राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्यामार्फत शैक्षणिक वर्ष 2024-25करिता डी.एल.एड. (D.El.Ed) प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 25 जून 2024पर्यंत वाढवण्यात आली आहे.
याआधी डी.एल.एड. (D.El.Ed) प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 18 जून 2024पर्यंत होती. तथापि बऱ्याच संस्था, लोकप्रतिनिधी व संघटनांनी मागणी केल्यामुळे हे अर्ज भरण्यासाठी 25 जून 2024पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे राज्यस्तरीय डीएलएड प्रवेश निवड, निर्णय व प्रवेश संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांनी जाहीर केले आहे.
याबाबतच्या सर्व सूचना, प्रवेशपात्रता इ. बाबी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच ऑनलाईन अर्ज भरल्यानंतरचे फेरीनिहाय सविस्तर सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासाठी उमेदवारांनी व शैक्षणिक संस्थांनी वेळोवेळी संकेतस्थळ पाहण्याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.