Wednesday, February 5, 2025
Homeब्लॅक अँड व्हाईटगेले वर्ष गाजवले...

गेले वर्ष गाजवले ते भारताच्या बुद्धिबळपटूंनी!

२०२४ हे सरते वर्ष भारतीय बुद्धिबळ खेळासाठी आजवरच्या इतिहासातील सर्वोत्तम वर्ष ठरले असेल असे म्हटले तर वावगे ठरू नये. याअगोदर अशी दैदिप्यमान कामगिरी भारतीय खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांत केली नसावी. त्यामुळेच २०२४मध्ये भारताने विश्व बुद्धिबळपटावर आपले साम्राज्य निर्माण केले असेच म्हणावे लागेल. गेल्या दशकात रशिया आणि चीनने जागतिक बुद्धिबळ विश्वात आपला दरारा निर्माण केला होता. आता भारताची ताकद बुद्धिबळ विश्वात वाढत आहे. त्यामुळे आगामी काही वर्षांत भारत बुद्धिबळात महासत्ता होऊ शकतो याचीच नांदी २०२४मध्ये सुरु झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धांमध्ये बुद्धिबळ ऑलिंपियाड ही स्पर्धा प्रतिष्ठेची आणि मानाची समजली जाते. या सांघिक स्पर्धेत जवळजवळ १८०पेक्षा जास्त पुरुष आणि महिला संघांचा सहभाग असतो. यंदा बुडापेस्ट येथे झालेल्या या स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला संघाने सुवर्णपदकाला गवसणी घालून नवा इतिहास रचला. भारताने अशी दुहेरी सोनेरी कामगिरी या स्पर्धेत पहिल्यांदाच करुन दाखविली. याअगोदर भारताची या स्पर्धेची मजल कांस्यपदकाच्या पुढे कधी गेली नव्हती. भारतीय पुरुष आणि महिला संघाने या स्पर्धेत याअगोदर कांस्यपदके मिळविली होती. यंदाच्या स्पर्धेत मात्र भारताने दोन्ही गटात अव्वल क्रमांक मिळवून जागतिक बुद्धिबळ विश्वात खळबळ माजवली. याच स्पर्धेत गुकेश, अर्जुन इरिगेसी, दिव्या देशमुख, वंतिका अग्रवाल यांनी शानदार कामगिरी करताना वैयक्तिक सुवर्णपदकावरदेखील कब्जा केला आहे. हादेखील नवा विक्रम भारतीय बुद्धिबळपटूंनी तिथे रचला. या स्पर्धेत दोन्ही गटात सुवर्णपदकाची कमाई करणारा भारत हा केवळ तिसरा देश ठरला. याअगोदर रशिया आणि चीनने या स्पर्धेत पुरुष आणि महिला विभागात सुवर्णपदके मिळविली होती.

या स्पर्धेपाठोपाठ डिसेंबरमध्ये झालेल्या दोन जागतिक स्पर्धात गुकेश आणि कोनेरु हम्पीने विजेतेपद पटकावून २०२४चा गोड शेवट केला. सिंगापूरमध्ये झालेल्या पुरुषांच्या जागतिक क्लासिकल स्पर्धेत गुकेशने गतविजेत्या चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करुन सर्वात लहान वयात ही स्पर्धा जिंकण्याचा विश्वविक्रम केला. अवघ्या १८ वर्षीय गुकेशने ही स्पर्धा जिंकून गतविजेत्या लिरेनचे यंदा जेतेपद राखण्याचे स्वप्न धुळीस मिळविले. विश्वनाथन आनंदनंतर ही स्पर्धा जिंकणारा गुकेश केवळ दुसरा भारतीय खेळाडू ठरला. तब्बल १२ वर्षांच्या मोठ्या

अवधीनंतर गुकेशने पुन्हा एकदा या स्पर्धेचे जेतेपद भारतात आणले. आनंदने तब्बल ५ वेळा ही स्पर्धा जिंकली होती. आनंद हे गुकेशचे प्रेरणास्थान असून त्याच्यासारखीच कामगिरी करण्याचे स्वप्न गुकेशने ८ वर्षांपूर्वी बाळगले होते. त्याची पूर्तता करण्यात गुकेशला यश आले. केंडिडेस स्पर्धा जिंकून गुकेशने लिरेनचा प्रतिस्पर्धी म्हणून होण्याचा मान मिळवला. ही स्पर्धा जिंकणारादेखील गुकेश सर्वात तरुण खेळाडू होता. याच स्पर्धेत गुकेशसह प्रज्ञानंद, इरिगेसी, करुआना हेदेखील होते. या सर्वांना नमवून गुकेशने जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यात यश मिळविले.

