मुंबईतल्या सुमती सेवा मंडळ व दहिसर स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित १८ वर्षांखालील मोफत शालेय कॅरम स्पर्धेत पोद्दार अकॅडमी-मालाड स्कूलच्या पुष्कर गोळेने विजेतेपद पटकाविले.
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीच्या सहकार्याने झालेल्या चुरशीच्या अंतिम सामन्यात अचूक खेळ करणाऱ्या पुष्कर गोळेने युनिव्हर्सल स्कूल-दहिसरच्या वेदांत राणेचा १३-१० असा पराभव केला. डावाच्या मध्यापर्यंत आघाडी घेऊनही वेदांत राणेला अखेर उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. उद्योजक सौरभ घोसाळकर, को-ऑप. बँक एम्प्लॉईज युनियनचे सरचिटणीस नरेंद्र सावंत व कार्याध्यक्ष सुनील साळवी, दहिसर स्पोर्ट्स फाउंडेशनचे चिटणीस दिलीप महांबरे, सुमती मंडळाचे अध्यक्ष प्रमोद पार्टे, प्रमुख पंच चंद्रकांत करंगुटकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या-उपविजेत्यांना गौरविण्यात आले.
मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर आदी जिल्ह्यातील उदयोन्मुख ३२ ज्युनियर खेळाडूंच्या सहभागाने ही स्पर्धा दहिसर-पूर्व येथे रंगली. स्पर्धेमध्ये पाटकर विद्यालय-डोंबिवलीचे नील म्हात्रे व प्रसाद माने यांना उपांत्य उपविजेते, पार्ले टिळक विद्यालयाचा अमेय जंगम, पोद्दार अकॅडमी-मालाडचा प्रसन्न गोळे, पाटकर विद्यालय-डोंबिवलीचा वेदांत पाटणकर, ठाकूर रामनारायण पब्लिक स्कूल-दहिसरचा साहिल गुप्ता यांना उपांत्यपूर्व उपविजेते आणि केवल कुलकर्णी, तृशांत कांबळी, विराज ठाकूर, ध्रुव शाह, अनय म्हेत्रे, शंभू धुरी यांनी उत्तेजनार्थ पुरस्कार मिळविला. स्पर्धेचे शानदार उद्घाटन दहिसर स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष व माजी आमदार विनोद घोसाळकर, विद्या मंदिर माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक सुधीर देसाई व विश्वस्त श्रीकांत सुर्वे, कॅरमप्रेमी विष्णू तांडेल आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुमती सेवा मंडळाचे सुशील सावंत, सतीश धुळप, रत्नाकर नाईक, गजानन लाड, विजय कदम, प्रदीप परब आदींचे सहकार्य लाभले होते.