Wednesday, December 4, 2024
Homeमाय व्हॉईसहवे कशाला 'सर...

हवे कशाला ‘सर तन से जुदा..’?

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना हिंदुत्वाचा पुकार करणाऱ्यांविरूद्ध सामाजिक भावना चिथावत अलगतावादी मुस्लिमांना बळ देणारी रॅली सोमवारी काढण्यात आली. माजी खासदार इम्तियाझ जलील यांच्या नेतृत्त्वाखाली एआयएमआयएम पक्षाद्वारे छत्रपती संभाजीनगर येथून ही रॅली मुंबईकडे निघाली. जलील यांच्यासोबतच वारिस पठाण आणि एआयएमआयएमचे इतर नेते यात सहभागी होते. साधारण १२ हजारांचा जनसमुदाय यात होता. तिरंगा संविधान रॅली, असे गोंडस नाव या रॅलीला देण्यात आले होते. मात्र, शिरच्छेदाच्या ‘सर तन से जुदा..’च्या घोषणा यात देण्यात आल्या.

का काढली होती ही रॅली? तर म्हणे रामगिरी महाराज आणि भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार नितेश राणे यांनी मुसलमानांच्या भावना दुखावणारी कथित वक्तव्ये केल्यावरून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी… या मागणीचे पत्र आणि त्याची प्रत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्याकरीता ही रॅली काढण्यात आली. छत्रपती संभाजीनगरहून निघालेली ही रॅली मुंबईच्या प्रवेशद्वारावर मुलुंड चेकनाक्यावरच रोखण्यात आली. यानंतर रॅली काढणाऱ्या नेत्यांनी त्यांच्याकडील पत्रे जिल्हाधिकारी तसेच इतर अधिकाऱ्यांकडे सोपवली. यानंतर माध्यमांशी बोलताना इम्तियाझ जलील तसेच वारीस पठाण म्हणाले की, रामगिरी महाराजांनी प्रेशित मोहम्मद यांचा अपमान करणारी तर नितेश राणे यांनी मुसलमानांना धमकवणारी वक्तव्ये केली असून त्याविरूद्ध पोलिसांकडे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र पोलीस त्यांना अटक करत नाही. त्यामुळे आम्हाला ही रॅली काढावी लागली.

शिरच्छेदाची मागणी आणि ‘सर तन से जुदा’चा नारा, इस्लामवाद्यांकडून वारंवार दिला जातो. तसा तो नारा याही रॅलीत दिला गेला. यात विचारात घेण्यासारखी बाब म्हणजे ही रॅली कोणत्याही इस्लामी संस्था वा संघटनेनी काढली नव्हती, तर ती निवडणूक आयोगाकडे रीतसर नोंदवलेल्या एआयएमआयएम, या राजकीय पक्षाने काढली होती. त्यांच्या नेत्यांकडून ‘सर तन से जुदा..’चे नारे देण्यात आले हे लक्षात घेतले पाहिजे. हेच एआयएमआयएमसारखे पक्ष नेहमी आपण भारतीय राज्यघटनेशी वचनबद्ध असल्याचे दावा करतात आणि भारतीय संविधान व राष्ट्रीय चिन्हांच्या आडून काढण्यात येणाऱ्या रॅलीच्या माध्यमातून सामाजिक तणाव निर्माण करतात. जातीय सलोख्याला नख लावण्याचे काम करतात. समाजमाध्यमांतून मॉर्फ केलेले फोटो प्रसारित करून इतर समुदायांमध्ये भीती पसरवतात. एआयएमआयएमच्या या रॅलीद्वारेही हेच करण्यात आले.

धर्मगुरूंनी धर्माविषयी भाष्य करणे नवीन नाही. जसे रामगिरी महाराज आपले मत व्यक्त करतात तसेच मुस्लिम धर्मगुरूही इतर धर्मांबद्दलही टिप्पणी करतात. पण, मुस्लिम धर्मगुरूंनी केलेल्या मताला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार म्हणून संबोधले जाते आणि रामगिरी महाराजांसारख्या धर्मगुरूंनी व्यक्त केलेल्या विचारांना धर्मावर हल्ला असे लेबल लावले जाते. निरोगी लोकशाहीला हे मारक आहे. संविधान सर्वांना आणि सर्व परिस्थितीत एकसमानच लागू केले पाहिजे.

