Sunday, December 22, 2024
Homeमाय व्हॉईसराज ठाकरे बोललेच...

राज ठाकरे बोललेच आहेत तर हेही वाचा!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे ठाणे कळवा पट्ट्यात नुकतंच झालेलं भाषण ऐकलं. कधी नव्हे ते या निवडणूक प्रचारात राज ठाकरेंनी आपला पक्ष फोडला.., आपला पक्ष चोरला.., आपलं चिन्ह चोरलं.. म्हणून आदळआपट करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद्चंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना चांगलीच चपराक दिली. शरद पवार यांनीच पहिल्यांदा फोडाफोडीचे राजकारण या महाराष्ट्रात सुरू केलं, असे राज ठाकरे म्हणाले. बहुदा ते खरंच असावं.. अलीकडच्या इतिहासातली ती पहिलीच नोंद आहे.

राज ठाकरे

१९७८ साली याच शरद पवारांनी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि तेव्हाचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडत एका रात्रीत विरोधी पक्षांबरोबर हातमिळवणी केली. पुलोदचे सरकार स्थापन केले. वयाच्या ३८व्या वर्षी झालेले तरुण मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांच्या नावाची नोंदही झाली. पण त्याचवेळेपासून शरद पवार या राजकीय नेत्यावर राजकारणातल्या बहुतांश नेत्यांनी फुली मारली. चोरों के भी हुसूल होते हैं.., या उक्तीप्रमाणे शरद पवार यांनी वसंतदादांचा ज्या प्रकारे घात केला तो तेव्हाही अनेक नेत्यांना पटला नव्हता आणि आजही पटत नाही. तेव्हापासूनच शरद पवार यांना राजकारणातले अत्यंत धूर्त, कावेबाज आणि घातकी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात आहे. शरद पवार यांच्या गोटात याला राजकारणातले डावपेच म्हणून संबोधले जात असले तरी सध्याच्या राजकारणातल्या दुर्दशेची बीजे ही तेव्हाच पेरली गेली होती हे लक्षात घेतले पाहिजे.

राज ठाकरे

राज ठाकरेंनी आपल्या भाषणात शरद पवार यांनी फोडाफोडीचे राजकारण कसे सुरू केले हे सांगताना हा किस्सा सांगितला खरा. पण तोच किस्सा सांगण्यासाठी पवार यांचे पुतणे अजित पवार मात्र धजावले नाहीत. कदाचित सहानुभूतीच्या वावटळीत आपण भरडले जाऊ नये म्हणून सावधगिरीचा मार्ग त्यांनी अवलंबला असावा. गेली ३५ वर्षं अजित पवार शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली त्यांच्या प्रत्येक व्यूहरचनेवर मम म्हणत होते. मात्र भाजपाप्रणित महायुतीच्या सरकारमध्ये सामील होताना तसंच राष्ट्रवादी काँग्रेसवर

दावा करताना त्यांनी काकांची फोडाफोडीची ही दगाबाजी माध्यमांसमोर कधीच मांडली नाही. किंबहुना आता लोकसभा निवडणुकीत जेव्हा पुतण्याविरोधात काकांनी आपले पूर्ण खानदान उतरवले तेव्हाही अजितदादांनी याबाबत मौनच पाळले. थोडेसे आढेवेढे घेत आडमार्गाने त्यांनी तसे सांगण्याचा प्रयत्न केला. २०१४मध्ये भाजपाला सरकार स्थापनेसाठी शरद पवारांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तो एक स्ट्रॅटेजीचा भाग होता. म्हणजे त्यांनी केली तर स्ट्रॅटेजी आणि आम्ही केली तर गद्दारी.. असे दादा म्हणाले. पण त्यांच्या या म्हणण्यात तो जोर नव्हता जसा त्यांनी निलेश लंके आणि अशोक पवार या दोघांना आपल्या निवडणूक प्रचारात दिलेल्या दमदाटीत होता.

राज ठाकरे

याच शरद पवारांनी काँग्रेसमध्ये असताना, बाळासाहेब ठाकरे सक्रिय असताना छगन भुजबळ यांना त्यांच्या समर्थकांसह फोडून काँग्रेसमध्ये नेले, याची आठवणही राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणातून करून दिली. तेव्हाची शिवसेना एकाधिकारशाही मानणारी संघटना होती. याच कारणांमुळे ठाण्यात त्या काळातले नगरसेवक श्रीधर खोपकर यांनी आपले मत विरोधकाच्या पारड्यात टाकल्याच्या संशयावरून त्यांचा खून पाडण्यात आला होता. शिवसेनेशी जो पंगा घेईल त्याला या जगात श्वास घेता येणार नाही, अशी दहशत निर्माण करण्यात तेव्हाच्या शिवसेनेला यश आले होते. आणि याच पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांचे फुटणे फार महत्त्वाचे ठरले. नागपूरमध्ये विधिमंडळाच्या अधिवेशनात हे सारे नाट्य घडवून याच शरद पवारांनी तेव्हाच्या शिवसेनेला म्हणजेच माननीय बाळासाहेबांच्या शिवसेनेला आपली कलाकारी दाखवली होती. आज त्याच कलाकाराबरोबर आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्याच बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव ठाकरे आपले पुढचे राजकारण ठरवत आहेत हे जाणून घेतले पाहिजे.

