दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना वर्ष 2022च्या दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज केली.
येत्या 8 ऑक्टोबरला आयोजित 70व्या राष्ट्रीय चित्रपट समारंभात मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल. आशा पारेख, खुशबू सुंदर आणि विपुल शाह यांच्या निवड समितीने ही निवड केली.
प्रतिष्ठित दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार मिळाल्यामुळे मिथुन चक्रवर्ती यांच्या कलात्मक प्रतिभेला मोठी मान्यता मिळण्याबरोबर अनेकांच्या जीवनात बदल घडवून आणणारी दयाळू आणि समर्पित व्यक्ती म्हणून मिथुनदा यांच्या वैभवशाली वारशाचा देखील हा सन्मान असेल.
मिथुन चक्रवर्ती म्हणजेच मिथुनदा भारतीय अभिनेते, निर्माते आणि राजकारणी आहेत. वैविध्यपूर्ण भूमिका आणि नृत्यशैलीसाठी ते ओळखले जातात. ऍक्शनपटातील भूमिकांपासून मार्मिक नाट्यमय व्यक्तिरेखांपर्यंत अनेक प्रकारच्या भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. एक सर्वसामान्य कुटुंबातील तरुण ते दिग्गज, प्रतिष्ठित अभिनेता असा त्यांचा प्रवास आहे. आशा आणि चिकाटी असलेला माणूस ध्यास आणि समर्पणासह अत्यंत महत्त्वाकांक्षी स्वप्नेदेखील पूर्ण करू शकतो, हे यामुळे सिद्ध झाले आहे, असे गौरवोद्गार वैष्णव यांनी यानिमित्ताने काढले.
पश्चिम बंगालमधल्या कोलकाता येथे 16 जून 1950 रोजी जन्मलेल्या मिथुनदांचे बालपणीचे नाव गौरांग चक्रवर्ती. ‘मृगया’ (1976), या आपल्या पहिल्याच चित्रपटासाठी त्यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. प्रतिष्ठेच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे ते विद्यार्थी आहेत. मृणाल सेन यांच्या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या संथाळ बंडखोराच्या भूमिकेने त्यांना राष्ट्रीय पातळीवरील गौरव प्राप्त झाला. 1982 मध्ये आलेल्या डिस्को डान्सर, या चित्रपटातील भूमिकेने मिथुनदांना मोठी लोकप्रियता मिळाली. हा चित्रपट, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही पातळ्यांवर अत्यंत यशस्वी ठरला आणि या चित्रपटाने नृत्य क्षेत्रातील लखलखता तारा अशी ओळख निर्माण करण्यात मिथुनदांना यश आले. याच चित्रपटामुळे भारतीय चित्रपटसृष्टीत डिस्को संगीताला लोकप्रियता मिळाली.
1990मध्ये अग्नीपथ, या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता या श्रेणीतील फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. नंतरच्या काळात, तहादेर कथा (1992) आणि स्वामी विवेकानंद (1998) या चित्रपटांतील भूमिकांसाठी मिथुनदांनी आणखी दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवले. त्यांनी आपल्या कारकीर्दीमध्ये हिंदी, बंगाली, ओडिया, भोजपुरी आणि तेलुगू यांसारख्या अनेक भारतीय भाषांतील साडेतीनशेहून अधिक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या.
केवळ चित्रपट क्षेत्रातीलच कामगिरी नव्हे तर सामाजिक क्षेत्रातदेखील मिथुनदा यांनी समर्पित भावनेने काम केले आहे. शिक्षण, आरोग्यसुविधा या क्षेत्रांमध्ये तसेच वंचित समुदायांना मदत करणाऱ्या विविध धर्मादाय उपक्रमांमध्ये सक्रियतेने सहभागी होऊन मिथुनदांनी समाजाचे ऋण फेडण्याप्रती असलेल्या वचनबद्धतेचे दर्शन घडवले आहे. संसद सदस्य म्हणूनदेखील त्यांनी काम केले आहे. भारतीय चित्रपट क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी नुकतेच त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.