पालघर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग जिल्हास्तरीय स्पर्धेत वसईच्या सूर्योदय आरबीएल मतिमंद मुला-मुलींच्या शाळेने चमकदार कामगिरी करताना ३ सुवर्ण आणि ६ कांस्य पदकांची कमाई केली.
त्यांच्या ओबेद डायसने २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत आणि गोळाफेक स्पर्धेत सुवर्णपदके मिळवली. १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत रोहित पोतेननेदेखील सुवर्ण पदकाची कमाई केली. तसेच स्नेहा गुप्ता, हर्षित सिंह यांनी कांस्य पदके पटकावली. अनुज त्रिपाठीने गोळाफेक आणि २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत तिसरा क्रमांक मिळवला. बहूविकलांग विभागात २५ मीटर चालण्याच्या व बादलीत बॉल टाकणे ह्या स्पर्धेत लायबा शाह हिने दोन कांस्य पदके मिळवली. या सर्व पदकविजेत्यांना शाळेच्या सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. सर्व पदकविजेत्या खेळाडूंचे आणि प्रशिक्षकांचे खास अभिनंदन शाळेच्या मुख्याध्यापिका अनुसया प्रधान यांनी केले आहे.