मुस्लिम समाजात अशा अनेक धार्मिक प्रथा आणि चालीरीती आहेत ज्यांना नकारात्मक टिप्पणी मिळाली आहे. ट्रिपल तलाक रद्द करण्यात जिथे मुस्लिम धर्मगुरू आणि राजकीय पक्ष अपयशी ठरले त्याची अंमलबजावणी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकारने केली. मुस्लिम महिलांकडून त्याचे स्वागत होत आहे. हे राजकीय पक्ष आणि इस्लामवादी कधीच संविधानात सुचविलेल्या सुधारणांवर चर्चा करणार नाहीत. उलट, राज्यघटना धोक्यात आली आहे अशी बोंब मारत राहतील. आणि अशा प्रवृत्तींना साथ देणारे एआयएमआयएमसारखे राजकीय पक्ष संविधान आणि तिरंग्याच्या गोंडस नावाखाली रॅली काढतात, हे कुठेतरी थांबवले पाहिजे. ज्या संविधानाचा तुम्ही सोयीस्करपणे फडशा पाडता आणि लोकशाहीत हक्क मागण्यासाठी वापर करता, त्याचा वापर तुमच्याशी असहमत असलेल्या धार्मिक नेत्यांना आणि राजकारण्यांनादेखील समान अधिकार प्रदान करते. ते त्यांचे विचार, त्यांचे मत मांडू शकत नाहीत का?

सर तन

‘सर तन से जुदा..’सारख्या घोषणा देण्याची यांची हिम्मत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला देशात आणि खासकरून महाराष्ट्रात मिळालेल्या माफक यशामुळे वाढली आहे. या वर्तनाची वाढती ताकद चिंताजनक आहे. या रॅलीनंतर आमदार नितेश राणे यांनी उपरोधिक प्रतिक्रिया देत रॅलीतील गर्दीची तुलना पोह्यांशी केली आहे. रॅलीतला फोटो शेअर करत त्यांनी ट्विट केले की, आम्ही रोज नाश्त्यात खूप पोहे खातो…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामगिरी महाराजांची उघडपणे बाजू घेत त्यांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, असे मत व्यक्त केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे यांचे समर्थन करताना ते हिंदुत्ववादी नेते असल्याचे स्पष्ट केले आहे. हिंदुत्वाचा मुद्दा ते आक्रमकपणे मांडतात. तथापि भाषणे देताना त्यांनी स्वतःवर थोडा आवर ठेवावा, असे राणे यांना सांगण्यात येईल, असेही फडणवीस म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते शरद पवार यांनी भाजप नेत्यांच्या डोक्यात हवा गेल्याने ते अशी धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करत असल्याचे मत मांडले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी, कोणत्याही धर्माविरोधात बोललेले आम्ही सहन करणार नाही, असे भाष्य केले आहे. काँग्रेस तसेच शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते या वादापासून अलिप्त राहिले आहेत. राष्ट्रवादीच्या या नेत्यांना तसेच काँग्रेस व ठाकरे गटाच्या नेत्यांना संविधानाच्या वेष्टनाखाली काढण्यात येणाऱ्या तिरंगा रॅलीत दिल्या जाणाऱ्या ‘सर तन से जुदा..’च्या घोषणा दिसत नाहीत का? की तेही त्यांच्या सोयीनुसार याच गोंडस शब्दांचा वापर करणार?

1 COMMENT

  1. एकूणएक राजकारणी धर्माच्या नावावर मतदान जवळ आल्यावर आपापली पोळी भाजून घेतात आणि एकगठ्ठा मतांवर डोळा ठेवून ह्याच राजकारण्यांनी त्यांना डोक्यावर चढवून ठेवलंय.

Comments are closed.

Continue reading

विनोद तावडेंचे प्रयत्न फेल, फडणवीसच मुख्यमंत्री! पंकजाही बाहेर!!

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणिस विनोद तावडे यांच्या प्रयत्नांनंतरही महाराष्ट्रात मराठा चेहरा डावलून मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला भारतीय जनता पार्टीच्या शीर्ष नेतृत्त्वाने मान्यता दिली. उद्याच्या शपथविधी कार्यक्रमात मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री म्हणून सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

एकनाथ शिंदेंचे सरेंडर? 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आणि मिळालेल्या पाशवी बहुमतानंतरही महायुतीला तब्बल आठ दिवस सरकार बनवता आले नाही ते केवळ मावळते काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच! मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गृह खात्यासाठी अडून बसलेले एकनाथ शिंदे भारतीय जनता पार्टीपुढे सपशेल...

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाला लागलेय ‘कच्चा चिट्टा’चे ग्रहण!

धरले तर चावते आणि सोडले तर पळते, अशी स्थिती भारतीय जनता पार्टीची आहे तर अजुनी रुसोनी आहे.. अशी स्थिती शिवसेनेचे प्रमुख आणि मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची झाली आहे. याचे मुख्य कारण आहे ते गृह खाते! भाजपा गृह खाते आपल्याजवळ...
Skip to content