अयोध्येत राममंदिर झाले. त्याचसोबत अयोध्येत बाबरी मशीदीचेही काम सुरू आहे. हे कधी ते लोक सांगत नाहीत. मात्र मुस्लिम समाजाच्या मतांसाठी व्हॉट्सएपच्या माध्यमातून मेसेज केले जातात. सामाजिक सामंजस्य जपणारे आम्ही आहोत. परंतु कुणी कुणाच्या नावाने दंगा करण्याचा प्रयत्न करतील तर त्यांचे धंदे काढायला मला वेळ लागणार नाही, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व रायगड लोकसभा मतदारसंघातले उमेदवार सुनील तटकरे यांनी दिला.
सामाजिक सलोखा ज्यांना बघवत नाही ते धर्माधर्मामध्ये, जातीजातीमध्ये मतांच्या बेगमीसाठी अंतर निर्माण करत आहेत, असे ते महाड शहरातील प्रचारसभेत सोमवारी केले. फाळणी होत असताना शेजारच्या देशात गेले त्यांना मातृभूमीत परत यायचे असेल तर त्यांच्या वास्तव्याची अट शिथिल करणारा सीएएचा कायदा आहे. या देशातील राष्ट्रभक्त मुस्लिमांमध्ये चुकीचे काही घडणार नाही. माझे आवाहन आहे, उद्धव ठाकरे, अनंत गीते यांना.. की त्यांनी सीएए कायदा काय आहे हे जनतेला सांगावे. पण समाजासमाजामध्ये जाणीवपूर्वक अंतर निर्माण करण्याचा प्रयत्नही जातीयवादी मंडळी करत आहेत, असेही ते म्हणाले.
व्हॉट्सएप मेसेजच्या निमित्ताने आमच्यामध्ये अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न कोण करत असेल तर या परिसरातील, देशातील, राज्यातील मुस्लिम समाजाने आमचा धर्मनिरपेक्ष विचार बघावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक समानता दिली. त्यामुळेच या देशामध्ये लोकशाही व्यवस्था जिवंत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या या राजधानीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक हुंकार महाडच्या नगरीमधून दिला. आज तिथे सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम होतेय, असेही सुनील तटकरे म्हणाले.
आपले उमेदवार किती लाख मतांनी विजयी होणार आहे हेच चित्र स्पष्ट व्हायचे आहे. त्यामुळे येत्या ७ मे रोजी तटकरे यांना मोठया मतांनी विजयी करा असे आवाहन पालकमंत्री आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना जशी सलामी दिली जाते तशी सलामी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही चवदार तळ्यावरील पुतळ्यासमोर देण्यास सुरूवात केली आहे. इतकी वर्षे अनंत गीते का असे काम करु शकले नाही, असा सवाल आमदार भरत गोगावले यांनी केला.
तटकरेंना देशाच्या हितासाठी निवडून द्यायचे आहे. या रायगडचा मावळा केंद्रात मंत्री झाला पाहिजे असे आवाहनही आमदार भरत गोगावले यांनी केले. अमोल मिटकरी, अदिती तटकरे यांचीही यावेळी भाषणे झाली.