आमच्या सरकारने सत्तेवर येताच दिलेले दहा टक्के मराठा आरक्षण रद्द व्हावे, यासाठी न्यायालयात गेलेली व्यक्ती कॉँग्रेसवालीच आहे, असे सांगून मराठा आरक्षणाला कॉँग्रेसवालेच विरोध करताहेत, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांनी शुक्रवारी विधानसभेत केला.
विधानसभेत विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावाच्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण आम्ही दिले आणि त्याविरोधात न्यायालयात कोण गेले आहे? याचिकाकर्ता कोण आहे तर कॉँग्रेसचा माणूस आहे. त्यामुळे आम्ही न्याय देण्याचं काम केलं आहे. तुम्ही सत्य ऐकायची तयारी ठेवा. दिलेले दहा टक्के आरक्षण टिकलं पाहिजे तरच ओबीसी आणि मराठा यांच्यात निर्माण होत असलेली तेढ कमी होईल, असे ते म्हणाले.
तुम्हाला बैठकीला बोलावलं तर पळून जाता. माध्यमांसमोर वेगळी भूमिका घेता, ओबीसींसमोर वेगळी भूमिका, मराठा समाजासमोर वेगळी भूमिका घेता. तुम्ही आमच्याबरोबर या आणि भूमिका घ्या. समाजाचं भलं करू. ओबीसी समाजालाही समजते की आपले कोण आणि परके कोण? राजकीय पोळी भाजायचा प्रयत्न कोण करतंय, याचा विचार मराठा समाज आणि ओबीसीही करतील, यावर आमचा विश्वास आहे. मराठा आरक्षण आम्ही दहा टक्के दिले आणि तुम्ही रद्द करायला निघाले आहात, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
फेक नॅरेटिव्हवर एकदा तुम्ही जिंकलात असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही प्रत्येक तालुक्यात संविधान भवन बांधण्याचा निर्णय घेत आहोत. मी सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलो नाही पण जनतेचं आयुष्य सोन्यासारखं व्हावं, यासाठी प्रयत्न करतोय.
जीव गेला तरी बाळासाहेबांचे विचार आम्ही सोडणार नाही. कार्यकर्ता म्हणून मी काम केलं आणि कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात सेवा करताना शोभून दिसतो. आम्ही घरात बसून नाही तर जनतेच्या दारात जाऊन काम केलं. फिल्डवर काम करणारे लोक आहोत आम्ही. लोकांमध्ये मिसळून त्यांचं ऐकून घेऊन काम करतो. कालही कार्यकर्ता म्हणून, आजही कार्यकर्ता म्हणून आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करेन. माझं कुटूंब माझी जबाबदारी, याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्र माझं कुटूंब, असं काम आम्ही केलं. मला गर्दीची एलर्जी नाही तर गर्दी हे माझं टॉनिक आहे. नाही तर काही लोकांना गर्दी झाली की सर्दी होते, असा टोलाही शिन्दे यांनी लगावला.
अकरा कोटी रुपये भारतीय क्रिकेट संघाला दिले तर तुम्ही प्रश्न विचारता. खरे तर तुम्हाला अभिमान हवा. भारतीय संघ जिंकला यात तुम्हाला आनंद नाही का? भारतीय संघाला गुजरातची बस आली हा काय कद्रूपणा आहे? गुजरातची हळद चालते पण बस चालत नाही. खिसा जरासा हलवला तर अकरा कोटी रुपये मिळतील इतका मोठा खिसा आहे. तुम्ही कसाबच्या बिर्याणीला सपोर्ट करता आणि भारतीय संघाला अकरा कोटी रुपये दिले तर पोटात दुखते, असा सवालही मुख्यमंत्र्यांनी केला.