वाच्या सामन्यात न्युझिलंड संघ शरणागती पत्करतो हा इतिहास आहे. यंदाची स्पर्धा त्याला अपवाद ठरते का? हे बघणे महत्त्वाचे ठरेल. बांगलादेश संघ पहिल्यासारखा ताकदवान राहिला नाही. दुबळ्या फलंदाजीमुळे अनेक आंतरराष्ट्रीय सामन्यात त्यांना हार खावी लागली आहे. सततच्या बदलामुळे संघ फारसा स्थिरावलेला नाही. त्यामुळे बांगला संघाकडून फार मोठी अपेक्षा बाळगला येणार नाही.
अ गटाच्या तुलनेत ब गट चांगलाच धोकादायक आहे. ग्रूप ऑफ डेथ असेच म्हणावे लागेल. या गटात ऑस्ट्रेलिया, द. आफ्रिका, इंग्लंड, अफगाणिस्तानचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियन संघालादेखील दुखापतीने त्रस्त केले आहे. त्यामुळे त्यांचे प्रमुख गोलंदाज कमिन्स, स्टार्क, हेजलवुड हे या स्पर्धेला मुकणार आहेत. तसेच अष्टपैलू मिचेल मार्श, मार्ककस स्टोनेस हेदेखील या स्पर्धेत नसतील. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ चांगलाच कमकुवत झाला आहे. संघात एकापेक्षा एक सरस आक्रमक फलंदाज आहेत. भारताप्रमाणेच त्यांची फलंदाजी भक्कम आहे. परंतु गोलंदाजीचे काय? असाच प्रश्न ऑस्ट्रेलियन संघाबाबत निर्माण झाला आहे. फिरकी गोलंदाज अॅडम झम्पावर त्यांची मोठी मदार राहिल. सद्यस्थितीत त्यांना जेतेपदाची संधी कमी दिसते.

याच गटात दक्षिण आफ्रिका, इंग्लंड हे दोन ताकदवान संघ आहेत. द. आफ्रिकेकडे सखोल फलंदाजी आहे त्यामुळे मधल्या फळीची निवड कशी करायची ही डोकेदुखी संघ व्यवस्थापनाकडे होऊ शकते. त्यांचेदेखील अव्वल गोलंदाज जायबंदी झाल्यामळे गोलंदाजीचा बाज काहीसा दुबळा झाला आहे. महाराज आणि शम्सी या दोन अनुभवी फिरकी गोलंदाजांवर त्याचे या स्पर्धेतील यश-अपयश अवलंबून असेल. नुकत्याच झालेल्या भारताविरुद्धच्या वनडे आणि टी-२० मालिकेत इंग्लंडला पराभवाचा मुकाबला करावा लागला होता. आता या स्पर्धेत हे अपयश पुसून काढण्याची मोठी संधी इंग्लंडकडे आहे. त्याचा लाभ ते कसा घेतात हे बघणे महत्त्वाचे ठरेल.
त्यांच्या संघात अनेक स्फोटक फलंदाज आहेत, जे कधीही एक हाती सामना फिरवू शकतात. त्यांचा वेगवान मारा प्रभावी आहे. जो प्रतिस्पर्धी संघाला सुरुवातीला नक्कीच काही धक्के देऊ शकतो. परंतु गेल्या काही वर्षांत इंग्लंड संघाची आशिया संघाची कामगिरी मात्र काहीशी निराशाजनकच आहे. फिरकी गोलंदाजांसमोर त्यांचे फलंदाज नांगी टाकतात हा इतिहास आहे. तसेच चांगल्या फिरकी गोलंदाजांची उणीव संघाला जाणवत आहे. त्यामुळे या स्पर्धेत जेतेपदासाठी इंग्लंडला आपली सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. गेल्या दोन स्पर्धांचे इंग्लंडने यशस्वी आयोजन केले होते. दोन वेळा इंग्लंडला या स्पर्धेच्या विजेतेपदाने हुलकावणी दिली. आता तिसऱ्या प्रयत्नात ते यशस्वी होणार का? याबाबत त्यांच्या चाहत्यांमध्ये नक्कीच उत्सुकता असेल.
