मुंबईच्या सुमती सेवा मंडळ व दहिसर स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त १८ वर्षांखालील शालेय ३२ मुलांची मोफत कॅरम स्पर्धा आज २३ जानेवारी रोजी दहिसर-पूर्व येथे रंगत आहे. मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर आदी जिल्ह्यातील राष्ट्रीय दर्जाच्या ज्युनियर कॅरमपटूसह उदयोन्मुख खेळाडू स्पर्धेत सहभागी होत असल्यामुळे कॅरम शौकिनांना दर्जेदार खेळ पाहण्यास मिळेल. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी सहकार्याने होणाऱ्या कॅरम स्पर्धेत पहिल्या आठ विजेत्या-उपविजेत्यांना आकर्षक चषकासह स्ट्रायकर पुरस्कार दिला जाणार आहे.
विजेतेपदाच्या दावेदारीसाठी पार्ले टिळक विद्यालयाचा सार्थक केरकर, युनिव्हर्सल स्कूल-दहिसरचा वेदांत राणे, सेंट अँन्टोनिओ डिसिल्व्हा हायस्कूल-दादरचा ध्रुव भालेराव, पोद्दार अकॅडमी-मलाड स्कूलचे प्रसन्न गोळे व पुष्कर गोळे, पाटकर विद्यालय-डोंबिवलीचे प्रसाद माने, नील म्हात्रे व शिवांश मोरे, साठ्ये कॉलेजचा तृशांत कांबळी, आस्पी नूतन अकॅडमीचा युग पडिया, ठाकूर रामनारायणचे तीर्थ ठाकर, विराज ठाकूर आदी ज्युनियर खेळाडू निकराचे प्रयत्न करतील. दहिसर स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष माजी आमदार विनोद घोसाळकर व सुमती मंडळाचे अध्यक्ष प्रमोद पार्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन दहिसर स्पोर्ट्स फाउंडेशन येथे होत आहे.