Homeन्यूज अँड व्ह्यूजरोहित पाटलांनी सार्थ...

रोहित पाटलांनी सार्थ केले आरआर आबांचे नाव..

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील तथा आरआर आबा आपल्या प्रभावी वक्तृत्त्वशैलीसाठी प्रसिद्ध होते. राज्याच्या विधानसभेत आर आर पाटील यांनी अनेकदा आपल्या प्रभावी भाषणांमधून सभागृहाची दाद मिळवली होती. नुकतीच पंचविशी गाठलेल्या त्यांच्या चिरंजीवांनी सोमवारी विधानसभेतील पहिले भाषण करताना थेट आर आर पाटलांची आठवण सर्वांना करून दिली आणि मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण सभागृहाची दाद मिळवली.

आर आर पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुमनताई पोटनिवडणुकीतून विधानसभेवर निवडून गेल्या. त्यानंतरच्या २०१९च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित वयाने लहान असल्याने सुमनताई पाटील पुन्हा विधानसभेवर निवडून गेल्या. मात्र, यावेळी २०२४च्या विधानसभा निवडणुकीतून रोहित पाटील पहिल्यांदाच आमदार झाले आहेत.

आरआर

विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत मांडला होता. त्यावर भाषण करताना रोहित पाटील यांनी आपले विधानसभेतील पहिलेच भाषण गाजविले. नार्वेकर यांचे अभिनंदन करताना रोहित पाटील म्हणाले की, अध्यक्षमहोदय आपण एक वकील आहात आणि सभागृहात एक क्रमांकावर बसणाऱ्या वकिलांकडे (देवेन्द्र फडणवीस) आपले लक्ष असणारच आहे. पण मीही वकिली शिकत असल्याने तुम्ही माझ्यावरही लक्ष ठेवाल, अशी मी आशा करतो. रोहित पाटील यांच्या टिप्पणीला अध्यक्ष नार्वेकर आणि मुख्यमंत्री फणवीस यांच्यासह सर्वच सदस्यांनी दाद दिली.

मुख्यमंत्र्यांकडे निर्देश करत रोहित पाटील म्हणाले की, संत तुकाराम महाराजांनी लिहिलेली एक ओळ मला आठवते. ती म्हणजे, अमृताहूनी गोड नाम तुझे देवा… पाटील पुढे म्हणाले की, तुमचे नाव गोड आहे. त्यावर आपल्या जागेवर बसल्याबसल्या मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी टिप्पणी केली की, अमृताहूनही गोड आहे… त्यावर पाटील म्हणाले की, त्यामुळेच तुम्ही तुमची गोड दृष्टी माझ्यावरही ठेवाल, हा मला विश्वास आहे.

रोहित पाटील यांच्या या टिप्पणीनंतर मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्यासह संपूर्ण सभागृह हास्यकल्लोळात बुडाले.

रोहित पाटील यांनी मोजक्याच शब्दांत भाषण केले. पण त्याचा ठसा त्यांनी उमटवला. त्यामुळेच सभागृह गाजवणाऱ्या आर आर पाटलांची सर्वांनाचा आठवण झाली.

Continue reading

आव्हाड, पडळकरांचे वागणे आठवीतल्या मुलांनाही लाजवणारे…

मी उद्धव ठाकरे यांना सत्ताधारी बाजूला यायचे आहे का, असे लायटर व्हेनमध्ये विचारले होते आणि तुम्ही.. तुम्ही लोकांनी त्याची हेडलाईन करून टाकली, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आपली कैफियत मांडली तर याच विषयावर उद्धव ठाकरे यांना माध्यमांनी प्रश्न...

दिनोने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया…

कामं देताना यांना दिनू मोरे दिसला नाही, पण दिनो मोरिया दिसला आणि आता त्या दिनोने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांनी आज विधानसभेत शिवसेना (उबाठा)वर टीका केली. कोरोना काळात कापड दुकानदार आणि हॉटेलवाल्याला...

व्हेरिफिकेशनसाठीचे अर्थपूर्ण कागद…

पडताळणी किंवा व्हेरिफिकेशनची प्रमाणित कार्यपद्धती म्हणजेच स्टँण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर अस्तित्त्वात असली तरी काही विशिष्ट कागदपत्रे दिल्यानंतर ही पडताळणी कशी वेगाने होते, हे सर्वांना माहीत आहे, अशी टिप्पणी शिवसेना (उबाठा)चे आमदार सुनील प्रभू यांनी आज विधानसभेत केली आणि संपूर्ण सभागृह...
Skip to content