या गटात अफगाणिस्तान हा काहीसा दुबळा संघ आहे. चांगली फिरकी गोलंदाजी हीच त्यांची मोठी जमेची बाजू आहे. विश्वातील सध्याचा सर्वोत्तम फिरकी गोलंदाज रशिद खान त्यांच्या संघात आहे. त्याच्यावर अफगाणिस्तानची मोठी मदार राहणार आहे. चांगली सलामीची जोडी ही त्यांची जमेची बाजू आहे. पण त्यानंतरचे फलंदाज फारसे यशस्वी ठरत नाहीत. मग त्यांची घसरगुंडी उडते. हेच चित्र अनेक सामन्यात बघायला मिळाले आहे. परिस्थितीनुसार खेळात बदल करणे अफगाणिस्तान संघाला फारसे जमलेले नाही. संघात चांगल्या वेगवान गोलंदाजांची वानवा आहे. त्यामुळे फार मोठ्या कामगिरीची अपेक्षा अफगाण संघाकडून बाळगायला नको. त्यातच त्यांचा अष्टपैलू अनुभवी खेळाडू मुजीब रहमान, युवा फिरकी गोलंदाज अल गझानेर हेदेखील दुखापतग्रस्त असल्यामुळे स्पर्धेला मुकणार आहेत. त्यामुळे त्या दोघाची उणीव अफगाण संघाला नक्कीच जाणवेल. या गटातून उपांत्य फेरी गाठण्यासाठी ऑस्ट्रेलिया, द. आफ्रिका, इंग्लंड यांच्यात जोरदार मुकाबला होणार.
कसोटी न खेळणाऱ्या देशांमध्ये या खेळाचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून तेव्हाचे आयसीसीचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी ही स्पर्धा सुरू केली. स्पर्धेचे यजमानपददेखील कसोटी सामने न खेळणाऱ्या देशांना दिले गेले. पहिली स्पर्धा बांगलादेशमध्ये तर दुसरी स्पर्धा केनियात झाली होती. त्यानंतर मात्र कसोटी सामने खेळणाऱ्या देशांकडे यजमानपद देण्यात आले. इंग्लंडने सर्वात जास्त तब्बल ३ वेळा या स्पर्धेचे आयोजन केले आहे तर बांगलादेश, केनिया, श्रीलंका, द. आफ्रिका यांना प्रत्येकी एकदा आयोजनाची संधी मिळाली. गेलने या स्पर्धेत सर्वाधिक ७९१ धावा केल्या आहेत. गेल, गिब्स, गांगुली, धवन यांनी सर्वाधिक ३ शतके या स्पर्धेत फटकावली आहेत. अॅस्टल न्युझिलंड आणि अॅन्डी फ्लॉवर, झिम्बावे यांची १४५ ही सर्वोच्च धावसंख्या या स्पर्धेतील आहे. श्रीलंकेच्या मारुफची २००६च्या या स्पर्धेत १४ धावांत ६ बळी ही सर्वोत्तम कामगिरी एका सामन्यातील होती. न्युझिलंडच्या मिल्सने सर्वाधिक २८ बळी या स्पर्धेत घेतले आहेत. श्रीलंकेच्या संगकाराने यष्टिमागे सर्वाधिक ३३ बळी टिपले. क्षेत्ररक्षक म्हणून त्यांच्याच जयवर्धनेने १५ झेल घेतले आहेत. २००४च्या या स्पर्धेत न्युझिलंडने अमेरिकेविरुद्ध ४ बाद ३४७ धावा ही सर्वोच्च धावसंख्या रचली होती. याच स्पर्धेत अमेरिकेला ऑस्ट्रेलियाने अवघ्या ६५ धावात गुंडाळले होते. ही स्पर्धेतील सर्वात कमी धावसंख्या होती. आता ९ मार्चला होणार या स्पर्धेचा चॅम्पियन कोण याचा फैसला!