नवी मुंबईमधील नागरिकांना नागरी सुविधा देण्यासाठी आरक्षित भूखंड सिडकोकडून नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित करण्याच्या प्रश्नावरून माजी मंत्री गणेश नाईक यांनी सरकारवर कडक शब्दांत टीका करत सरकारला घरचा अहेर दिला. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला ५ पैशांची किंमत राहिलेली नाही, असं म्हणत आज अधिकारी बिल्डर्सचे दलाल झाले आहेत, असा खळबळजनक आरोप केला. त्यांच्या आरोपावर सभागृहात खळबळ माजलेली असतानाच नाईक यांनी सरकारला आव्हान देत असेही सांगितले की, सगळे अधिकारी भ्रष्ट आहेत, असे मी म्हणत नाही. पण काही अधिकारी दलाल झाले आहेत आणि हे मी प्रूव्ह करू शकतो. हे मी गांभीर्याने सांगत आहे.
नाईक यांच्या लक्षवेधी सूचनेवर चर्चा सुरू होताना त्यांनी आपले म्हणणे मांडतामांडता हा गंभीर आरोप केला आणि सभागृहात खळबळ माजली. नवी मुंबई महापालिकेकडे भूखंड आरक्षित करण्याच्या संदर्भात अनेकदा बैठका, स्मरणपत्रे, न्यायालयाच्या तारखा असे सारे झाले. पण अधिकारी दाद देत नाहीत आणि काही अधिकारी तर बिल्डरांचे दलाल झाले आहेत, असा आरोप नाईक यांनी केला.
वास्तविक, नाईक आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेन्द्र आव्हाड यांचे विळ्याभोपळ्याचे नाते असूनही आमदार जितेन्द्र आव्हाड यांनी या आरोपांनंतर सभागृहात गणेश नाईक यांची वाहव्वा केली. इतकेच नव्हे तर सत्ताधारी बाकांवर सर्वात पुढे शांतपणे हे सर्व ऐकत असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बघत आव्हाड यांनी नाईक यांचे जाहीर कौतुक केले आणि ते म्हणाले, हे खरे दादा आहेत.
अजित पवार यांचा संभाषणांमध्ये, गप्पांमध्ये होणारा अजितदादा हा उल्लेख आणि अजित पवारांशी सध्या असलेले आव्हाड यांचे संबंध ही पार्श्वभूमी आव्हाड यांच्या टिप्पणीला होती. तरीही जितेन्द्र आव्हाड यांनी केलेली हे खरे दादा, या टिप्पणीनंतर सभागृहात विरोधी पक्षातीलदेखील मोजक्याच आमदारांनी त्यांना दाद दिली.