मुंबईत कांदिवली येथे झालेल्या मुंबई उपनगर कबड्डी संघटनेच्या ४२व्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पूर्व विभागाच्या द्वितीय श्रेणी पुरुष गटात सन्मित्र क्रीडा मंडळ, घाटकोपरने जेतेपद पटकावले.
अंतिम फेरीत सन्मित्रने साई स्पोर्ट्स क्लब, भांडूप यांच्यावर ७ गुणांनी विजय मिळवला. सन्मित्र क्रीडा मंडळाकडून सोहम पुंदेने चौफेर चढाया केल्या. त्याला अजिंक्य जाधव, प्रथमेश शेळके यांनी सुंदर पक्कडीची छान साथ दिली. साई स्पोर्ट्सकडून प्रतीक वाडकर, नरेंद्र वाफेलकर यांची लढत एकाकी ठरली.
सन्मित्र क्रीडा मंडळाचे प्रशिक्षक दीपक कांदळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या संघाने हे यश मिळवले. उपविजेत्या संघाचे प्रशिक्षक शैलेश जागडे होते. हे दोन्ही संघ पुढील वर्षी प्रथम श्रेणीत खेळतील.