जरांगे पाटील यांच्या मागण्या तर्काला धरून आहेत, नियमाला धरून आहेत. सरकारच त्यांचे काही ऐकत नाही, असे चित्र निर्माण झालेले दिसते. जरांगेच्या मागण्या तत्काळ मान्य केल्या पाहिजेत. जरांगेनी सरकारला वेठीस धरलेले नाही तर सरकारनेच जरांगेना वेठीस धरले आहे. मी याआधी केलेली माझी सर्व भाषणे मागे घेत असून जरांगेच्या अभिनव कल्पनांना मान्यता देत आहे, असा उपरोधिक टोला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज माध्यमांशी बोलताना लगावला.
मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला २४ डिसेंबरचा अल्टीमेटम दिला असून आता पत्नीकडील नातेवाईकांना आरक्षण देण्याची त्यांनी मागणी केली आहे. काल सरकारचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधत होते. पण ही चर्चा निष्फळ ठरली. त्यावरून छगन भुजबळ यांनी आज पत्रकार परिषद घेऊन जरांगे पाटील यांच्यावर उपरोधिक टोलेबाजी केली. जरांगे यांच्या मनात रोज नवनवीन कल्पना येतात. त्यावर सरकारने लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी करतो असे भुजबळ यावेळी म्हणाले.
आपण जरांगेंचे ऐकले पाहिजे. नाहीतर ते मोर्चा घेऊन येतील. आणखी काहीतरी करतील. त्यामुळे आपण व्याहींचे व्याही, त्यांचे व्याही यांना ताबडतोब आरक्षण दिले पाहिजे. माझे तर म्हणणे आहे की, मंत्रीमहोदय सारखेसारखे त्यांना भेटायला अंतरवाली सराटी येथे जात आहेत. ते फार अडचणीचे होते. त्यामुळे तिथे दोन-चार सरकारी बंगले बांधले पाहिजेत. मुख्य सचिवांचे एक कार्यालय तिथे स्थापन केले पाहिजे. जरांगेंनी सांगितल्यानंतर मंत्र्यांनी ऑर्डर काढून मुख्य सचिवांनी त्याला तत्काळ मंजुरी देऊन टाकावी. तसेच माजी न्यायाधीशांच्या समितीचेही कार्यालय तिथे थाटावे, म्हणजे जरांगे म्हणतात त्याप्रमाणे अहवाल तयार करता येईल, असा टोलाही त्यांनी लगावला.