कर चुकवेगिरी प्रकरणात महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाने (जीएसटी) ६ कोटी ४० लाख रुपयांचा घोटाळा नुकताच उघडकीस आणला आहे. बोगस बिलांसंदर्भात जीएसटी विभागाकडून सुरू असलेल्या धडक मोहिमेअंतर्गत कमलेश बाबुलाल जैन (वय ६१) आणि भावना कमलेश जैन (वय ६१) या दोन संचालकांना काल अटक करण्यात आली, अशी माहिती राज्य कर उपायुक्त राजेंद्र टिळेकर यांनी दिली.
मे. मोनोपोली इनोव्हेशन्स प्रा.लि. या कंपनीविरोधात वस्तू व सेवाकर विभागाकडून अन्वेषण कारवाई सुरू करण्यात आली होती. कारवाईदरम्यान या व्यापाऱ्याने नोंदणी दाखला रद्द झालेल्या व्यापाऱ्याकडून खरेदी व विक्री दाखवून ६.४० कोटी रुपयांची महसूल हानी केल्याचे दिसून आले. या व्यापाऱ्याने नोंदणी दाखला रद्द झालेल्या व्यापाऱ्याकडून खरेदी दाखवून ३.२३ कोटी रुपयांची चुकीची कर वजावट घेऊन तसेच मालाशिवाय फक्त बिले देऊन ३.१७ कोटी रुपयांची शासनाची महसूल हानी केल्याचे निदर्शनास आले.
महानगर दंडाधिकारी न्यायालयात त्यांना हजर केले असता न्यायालयाने आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. ही धडक कारवाई राज्य कर सहआयुक्त प्रेरणा देशभ्रतार आणि उपायुक्त राजेंद्र टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त डी. के. शिंदे यांनी राबविली. या कार्यवाहीत सर्व राज्यकर निरीक्षकांचे महत्त्वाचे योगदान राहिले.
सर्व समावेशक नेटवर्क विश्लेषण साधनांचा वापर करुन आणि इतर विभागांशी समन्वय साधून महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभाग कर चुकवणाऱ्या व्यापाऱ्यांचा शोध घेत आहे. या मोहिमेद्वारे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाद्वारे २०२४-२५ या आर्थिक वर्षात पहिल्याच अटक कारवाईद्वारे कर चुकवेगिरी करणाऱ्यांना इशारा देण्यात आला आहे.