राज ठाकरे

राज ठाकरेंनी याच भाषणात उद्धव ठाकरेंच्या फोडाफोडीच्या राजकारणालाही प्रकाशात आणले, त्यांना आपल्यासाठी प्रचार करायला सांगणारे शिवसेनेचे मुख्य नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात आतापर्यंत बोलू शकले नाहीत. राज ठाकरे म्हणाले की, याच उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिकेच्या मागच्याच निवडणुकीनंतर आपल्या सात नगरसेवकांपैकी सहा नगरसेवकांना खोके खोके देऊन आपल्या पक्षात घेतले. त्यांनी माझ्याकडे मागितले असते तर मी असेच देऊन टाकले असते. राज ठाकरेंचा हा मुद्दा अत्यंत मार्मिक आहे. आपल्याला मुंबई महापालिकेमध्ये पूर्ण बहुमत मिळावे याकरीता याच उद्धव ठाकरेंनी मनसेचे सहा नगरसेवक फोडून कॅमेरासमोर त्यांच्या हाताला शिवबंधन बांधले होते. दिलीप लांडे, अर्चना भालेराव, स्नेहल मोरे, दत्ता नरवणकर, परशुराम कदम आणि अश्विनी मतेकर हे ते नगरसेवक होते. अनेकांना या गोष्टी आज स्मरत नसतील. पण हे सत्य आहे. तुम्ही जे केले ती राजकीय खेळी आणि भाजपाने जी केली ती फोडाफोडी? याला अर्थ काय?

राज ठाकरे

आपला पक्ष वाढविण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष दुसऱ्या पक्षांतल्या नेता-कार्यकर्त्यांना नेहमीच आपल्याकडे ओढत असतो. विविध पदे देत, अधिकार देत त्यांना आपल्याकडे टिकवत असतो. आज राज ठाकरे ज्या भाजपाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचारासाठी फिरत आहेत, त्याच राज ठाकरेंच्या मनसेमधून आमदार प्रवीण दरेकर भाजपात गेले. पुढे त्यांना विधान परिषदेचे सदस्यत्व आणि नंतर विरोधी पक्षनेतेपदही देण्यात आले. सध्या ते पक्षाचे परिषदेतले गटनेते आहेत. भाजपाचे राज्यातले एक प्रमुख भाजपा नेते म्हणून ते ओळखले जातात. इतकेच कशाला? राज ठाकरे यांनी मनसे जेव्हा स्थापन केली तेव्हाही शिवसेनेत उभी फूटच पडली होती. शिवसेनेचे तेव्हाचे कितीतरी नेते आपापल्या समर्थकांसह राज ठाकरेंबरोबर गेले. या लोकांना आपण फोडले नाही, फोडाफोडीचे राजकारण आपल्याला कधीही मान्य नव्हते आणि मान्य नसणार हे राज ठाकरे कितीही ठासून सांगत असले तरी मनसेच्या स्थापनेच्या वेळी त्यांच्यासोबत आलेल्या बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिशिर शिंदे, अशा कितीतरी नेत्यांना राजही परतवू शकले नाहीत हे वास्तव आहे. यातले काही पुन्हा शिवसेनेत गेले तर काही इतर पक्षांत. तो भाग वेगळा..

राज ठाकरे

राज ठाकरे यांनी आणखी एक मुद्दा मांडला जो नारायण राणे यांच्या संदर्भातला आहे. नारायण राणे आणि त्यांच्या सहकारी आमदारांना त्यावेळी काँग्रेसने फोडले. या प्रक्रियेत या सर्व आमदारांनी आपापल्या आमदारकीचा राजीनामाही दिला. त्यानंतर हे सर्व पुन्हा पोटनिवडणुकीच्या माध्यमातून निवडणुकीच्या आखाड्यात उतरले. त्यातले बहुसंख्य विजयी झाले आणि काहींचे राजकीय भवितव्य अंधाराकडे सरकले. राज ठाकरेंचा इशारा होता तो काँग्रेसकडे. म्हणजे त्यांना म्हणायचे होते की ज्या काँग्रेसने बाळासाहेबांच्या हयातीत शिवसेना फोडली त्याच काँग्रेसबरोबर राहून आज उद्धव ठाकरे सत्तेचे गणित जुळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

