भारतभूमीत न्युझीलंडकडून प्रथमच “व्हाइट वॉश” मिळाल्यानंतर मानाच्या समजल्या जाणाऱ्या गावस्कर-बॉर्डर चषक २०२४-२५ या कसोटी मालिकेतदेखील भारताला कांगारुंकडून ३-१ अशी हार खावी लागल्यानंतर सध्या भारतीय सिनियर क्रिकेट संघाचा मामला खरोखरच गंभीर झाला आहे, असेच म्हणावे लागेल. तब्बल १० वर्षांच्या मोठ्या अवधीनंतर ही मालिका गमविण्याची नामुष्की भारतीय संघावर आली. मालिकेतील पराभवामुळे जागतिक अजिंक्यपद कसोटी सामन्याची अंतिम फेरी गाठण्याचे भारतीय संघाचे स्वप्नदेखील धुळीस मिळाले. भारतात झालेल्या न्युझीलंड संघाच्या पराभवातून भारतीय संघ काहीतरी बोध घेईल आणि आपला खेळ ऑस्ट्रेलियन दौऱ्यात उंचावेल अशी आशा तमाम भारतीय क्रिकेटप्रेमी बाळगून होते. परंतु सुमार खेळाचे प्रदर्शन करुन भारतीय संघाने आता आपल्या चाहत्यांची चांगलीच नाराजी ओढावून घेतली आहे.
या महत्त्वपूर्व दौऱ्यासाठी भारतीय संघाने काय तयारी केली होती, हा मोठाच प्रश्न आता निर्माण झाला आहे. राहुल द्रविड यांच्याकडून गौतम गंभीर यांनी मुख्य प्रशिक्षकपदाची भारतीय संघाची सूत्रे हाती घेतली खरी पण ते अद्याप आपल्या प्रशिक्षकपदाला म्हणावा तसा न्याय देऊ शकले नाहीत. चुकीची संघनिवड, फलंदाजांच्या क्रमवारीतील सातत्याने केलेले बदल, खेळपट्टीचा योग्य अभ्यास करण्यात असमर्थ आणि ज्येष्ठ खेळाडूंची कानउघाडणी करण्यात गंभीर अपयशी ठरल्यामुळेच भारताला या मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला. शेवटच्या कसोटी सामन्यात धावा होत नसल्यामुळे कर्णधार रोहित शर्माने न खेळण्याचा निर्णय घेतला. मग तोच नियम माजी कर्णधार विराट कोहलीबाबत का लावला गेला नाही हे न सुटणारे कोडे आहे. रोहितला तीन कसोटीत ५ डावात ५० धावादेखील करता आल्या नाहीत, तर विराटने ५ कसोटीत १९० धावा केल्या. त्यात एका शतकाचा समावेश आहे. तब्बल ८ वेळा विराट स्लिपमध्ये झेल देऊन बाद झाला.

यष्टिरक्षक ऋषभ पंतनी ४थ्या कसोटीत कारण नसताना खराब फटका खेळून आपली विकेट ऑस्ट्रेलियाला बहाल केली आणि तिथूनच भारताची पडझड सुरु झाली. १९८४च्या इंग्लंडविरुद्धच्या दिल्ली कसोटी सामन्यात खराब फटके मारुन कपिल देव, संदिप पाटील बाद झाले होते. मग पुढील कसोटीत त्या दोघांना संघातून डच्चू दिला गेला होता. असेच कडक धोरण पंतबाबत संघ व्यवस्थापनाने घ्यायला हवे होते. हर्षित राणा दीर्घकाळ मारा करू शकत नाही हे पहिल्या कसोटीत स्पष्ट झाले तरीदेखील त्याला कुठल्या आधारे दुसऱ्या कसोटीत संधी दिली गेली? पर्थ येथील पहिल्या कसोटी सामन्यात बुमराहच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने २९५ धावांनी दणदणीत विजय मिळवून मालिकेस जोरदार प्रारंभ केला. दुसऱ्या डे-नाईट कसोटी सामन्यात रोहित शर्मा भारतीय संघात परतला खरा, पण भारताला या सामन्यात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. पहिली कसोटी चौथ्या दिवशी संपली. दुसरी कसोटी तर तिसऱ्या दिवशीच संपली. नाणेफेक जिंकून कर्णधार रोहितने प्रथम फलंदाजीचा घेतलेला निर्णय भारताला चांगलाच महागात पडला. ऑस्ट्रेलियाने डे-नाईट कसोटी सामन्यात आपल्या घरच्या मैदानात अद्याप पराभव स्वीकारलेला नाही.
तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या मदतीस पाऊस धावून आला. त्यामुळे थोडक्यात त्यांचा पराभव होता होता टळला. चौथ्या कसोटीत माजी कर्णधार स्मिथला सूर गवसल्यामुळे त्यांनी पहिल्या डावात ४७४ धावांचा डोंगर रचला. स्मिथने बऱ्याच मोठ्या अवधीनंतर १४० धावांची शतकी खेळी केली त्याला कोन्टास, खाजवा, लाबूशेन, कमिन्स यांची मोलाची साथ मिळाली. भारताने पहिल्या डावात ३६९ धावांची चांगली मजल मारली होती. शेवटच्या दिवशी चहापानापर्यंत भारताने ३ बाद १२२ धावा अशी चांगली सुरुवात करुन सामना अनिर्णित राखण्याच्या दृष्टीने प्रारंभ केला होता. परंतु चहापानानंतर भारताचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला आणि ऑस्ट्रेलियाने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. भारताचे शेवटचे ७ फलंदाज अवध्या ३४ धावांतच माघारी परतले.

मालिकेत प्रथमच चौथ्या कसोटीत ५व्या दिवसापर्यंत खेळ चालला. मालिका बरोबरीत सोडविण्यासाठी भारताला शेवटचा सामना जिंकणे आवश्यक होते. परंतु खराब फलंदाजी आणि दुसऱ्या डावात बुमराह गोलंदाजी न करु शकल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा विजय सोपा झाला. या मालिकेत बुमराहने ३२ बळी घेऊन विदेशात सर्वाधिक बळी घेण्याचा नवा विक्रम साजरा केला. या मालिकेत बुमराह एखाद्या योद्ध्याप्रमाणे लढला. पूर्ण फिट नसतानादेखील ऑस्ट्रेलियन फलंदाजांना सळो की पळो करुन सोडले. त्याला इतर गोलंदाजांची तेवढीच तोलामोलाची साथ मिळाली असती तर मालिकेचा निकाल भारताच्या बाजूने कदाचित लागू शकला असता. नितिश रेड्डीच्या रुपाने भारताला एक चांगला अष्टपैलू युवा खेळाडू या मालिकेत गवसला. आता भावी काळात तो आपल्या कामगिरीत कितपत सातत्य राखतो हे बघणे महत्त्वाचे ठरेल. या मालिकेत भारतासाठी हेड नावाप्रमाणेच डोकेदुखी ठरला. त्याने ९ डावात ५६च्या सरासरीने ४४८ धावा फटकावल्या. ऑस्ट्रेलियाचा तो खराखुरा तारणहार ठरला. ३२ बळी घेणाऱ्या बुमराहची मालिकावीर म्हणून केलेली निवड योग्यच म्हणावी लागेल.
टी-२० विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा या तीन भारतीय दिग्गज भारतीय खेळाडूंनी टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातून आपली निवृत्ती जाहीर केली होती. आता तशीच वेळ त्यांच्यासाठी कसोटी सामन्यातदेखील आली आहे. याचा ते गांभीर्याने विचार करतील अशी आशा करुया. एकंदर या तीन बड्या खेळाडूंसाठी शेवटचा ऑस्ट्रेलियन दौरा मात्र फारसा चांगला ठरला नाही. कसोटी सामन्यात यशस्वी होण्यासाठी देशांतर्गत सामने खेळण्याची सूचना काही आजीमाजी खेळाडूंनी भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंना केली होती. परंतु आता भारतीय क्रिकेटचा यंदाचा अर्धा मौसम संपला आहे. तसेच पाच महिन्यांच्या मोठ्या अवधीनंतर भारत इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. भारतीय क्रिकेट संघातील सुपरस्टार संस्कृती प्रगतीत अडथळा ठरत आहे, हे माजी भारतीय फिरकी गोलंदाज हरभजन सिंग यांचे बोल भारतीय संघाबाबत बरेच काही सांगून जाते. या दौऱ्यात भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची उणीव चांगलीच जाणवली. गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो या मालिकेला मुकला. शेवटच्या काही सामन्यांत तो खेळणार असल्याचे वृत्त येत होते. परंतु दुर्दैवाने तसे झाले नाही. शेवटच्या काही सामन्यांसाठी तो उपलब्ध झाला असता तर ऑस्ट्रेलियन फलंदाजांसाठी शमी कर्दनकाळ ठरू शकला असता. आता भारतीय क्रिकेट मंडळाने आणि निवड समितीने ठोस भूमिका घेऊन या साऱ्या परिस्थितीतून मार्ग काढायला हवा तरच भारतीय संघाची कसोटी सामन्यातील ही पडझड कुठेतरी थांबेल. अन्यथा हा गंभीर मामला अधिकच गंभीर होत जाईल!!