ठाण्याच्या प्रतिक तुलसानीने राष्ट्रीय पातळीवर सलग दोन अजिंक्यपद मिळवत आपली छाप पाडली आहे. प्रतिकने गोव्यात झालेल्या १३ वर्षांखालील मुलांच्या यूटीटी राशयात्री मानांकन टेबल टेनिस आणि त्यानंतर लगेचच हिमाचल प्रदेशमध्ये झालेल्या १३ वर्षांखालील मुलांच्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सरशी मिळवली. विशेष म्हणजे या दोन्ही स्पर्धा प्रतिकने अंतिम फेरीत बंगालच्या हिमोन कुमार मोंडलला नमवून जिंकल्या.
गोव्यातील मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या यूटीटी राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत प्रतिकने निर्णायक लढतीत हिमोनचा ११-७, ११-४, ११-७ असा सरळ तीन गेममध्ये पराभव करत आपले पहिले राष्ट्रीय विजेतेपद मिळवले. त्यानंतर प्रतिकने अवघ्या १० दिवसांच्या फरकाने या यशाची पुनरावृत्ती साधताना कोरा येथे झालेल्या १३ वर्षे वयोगटाच्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत आपले वर्चस्व राखले. या स्पर्धेच्या विजेतेपदाच्या होमोन कुमारविरुद्धच्या लढतीत पहिले दोन गेम प्रतिकने ११-८,११-६ असे सहज जिंकले. तिसऱ्या गेममध्ये हिमोन कुमारने तिसऱ्या गेममध्ये चांगली झुंज देत सामन्यात पुनरागमन करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पण या गेममध्ये प्रतिकने १३-११ अशी सरशी मिळवत गेमसह सामना आणि विजेतेपदही आपल्या खिशात टाकले.
प्रतिकने वयाच्या सातव्या वर्षांपासून केवळ हौस म्हणून चंद्रकांत माईणकर आणि यश सोळंकी यांच्या मार्गदर्शनाखाली टेबल टेनिस खेळण्यास सुरुवात केली. त्यांनतर राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाल्यावर मात्र प्रतिकने गांभीर्याने खेळण्यास सुरुवात केली. सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कुलचा विद्यार्थी असणाऱ्या प्रतिकने त्यानंतर पीआरओ टेबल टेनिस अकॅडमीत राजेंद्र सावंत आणि निलेश पंदिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत ठाणे जिल्ह्यासह विविध राज्य आणि अखिल भारतीयस्तरीय स्पर्धामध्ये आपल्या नावाची दखल घ्यायला लावली आहे.