गोव्यातील मे. गोवा शिपयार्ड लिमिटेड येथे पहिल्या नेक्स्ट जनरेशन ऑफशोअर पॅट्रोल व्हेसल्समधील पहिल्या अपतटीय गस्ती जहाजाचा नौकातल भरणी अर्थात जहाजबांधणी समारंभ नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युद्धनौका उत्पादन आणि अधिग्रहण नियंत्रक व्हाईस अॅडमिरल बी. शिव कुमार, गोवा शिपयार्ड लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बी. के. उपाध्याय आणि भारतीय नौदल व मे. गोवा शिपयार्ड लिमिटेडमधले वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अशा 11 गस्ती जहाजांच्या संरचना आणि बांधणीसाठी संरक्षण मंत्रालय व मे. गोवा शिपयार्ड लिमिटेड, गोवा आणि मे. गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स,(जीआरएसई), कोलकाता यांच्यात 30 मार्च 23
रोजी करार झाले. त्यानुसार सुरुवातीला सात नौका मे. गोवा शिपयार्ड लिमिटेडने तर चार नौका जीआरएसईने बांधायच्या आहेत.
नेक्स्ट जनरेशन ऑफशोअर पॅट्रोल व्हेसल्सचा वापर तस्करी प्रतिबंध, तटीय सुरक्षा आणि टेहळणी, शोध व बचाव, तटीय मालमत्तेचे संरक्षण या मोहिमांसाठी केला जाईल. ही जहाजे भारतीय नौदलाला हिंद महासागर क्षेत्रात राष्ट्राच्या आर्थिक आणि भू-राजकीय हितसंबंधांचे संरक्षण करण्यासाठी आपली लढाऊक्षमता वृद्धींगत करण्यात साहाय्यभूत ठरतील. भारतीय नौदलाच्या स्वदेशी जहाजबांधणीच्या प्रयत्नात हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि ‘आत्मनिर्भर भारत’ व ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांशी सुसंगत आहे.