राज ठाकरे

मला यामध्ये भर टाकायची आहे. नारायण राणेही काही धुतल्या तांदळासारखे नाहीत. त्यांचे हऱ्यानाऱ्यापासून कोंबडीचोरापर्यंतच्या अनेक दंतकथा आजही जुने जाणकार सांगतात. मनोहर जोशींचे चांगले चाललेले सरकार पाडण्यात म्हणजेच मनोहर जोशींना राजीनामा देण्यासाठी सांगण्यास बाळासाहेबांना भाग पाडण्यात राणे यांनी कोणता मार्ग अवलंबला याची चर्चा आजही अनेक ठिकाणी केली जाते. पुढे मुख्यमंत्री असताना राणे यांनी केंद्रातल्या भाजपा आघाडी सरकारच्या ‘फिल गुड’च्या नादाला लागून सहा महिने आधीच सरकारचा राजीनामा दिला आणि हातातली सत्ता गमावली, ही बाब वेगळी. पुढे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर मजल दरमजल करत आता उतारवयात त्यांना भाजपाकडून लोकसभा निवडणूक लढवावी लागली आहे, याचीही नोंद घेतलेली बरी..

राज ठाकरे

याच राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणात त्यांनी शिवसेनेच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे यांचा एक जुना व्हिडिओ दाखवला. त्यामध्ये सुषमा अंधारे, माननीय बाळासाहेबांना म्हातारा म्हणत कसे हिणवत आहेत हे राज यांनी दाखवून दिले. सुषमा अंधारेंनीही लगेचच आपली बाजू मांडताना ती आपली पूर्वीची भूमिका होती हे स्पष्ट केले. त्याचबरोबर त्यांनी राज ठाकरे सुपारी घेत कशी भाषणे करतात हे दाखवण्याचाही प्रयत्न केला. राज ठाकरेंनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर केला असला तरी याच मोदींवर त्यांनी कशी जहरी टीका केली होती याची आठवण अंधारेंनी करून दिली.

राज ठाकरे

प्रत्यक्षात पाहिले तर अंधारेंचे म्हणणे उजेडात ऐकण्यासारखेच आहे. आज राजकीय सारीपाटावर वावरणारे प्रत्येक नेते, मग ते कोणीही असोत, प्रत्येकाने सोयीप्रमाणे आपापली राजकीय भूमिका बदलली आहे. आणि तसे करताना त्यांनी कोणत्याही भावनिक गोष्टी यामध्ये आणलेल्या नाहीत. आई-बाप, सासू-सासरे, काका-पुतण्या, भाऊ-बहीण, अशी सर्व नाती नात्याच्याच ठिकाणी ठेवत या साऱ्या नेत्यांनी दाखवून दिले आहे की राजकारणात कोणी  कधीही कुणाचा कायम शत्रू नसतो आणि मित्रही… इतिहास तसाच सोयीनुसार इतिहासजमा केला जातो आणि सर्वसामान्य मात्र या नेत्यांमधल्या अभिनेत्याकडे पाहत राहतो.

Continue reading

एकनाथ शिंदेंचा भाजपाने केला ‘करेक्ट कार्यक्रम’?

नाकापेक्षा मोती जड.. चाय से किटली गरम.. अशा काही म्हणी माणसाला अनेक गोष्टी शिकवून जातात. त्यातलीच एक म्हण काल शिवसेनेचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आठवली असावी. गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारमध्ये सहभागी व्हायचे की नाही इथपासून उपमुख्यमंत्रीपद...

विनोद तावडेंचे प्रयत्न फेल, फडणवीसच मुख्यमंत्री! पंकजाही बाहेर!!

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणिस विनोद तावडे यांच्या प्रयत्नांनंतरही महाराष्ट्रात मराठा चेहरा डावलून मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला भारतीय जनता पार्टीच्या शीर्ष नेतृत्त्वाने मान्यता दिली. उद्याच्या शपथविधी कार्यक्रमात मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री म्हणून सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

एकनाथ शिंदेंचे सरेंडर? 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आणि मिळालेल्या पाशवी बहुमतानंतरही महायुतीला तब्बल आठ दिवस सरकार बनवता आले नाही ते केवळ मावळते काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच! मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गृह खात्यासाठी अडून बसलेले एकनाथ शिंदे भारतीय जनता पार्टीपुढे सपशेल...
Skip to content