मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर धुरकट प्रदूषणाची चादर ओढून पहुडलेले तुमचे-आमचे ठाणे शहर! ठाणे शहरातील रस्तेही पाण्याने धुऊन काढले जातील, अशी घोषणा खुद्द मुख्यमंत्री शिंदे यांनी करूनही आता पंधरापेक्षा अधिक दिवस उलटलेले आहेत. धुळीची आणि धुरकटतेची पुटे ठाणे शहरावर चढत असताना महापालिका आणि प्रदूषणविरोधी काम करणारी सरकारी यंत्रणा हातावर हात धरूनच गप्प बसणार आहे का, हा ठाणेकरांचा संतप्त सवाल आहे. मुंबईप्रमाणे ठाण्याच्या वाढत्या प्रदूषणासंबंधात राज्य सरकारला पंतप्रधान कार्यालयातून एखादा फोन येण्याच्या प्रतीक्षेत येथील अधिकारी वर्ग आहे का? असेही अनेकजण विचारत आहेत.
माजिवडा परिसरात जेथे प्रदूषणविरोधी यंत्रणा बसवली आहे तेथेच अधिकतम प्रदूषण असल्याचे दिसून आले आहे. या परिसरात कुठल्याही वेळी 50/75 घमेली भरून धूळ सापडेल असे या परिसरात फेरी मारली असता दिसून आले. रेल्वेस्थानक परिसरतात दोन्ही बाजूला (पूर्व व पश्चिम) धुळीचेच साम्राज्य आहे. सुमारे 25 टक्के रिक्षा तसेच अवजड वाहने शहरात प्रदूषण ओकत असतात हेही गंभीरच म्हणायचे नाही का? महापालिका आयुक्त तमाम ठाणेकरांच्या छातीचे खोके झाल्यावरच आपण कारवाईचा बडगा उगारणार का? ठाणेकरांना उत्तर हवे आहे. जागो आयुक्त, जागो!!