Tuesday, December 24, 2024
Homeब्लॅक अँड व्हाईटदेशातल्या ८ शहरांत...

देशातल्या ८ शहरांत ३ महिन्यांत झाली सव्वालाख घरांची विक्री!

गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही देशात घरखरेदीचा जोर कायम असून यावर्षीच्या पहिल्या तीन महिन्यांत देशातल्या आठ प्रमुख शहरांत एकूण १,२०,६४० घरांची विक्री झाली आहे. विशेष म्हणजे या गृहविक्रीच्या माध्यमातून तब्बल १,१०,८८० कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत गृहविक्रीमध्ये ४१ टक्क्यांची वाढ झाली असल्याचे प्रॉपटायगरडॉटकॉमच्या रियल इनसाइट रेसिडेंशियल – जानेवारी–मार्च २०२४’ अहवालातून उघड झाले आहे. गेल्या वर्षी जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये देशातल्या ८ प्रमुख शहरांत ८५,८४० घरांची विक्री झाली होती.

देशात पहिल्या तीन महिन्यांत झालेल्या घरांच्या विक्रीमध्ये सर्वाधिक विक्री मुंबई आणि पुणे येथे झाली असून या शहरांतील गृहविक्रीचा आकडा ६५,७००वर पोहोचला आहे. यापैकी मुंबईतील घरांची विक्री सर्वाधिक असून पहिल्या ३ महिन्यांत मुंबईत ४१,५९० घरांची विक्री झाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर पुणे शहर असून पुण्यात एकूण २३,११० घरांची विक्री झाली आहे. गृहविक्रीमध्ये यापाठोपाठ हैदराबाद (१४,२९०), अहमदाबाद (१२,९२०), बेंगळुरू (१०,३८०), दिल्ली-एनसीआर (१०,०६०), चेन्नई (४,४३०) आणि कोलकाता (३,८६०) या शहरांचा क्रमांक लागतो.

प्रॉपटायगर डॉटकॉमचे व्यवसाय प्रमुख आणि आरईए इंडियाचे ग्रुप सीएफओ विकास वाधवान म्हणाले की, आकारमान आणि मूल्याच्या बाबतीत निवासी मालमत्ता विक्रीतील वाढ एकंदर अर्थव्यवस्थेसाठी शुभ म्हटली पाहिजे. सिमेंट आणि स्टीलसहित २००पेक्षा जास्त साहाय्यक उद्योग रियल इस्टेट क्षेत्रावर अवलंबून आहेत. त्यामुळे ही गृहविक्री सुखावह आहे. भारतातील हाऊसिंग मार्केटची घोडदौड जबरदस्त सुरू असून ८ प्रमुख शहरांत गृहविक्री झपाट्याने वाढत आहे. आपल्या मालकीचे घर घेण्याची प्रबळ इच्छा, मजबूत विकास, स्थिर तारणदर ही यामागील मुख्य कारणे आहेत. जसजसा गुंतवणूकदारांचा विश्वास हळूहळू पुनर्जीवित होत आहे आणि त्याला अनिवासी भारतीयांच्या मजबूत मागणीची जोड मिळत आहे. घरांच्या मागणीचा आलेख, किंमतीतील काही अनपेक्षित चढउतार वगळता, दमदार वृद्धीसाठी तयार झालेला दिसत आहे.

