Homeमाय व्हॉईसलेकीसाठी सारे काही...

लेकीसाठी सारे काही…

देशात लोकसभा निवडणुकीची चाहूल लागली आणि महाराष्ट्रातले काही बडे राजकीय नेते आपल्या लेकीसाठी पुढची तजवीज करण्यात गुंग झाले. यात प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तो पूर्वीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा. आपला वारसा पुढे चालवण्यासाठी त्यांनी बारामतीच्या खासदार असलेल्या आपल्या कन्या सुप्रिया सुळे यांना निवडले. आणि मग सुरू झाले लेकीसाठी सारे काही…

तसे पाहिले तर शरद पवार जेव्हा मुख्यमंत्री होते, त्यानंतर केंद्रात संरक्षणमंत्री होते त्या काळात अजित पवार, या आपल्या पुतण्याला शरद पवारांनीच पुढे आणले होते. आमदार आणि नंतर राज्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवासही सुरू झाला. पण तेव्हा सुप्रिया सुळे यांचे नाव कुठेच नव्हते. शरद पवार यांना एक मुलगी आहे एव्हढेच बोलले जात होते. अगदी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना 1999 साली झाली तेव्हाही सुप्रिया सुळे यांचा राजकीय पटलावर उदय झालेला दिसत नव्हता. मात्र 2009 साली त्यांची उपस्थिती प्रकर्षाने जाणवली जेव्हा त्या पहिल्यांदा बारामतीतून लोकसभेसाठी निवडून आल्या. त्यानंतर 2014 तसेच 2019 या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी बारामतीचा गड राखला.

लेकीसाठी सारे काही

सतत तीन वेळा खासदार राहिलेल्या सुप्रिया सुळेंकडे संपूर्ण पक्ष सोपवावा असा विचार शरद पवार यांनी केला आणि तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुटीची बिजे अंकुरली. पक्षांतर्गत ही धुसफूस गेल्या काही वर्षांपासून दिवसागणिक वाढतच होती आणि आणि त्यात पक्षाचे प्रमुख दावेदार होते अजित पवार. राजकारणामध्ये सुप्रियाताईंच्या बरेच आधी सक्रिय झालेले अजितदादा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे फुटीच्या आधी जे स्थान होते ते मिळवून देण्यात मोठी जबाबदारी पेलली होती. संघटनात्मक बांधणी तसेच पक्षावरील पकड यामध्ये अजितदादांचा हात कोणी धरत नव्हता. अजितदादांची साथ असल्यामुळेच सुप्रिया सुळे यांना बारामतीतून सतत तीन वेळा लोकसभेवर जाता येणे शक्य झाले. मात्र जेव्हा शरद पवार निवृत्तीकडे झुकले आणि त्यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन आडमार्गाने सुप्रिया सुळेंकडे पक्षाध्यक्षपद सोपविण्याचा प्रयत्न केला तेव्हा दादांमधला बंडखोर उफाळून आला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला कसे फोडता येईल याची संधी शोधणाऱ्या भारतीय जनता पार्टीला आयते कोलीत मिळाले. परिणामी अजितदादांना सत्तेत वाटा मिळाला आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. पुढे तर राष्ट्रवादी काँग्रेस, हे नाव आणि घड्याळ हे चिन्हही अजितदादांच्या पदरात पडले. त्यामुळे लेकीचे भले करण्याच्या प्रयत्नात आज 80च्या घरात वावरत असलेल्या शरद पवारांना पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रभर फिरावे लागत आहे. इतकेच नव्हे तर त्यासाठी आपल्या नातवाला (रोहित पवार नव्हे तर युगेंद्र पवार), अजितदादांचे सख्खे बंधू श्रीनिवास आणि त्यांच्या पत्नी शर्मिला पवार यांनाही बारामतीत सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी उतरवावे लागले!

