Homeडेली पल्समुंबई शहरातल्या मतदारांनो,...

मुंबई शहरातल्या मतदारांनो, यादीतले आपले नाव तपासा!

मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांच्या मतदान केंद्राची यादी व प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली असून मतदारांनी या याद्यांचे अवलोकन करून हरकती असल्यास 9 डिसेंबर 2023 पर्यंत त्या नोंदवाव्यात, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केले आहे. 

मतदान केंद्र आणि प्रारुप मतदार यादीबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस उपमुख्य निवडणूक अधिकारी रवींद्र राजपूत, तहसीलदार अर्चना मुळे, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

दि. 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत भारत निवडणूक आयोगाने मुंबई शहर जिल्ह्यातीत 10 विधानसभा मतदारसंघातील एकूण 2509 मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरणाच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. या मतदान केंद्रांची यादी तसेच प्रारुप मतदार यादी मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाच्या www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालय तसेच मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघ कार्यालयातील सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदारांनी या मतदारयादीचे अवलोकन करून दावे व हरकती असल्यास विहीत अर्ज नमुना क्रमांक सहा, सात व आठ भरून दि. 9 डिसेंबर 2023पर्यंत संबंधित विधानसभा मतदारसंघामध्ये नोंदवाव्यात, असे ते म्हणाले.

या प्रारुप मतदारयादीतील एकूण मतदारांची संख्या 24 लाख 50 हजार 355 एव्हढी आहे. यामध्ये 8920 इतकी नवीन मतदार नोंदणी आहे. तर दुबार, मृत अथवा कायमस्वरूपी स्थलांतरित अशा 6107 मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. प्रारुप मतदारयादीतील पुरुष मतदारसंख्या 13 लाख 27 हजार 131 तर स्त्री मतदार संख्या 11 लाख 23 हजार 18 इतकी आहे. ऑक्टोबर 2023 मधील यादीमध्ये एक हजार पुरूषांच्या मागे 846 स्त्रिया असून तृतीयपंथी समुदायाची ऑक्टोबर 2023मधील संख्या 206 इतकी असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. बूथ लेवल ऑफिसर (बीएलओ) यांनी घरोघरी जाऊन मतदारयादी अद्ययावत केली आहे. याद्वारे सुमारे 98 टक्के काम पूर्ण झाले असल्याचेही क्षीरसागर यांनी सांगितले.

लोकसंख्येच्या प्रमाणात 18 ते 19 वर्षे वयोगटाच्या तरुणांचे प्रमाण सुमारे तीन टक्के आहे. तथापि, मतदार यादीतील त्यांचे प्रमाणे अर्धा टक्के आहे. यासाठी मुंबई शहर जिल्ह्यामध्ये युवा मतदारांची नोंदणी वाढवण्यासाठी महाविद्यालयांमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच ‘उत्कृष्ट मतदार मित्र महाविद्यालय पुरस्कारा’चे आयोजनही करण्यात आले आहे. शंभर टक्के मतदार नोंदणी केलेल्या आणि मतदार जागृतीचे उपक्रम राबवणान्या महाविद्यालयांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत. महिला मतदारांचे प्रमाण वाढणे देखील आवश्यक असून यासाठी सहकारी गृहनिर्माण संस्थांना आवाहन करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी श्री.क्षीरसागर यांनी सांगितले.

सर्व पात्र नागरिकांची नावे मतदारयादीत यावीत यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. तथापि, मतदारांनी प्रारुप यादी तपासून त्यात नाव असल्याची खात्री करून सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

Continue reading

आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार ३ हेक्टरपर्यंत आर्थिक मदत

यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून राज्यशासनाने तातडीने मदत देण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी दोन हेक्टरपर्यंत मदत देण्यासाठी शासनाने मान्यता दिली होती. आता या शेतकऱ्यांना ३ हेक्टरपर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठीही विशेष बाब म्हणून ६४८ कोटी १५ लाख ४१...

खारपाड जमीनीवरचा खजूर लागवडीचा प्रयोग कोकणातही उपयोगी?

गुजरातच्या सौराष्ट्रमधील अमरेली जिल्ह्यातील सावरकुंडला तालुक्यातील एका शेतकऱ्याने खारपाड जमीन, मिठागरात खजूर लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे. हा अनोखा पॅटर्न कोकणातील अन् राज्यातील क्षारयुक्त, खारट शेतजमीनधारकांसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे. सावरकुंडला येथील या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव आहे- घनश्यामभाई चोडवडिया. त्यांच्या...

‘कोटक सिक्युरिटीज’ने सुचविले काही धमाकेदार दिवाळी शेअर्स!

"कोटक सिक्युरिटीज"ने वर्षभरात 34%पर्यंत रिटर्न्स देतील असे खात्रीशीर धमाकेदार शेअर्स या दिवाळीत गुंतवणुकीसाठी सुचविलेले आहेत. पुढील दिवाळीपर्यंत चांगली कामगिरी करू शकतील असे 7 स्टॉक या ब्रोकरेज हाऊसने शॉर्टलिस्ट केले आहेत. अदानी पोर्ट्स-सध्याची किंमत (CMP): ₹ 1,419पुढील दिवाळीपर्यंत टार्गेट: ₹ 1,900गुंतवणुकीवर...
Skip to content