प्रॉपटायगर डॉटकॉम आणि हाऊसिंग डॉटकॉमची संशोधन प्रमुख अंकिता सूद म्हणाल्या की, गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत मालमत्ता विक्रीच्या एकंदर व्यवहार मूल्यात ६८% इतकी असामान्य वाढ झाली आहे. उल्लेखनीय गोष्ट ही आहे की, मुंबई, हैदराबाद, दिल्ली एनसीआर आणि पुणे यांचा एकत्रित वाटा १.११ लक्ष कोटी रुपयांच्या एकंदर व्यवहार मूल्यात ७६% इतका आहे. या वृद्धीवरून केवळ वाढती मागणी लक्षात येत नाही, तर प्रमुख व्यावसायिक जिल्ह्यांत मालमत्तेच्या किंमतीतील १५-२० टक्क्यांची लक्षणीय वाढदेखील दिसून येते. येत्या दोन तिमाहींमध्येसुद्धा वाढीचा हा आलेख आर्थिक वृद्धी आणि मजबूत मागणीचा रेटा मिळून आणखी वर वर जाईल अशी अपेक्षा आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत २०२४च्या पहिल्या तीन महिन्यांत गृहविक्री मूल्यात सर्वाधिक वाढ दिल्ली एनसीआर १२,१२० कोटी (२४९ टक्के) झाल्याचे दिसून आले असून यानंतर हैदराबाद २३,५८० कोटी (१४३ टक्के), अहमदाबाद ९,०९० कोटी (१३० टक्के), कोलकाता २,००० कोटी (५९ टक्के), बेंगळुरू ११,३१० कोटी (५२ टक्के), पुणे १५,१५० कोटी (३२ टक्के), मुंबई-एमएमआर ३४,३४० कोटी (३१ टक्के) आणि चेन्नई ३,२९० कोटी (२२ टक्के) या शहरांचा क्रमांक लागतो.

क्षेत्रफळाच्या बाबतीत घरांची विक्री ९९ दशलक्ष चौरसफुटांपासून ६३% वाढून १६२ दशलक्ष चौरस फुटांवर पोहोचली आहे. यात दिल्ली एनसीआर (१८४ टक्के) आघाडीवर असून यानंतर हैदराबाद (१२८ टक्के), अहमदाबाद (१०८ टक्के), कोलकाता (४९ टक्के), बेंगळुरू (३९ टक्के), मुंबई-एमएमआर (२६ टक्के), पुणे (२१ टक्के) आणि चेन्नई (१६ टक्के) या शहरांचा क्रमांक लागतो.

या अहवालात म्हटले आहे की, एकंदर व्यवहाराचे मूल्य किंवा विक्री मूल्य २०२४च्या पहिल्या तिमाहीदरम्यान एका शहरात विकल्या गेलेल्या मालमत्तेच्या एकंदर मूल्याशी संबंधित आहे. विकलेल्या एकंदर घरांच्या संख्येला वेटेड अॅव्हरेज प्राइसने गुणून व त्यात मालमत्तांच्या वेटेड अॅव्हरेज साइझने गुणून हे मूल्य प्राप्त करण्यात येते. मूलतः ते निर्दिष्ट कालावधीत त्या शहरातील सर्व विक्री व्यवहारांचे मौद्रिक मूल्य समाविष्ट करते.

Continue reading

कर्तबगार अधिकाऱ्याची सत्यकथा ‘आता थांबायचं नाय’!

बृहन्मुंबई महानगरपालिका, आशियामधील सर्वात श्रीमंत समजली जाणारी भारतातील मानाची महानगरपालिका, याच महापालिकेच्या सहकार्याने आणि प्रेरणेने तयार होत आहे, 'झी स्टुडिओज'चा आगामी मराठी चित्रपट, 'आता थांबायचं नाय'! 'झी स्टुडिओज', 'चॉक अँड चीज' आणि 'फिल्म जॅझ' प्रॉडक्शनची एकत्र निर्मिती असलेल्या 'आता थांबायचं...

परभणीतील सूर्यवंशी मृत्यूप्रकरणीही न्यायालयीन चौकशी

परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी न्यायालयीन चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. संविधानाच्या प्रतिकृतीच्या कथित विटंबनेवरून परभणीमध्ये १० डिसेंबरला हिंसाचार उसळला होता आणि त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू ओढवला होता. विधानसभेत या विषयावर गेले दोन...

सन्मित्र क्रीडा मंडळ अजिंक्य

मुंबईत कांदिवली येथे झालेल्या मुंबई उपनगर कबड्डी संघटनेच्या ४२व्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पूर्व विभागाच्या द्वितीय श्रेणी पुरुष गटात सन्मित्र क्रीडा मंडळ, घाटकोपरने जेतेपद पटकावले. अंतिम फेरीत सन्मित्रने साई स्पोर्ट्स क्लब, भांडूप यांच्यावर ७ गुणांनी विजय मिळवला. सन्मित्र...
Skip to content