Homeचिट चॅटसीआरपीएफच्या ‘यशस्विनीं’चे पुण्यात...

सीआरपीएफच्या ‘यशस्विनीं’चे पुण्यात जोरदार स्वागत!

केंद्रीय राखीव पोलीस दल अर्थात सीआरपीएफच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर 75 महिला जवानांच्या ‘यशस्विनी बाईक रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाअंतर्गत कन्याकुमारी येथून 5 ऑक्टोबर रोजी निघालेल्या यशस्विनी रॅलीचे पुणे शहरात काल आगमन झाले. पुणे जिल्हा प्रशासनाकडून या रॅलीचे जोरदार स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमास पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, सीआरपीएफचे डीआयजी वैभव निंबाळकर, डीआयजीपी राकेश कुमार, जिल्हा कार्यक्रम अधिकारी जामसिंग गिरासे यांच्यासह महिलावर्ग, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. 

यशस्विनी रॅलीदरम्यान ठिकठिकाणी स्त्री जन्माचे आणि नारी शक्तीचे महत्त्व यांच्यासंदर्भात जनजागृती करण्यात येत आहे. रॅलीतील महिला बाईकर्स या आपल्या मार्गातील शहरांमध्ये जाऊन किशोरवयीन मुली, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, अंगणवाडी कर्मचारी तसेच एनसीसी कॅडेट्स यांच्याशी संवाद साधून महिला सशक्तीकरण आणि ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’बाबत संदेश देत आहेत. 

यशस्विनी रॅलीतील 75 महिला जवान सोलापूर, इंदापूरमार्गे पुणे शहरातील शनिवार वाडा येथे सर्वप्रथम आपल्या दुचाकी वाहनावरून दाखल झाल्या. यावेळी यशस्विनींचे ढोल ताशा वादन आणि औक्षण करून जोरदार स्वागत करण्यात आले. तसेच ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रमाअंतर्गत कलशपूजनही करण्यात आले.

पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यावेळी म्हणाले की, महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर हे 1 हजार पुरुषांमागे 912 महिला असे आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ हा संदेश समाजात रुजू करण्याची आवश्यकता आहे. सीआरपीएफच्या वतीने काढण्यात आलेल्या यशस्विनी रॅलीमुळे हा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. 
कार्यक्रमादरम्यान, माझी कन्या भाग्यश्री-‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजनेतील लाभार्थ्यांना एफडी प्रदान करण्यात आल्या. त्यानंतर एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, दौंड येथील अंगणवाडी सेविकांचा मुलीच्या जन्मास प्रोत्साहनपर पोवाड्याचे सादरीकरण झाले. तसेच, पुण्यातील बालाजीनगर येथील व्यंकटेश माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या विषयावर पथनाट्य सादर केले. 

दरम्यान, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नारायणगाव येथील अंगणवाडी सेविकांनी मंगळागौर कार्यक्रम सादर केला. अखेरीस, सीआरपीएफच्या तळेगाव कॅम्प येथील जवानांनी देशभक्तीपर सामूहिक नृत्यानेही उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content