गुकेशपाठोपाठ भारताची बुजूर्ग महिला बुद्धिबळपटू ३७ वर्षीय कोनेरु हम्पीने न्युयॉर्कमध्ये झालेली जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धा दुसऱ्यांदा जिंकण्याचा पराक्रम केला. सुपर मॉम अशी उपाधी लाभलेल्या हम्पीने या स्पर्धेत शेवटच्या फेरीत इंडोनेशियाच्या सुकंदरला पराभूत करून आपल्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. विशेष म्हणजे काळ्या मोहऱ्या घेऊन खेळत असतानादेखील हम्पीने डावांच्या अंतिम टप्यात प्रभावी चाली करून सुकंदरला नमवण्याच्या पराक्रम केला. ही स्पर्धा दुसऱ्यांदा जिंकणारी हम्पी विश्वातील केवळ दुसरी बुद्धिबळपटू ठरली आहे. तिने चीनच्या वेनजूनच्या विक्रमाची बरोबरी केली. या स्पर्धेत हम्पीला १०वे मानांकन देण्यात आले होते. त्यामुळे स्पर्धेच्या जेतेपदाच्या शर्यतीत ती कुठेच नव्हती. स्पर्धेत सलामीच्या सामन्यातदेखील तिला हार खावी लागली होती. त्यामुळे जेतेपदाची हम्पीला कोणीच स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच फारशी संधी दिली नव्हती. ह्याअगोदर झालेल्या दोन-तीन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ती शेवटच्या क्रमांकावर होती. एकंदरच यंदाच्या वर्षात तिची कामगिरी फारशी समाधानकारक नव्हती. परंतु वर्षाचा गोड शेवट तिने जग्गजेतेपदाने करुन अजूनही आपण या कमालीच्या स्पर्धेत टिकून असल्याचे दाखवून दिले.

याच स्पर्धेत हम्पीची सहकारी असलेल्या हारिकाचा पाचवा क्रमांक लागला. टायब्रेकमध्ये हरिका कमी पडल्यामुळे तिला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. अन्यथा शेवटच्या फेरीत हरिकादेखील जेतेपदाच्या शर्यतीत होती. पुरुष गटात भारताचा अर्जुन एरिगेसीचा ५वा क्रमांक लागला. अर्जुन, एरिगेसीने यंदाच्या वर्षात २८०० गुणांच्या पुढे यलो रेटिंग पार केले. विश्वनाथ आनंदनंतर अशी कामगिरी करणारा तो केवळ दुसरा भारतीय खेळाडू ठरला. नागपूरच्या दिव्या देशमुखने मुलींची २० वर्षांखालील जागतिक स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. सध्याच्या जागतिक अव्वल १० खेळाडूंच्या क्रमवारीत भारताचे ४ खेळाडू आहेत. प्रज्ञानंद आणि त्याची बहिण वैशाली कॅडेस स्पर्धेत खेळणारे भारताचे पहिले बहिण-भाऊ ठरले. नॉर्वे स्पर्धेत प्रज्ञानंदने माजी विश्वविजेता आणि जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या कालसनला पराभूत करण्याचा क्लासिक स्पर्धेत मोठा पराक्रम केला. विशेष म्हणजे त्याच्याच देशात प्रज्ञानंदने ही कमाल करुन दाखवली. निहाल सरिनने उझबेकिस्थानमध्ये झालेली आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली, कोलकाताच्या अवघ्या तीन वर्षांच्या अनिश सरकारने आंतरराष्ट्रीय फिडे रेटिंग मिळवून कमालच केली. वैशाली भारताची केवळ तिसरी महिला ग्रँडमास्टर यंदा झाली. ११ वर्षीय रमेश कुमारने ग्रँडमास्टर किताब मिळवला. भारताने १०पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले. त्यामध्ये अनेक नामवंत आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धांचा फायदा भारतीय खेळाडूंना झाला, ज्यामध्ये अनेक युवा खेळाडूंनी आपल्या चमकदार कामगिरीचा ठसा उमटवला. ओडिसामध्ये भव्य बुद्धिबळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या नविन वर्षात भारतीय बुद्धिबळपटूंची अशीच विजयी दौड कायम राहिल अशी आशा तमाम भारतीय बुद्धिबळप्रेमी बाळगून असतील.

Continue reading

ही तर मुंबईला पत्करावी लागलेली नामुष्कीच!

विक्रमी ४२ वेळा भारतीय क्रिकेट विश्वातील मानाची समजली जाणारी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा जिंकणाऱ्या बलाढ्य मुंबई क्रिकेट संघावर यंदाच्या मोसमातील या स्पर्धेतील अ गटातील ६व्या फेरीतील लढतीत दुबळ्या जम्मू काश्मिर संघाविरुद्ध आपल्याच वांद्रे संकुलातील स्टेडियममध्ये लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे...

अखेर जागतिक खो-खो स्पर्धेचे बिगुल वाजले!

गेली अनेक वर्षे भारतीय खो-खो प्रेमी ज्या जागतिक खो-खो स्पर्धेची वाट पाहत होते, अखेर त्याची पूर्तता अखिल भारतीय खो-खो महासंघाने करुन दाखविली. नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये पहिल्यावहिल्या जागतिक खो-खो स्पर्धेचे दिमाखदार आयोजन करुन आता या खेळाला जागतिक...

कांबळे कुटुंबियांनी उचलले मर्दानी खेळ जिवंत ठेवण्याचे शिवधनुष्य

पारंपरिक शिवकालीन युद्धकला, मर्दानी खेळ जिवंत ठेवण्याचे मोलाचे कार्य गेली अनेक वर्षे रत्नागिरी येथील कांबळे कुटुंबीय करत आहेत. दिवंगत महादेव व्यायामशाळा वेतोशी, रत्नागिरीच्या माध्यमातून हे कार्य गेली अनेक वर्षे सुरु आहे. सध्या या कार्याचा वारसा वस्ताद सुधीर कांबळे यांनी...
Skip to content