लेकीसाठी सारे काही

तशीच काहीशी गत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचीही झाली आहे. त्यांची मुलगी प्रणितीही राजकारणात सक्रिय आहे. आपला वारसा आपली मुलगी प्रणिती हिने चालवावा या प्रयत्नात सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या वजनाचा पुरेपूर वापर करत विधानसभेसाठी प्रणितीला उमेदवारी मिळवून देण्यात यश मिळवले. त्यानंतर सतत तीन वेळा त्या सोलापूर शहर मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेल्या आहेत. 2021पासून प्रणिती शिंदे प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षदेखील आहेत. वयाच्या 82व्या वर्षी निवडणुकीच्या राजकारणातून बाजूला होत असलेल्या सुशीलकुमार शिंदे यांनी यावेळी मात्र आपली कन्या प्रणिती शिंदे यांना काँग्रेसकडून लोकसभेची उमेदवारी मिळवून दिली आहे. त्यांच्या विरोधात महायुतीकडून भारतीय जनता पार्टीचे राम सातपुते निवडणूक लढवत आहेत. सातपुते सोलापूर जिल्ह्यातलेच आहेत. मात्र ते सोलापूर शहरातले स्थानिक नसल्यामुळे प्रणिती यांनी स्थानिक उमेदवाराचा मुद्दा उचलून धरला आहे. आपल्या स्थानिक उमेदवारीचा दाखला पुढे करत प्रणिती यांनी सोलापूरची लेक आपले स्वागत करीत आहे, अशा आशयाचे पत्र सातपुते यांना उद्देशून लिहून त्या गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत आल्या आहेत. मुलीला उमेदवारी मिळवून देण्यापासून निवडून आणेपर्यंत सुशीलकुमार शिंदे सक्रिय राहणार असल्याची  चिन्हे दिसत आहेत. चार जूनला प्रत्यक्ष मतमोजणीच्या दिवशी सुशीलकुमार शिंदे यांचे प्रयत्न यशस्वी ठरतात की नाही हे स्पष्ट होईल.

लेकीसाठी सारे काही

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हेही आपल्या कन्या शिवानी यांना राजकारणात पुढे आणण्यासाठी धडपडत आहेत. लोकसभा निवडणुकीत चंद्रपूरच्या जागेवर शिवानी यांना उमेदवारी मिळावी याकरीता वडेट्टीवार यांनी काही दिल्ली वाऱ्याही केल्या. पक्षाच्या दिल्लीतल्या नेत्यांची मनधरणी केली. परंतु त्यांची डाळ काही शिजली नाही. मागच्या वेळेचे काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांच्या आकस्मिक निधनानंतर त्या जागेवर निवडून आलेल्या त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांनी या जागेसाठी हट्ट धरला होता. त्याकरीता त्यांनीही दिल्लीवारी केली आणि नागपूरला परतताना उमेदवारी घेऊनच त्यांनी विमानाबाहेर पाय टाकला. विमानतळावर प्रतिभा धानोरकर यांचे काँग्रेसच्या बहुतांश नेत्यांनी जोरदार स्वागत केले. मात्र या नेत्यांमध्ये वडेट्टीवार दिसून आले नाहीत. धानोरकर यांनीही उमेदवारीबद्दल पक्षश्रेष्ठींचे आभार मानताना वडेट्टीवार यांचे नाव घेणे टाळले. त्यावर विचारले असता वडेट्टीवार यांनीही, गडबडीत नाव घ्यायचे राहून गेले असेल अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. आता प्रतिभा धानोरकर या महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्याशी सामना करणार आहेत. या लढाईत वडेट्टीवार यांची भूमिका धानोरकर यांना पूरक राहते की नाही, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Continue reading

‘ठाकरे’ ब्रँड मराठी माणसांचा नाही, तर फक्त बाळासाहेबांच्या शिवसैनिकांचा!

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ठाकरेंचे चालले तरी काय, हा प्रश्न प्रत्येक मराठी माणसाच्या मनात घुटमळतोय. त्याचं कारणही तसंच आहे. जो विषय प्रत्यक्षात उतरलाच नाही, त्या विषयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे रणकंदन करत आहेत, तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत...

इलेक्ट्रिक वाहनधारकांकडून सक्तीची टोलवसुली सुरूच! शासननिर्णय केराच्या टोपलीत!!

महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना मुंबई-पुणे आणि मुंबई-नागपूरदरम्यान असलेल्या मुंबई-पुणे एक्सप्रेस वे, समृद्धी महामार्ग आणि शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू यावर 100% पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय होऊन आज दोन महिने झाले तरीही या मार्गांवर इलेक्ट्रिक वाहनधारकांकडून पथकर उकळून...

फडणवीसांच्या जाळ्यात अडकले उद्धव ठाकरे!

कम ऑन किल मी.. हा प्रहार चित्रपटातला डायलॉग मारत शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या गटाच्या वर्धापनदिनाच्या मेळाव्यात नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सत्तेच्या हव्यासापोटी आणि पुत्रप्रेमाच्या लालसेपोटी भारतीय जनता पार्टीबरोबर निवडणूक लढवून आणि जिंकूनही...
Skip to content