‘युगानुयुगे नवरात्रीचे व्रत करण्यात येते. या 9 दिवसांत देवीच्या 9 रूपांची पूजा करण्यात येते. नवरात्रीच्या निमित्ताने आपण या देवीच्या 9 रूपांचा महिमा जाणून घेणार आहोत. नवरात्रीचे व्रत म्हणजे आदिशक्तीची उपासना होय देवीच्या 9 रूपांविषयी आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
देवीच्या 9 रूपांविषयी…!
देवीकवचमध्ये लिहिलेला खालील श्लोक आणि त्याचा अर्थ देत आहे.
प्रथमं शैलपुत्रीति द्वितीयं ब्रह्मचारिणी।
तृतीयं चन्द्रघण्टेति कूष्माण्डेति चतुर्थकम्।। 3।।
पञ्चमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनीति च।
सप्तमं कालरात्रिश्च महागौरीति चाष्टमम्।। 4 ।।
नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिताः।
उक्तान्येतानि नामानि ब्रह्मणैव महात्मना।। 5 ।।
– देवीकवच
अर्थ: पहिली शैलपुत्री, दुसरी ब्रह्मचारिणी, तिसरी चंद्रघण्टा, चौथी कुष्माण्डा, पाचवी स्कंदमाता, सहावी कात्यायनी, सातवी कालरात्री, आठवी महागौरी आणि नववी सिद्धिदात्री अशी ही नऊ दुर्गांची नावे साक्षात् ब्रह्मदेवाने सांगितली आहेत.
नवरात्रीतील 9 दिवस देवीच्या वरील 9 रूपांची पूजा केली जाते.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आदिशक्ति देवीचे प्रकट होणारे शैलपुत्री रूप!
वन्दे वाञ्छितलाभाय चन्द्रार्धकृतशेखराम्।
वृषारूढां शूलधरां शैलपुत्रीं यशस्विनीम्।।
अर्थ: ‘मस्तकावर अर्धचंद्र धारण करणार्या, वृषभारूढ, त्रिशूलधारी, वैभवशाली अशा शैलपुत्री देवीला इच्छित मनोकामना पूर्ण व्हावी’, यासाठी मी वंदन करतो.
शैलपुत्री, म्हणजे पर्वतराज हिमालयाची कन्या असल्यामुळे तिला ‘शैलपुत्री’, असे संबोधले जाते. सर्व देवतांच्या अहंकाराचेही हरण करणार्या शैलपुत्रीला ‘हैमावती’, असेही संबोधतात. भक्तांचे मनोवांछित पूर्ण करणारी, चंद्रालंकार धारण करणारी, वृषभारूढ, त्रिशूळधारी आणि यश प्राप्त करवून देणार्या शैलपुत्री देवीच्या चरणी कोटी कोटी वंदन!
‘शैल’ म्हणजे पर्वत. दक्षाने केलेल्या यागाच्या वेळी दक्षपुत्री देवी सती तिचे ‘आदिशक्ति’ हे स्वरूप प्रकट करून तिचा अवतार संपवते. त्यानंतर आदिशक्ति पर्वतराज हिमालयाची पुत्री म्हणून जन्माला येते. तिचे हे रूप ‘शैलपुत्री’ या नावाने पूजले जाते. या रूपात देवी वृषभावर आरूढ आहे. तिच्या एका हातात त्रिशूळ आणि दुसर्या हातात कमळ आहे. शैलपुत्री पार्वतीला ‘हैमावती’ असेही म्हणतात. एकदा देवतांनाही अहंकार झाला होता. त्यावेळी देवी शैलपुत्रीने त्यांचे गर्वहरण करून त्यांचा अहंकार नाहीसा केला होता.
नवरात्रीच्या दुसर्या दिवशी प्रकट होणारे आदिशक्तीचे रूप ‘ब्रह्मचारिणी’!
‘शिव पती म्हणून लाभावा’, यासाठी देवी सतीने केलेली अतिशय कठीण तपश्चर्या– ‘ब्रह्मचारिणी’ हे देवी सतीचे अविवाहित रूप आहे. ‘ब्रह्मचारिणी’ या नावामधील ‘ब्रह्म’ म्हणजे ‘शुद्ध आत्मतत्त्व’ आणि ‘ब्रह्मचारिणी’, म्हणजे आत्मतत्त्वाच्या उपासनेत सतत रत (मग्न) असलेली. पार्वतीने ‘शिव पती म्हणून लाभावा’, यासाठी महर्षि नारद यांच्या सांगण्यावरून सहस्रो वर्षे कठीण तपश्चर्या केली. शेवटची काही सहस्र वर्षे ती केवळ बिल्व पानांच्या (बेलाच्या पानांच्या) आहारावर राहिली आणि शेवटी तिने बिल्व पाने खायचेही सोडून दिले. तेव्हा तिला ‘अपर्णा’ असे नाव पडले. ‘पर्ण’ म्हणजे ‘पान’ आणि ‘अपर्णा’, म्हणजे ‘व्रतपालन करताना जिने पानांच्या सेवनाचाही त्याग केला ती. ब्रह्मचारिणी देवीचे स्वरूप ज्योतिर्मय आणि भव्य आहे. देवीच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन ब्रह्मदेवाने आकाशवाणीच्या माध्यमातून सांगितले, ‘देवी, आजपर्यंत तुझ्यासारखी एकनिष्ठेने कुणीही साधना केली नाही. तुला साक्षात् शिवशंकर पतीरूपात लाभणार आहे.’ देवीने जगासमोर ईश्वरप्राप्तीसाठी अखंड साधना करून अविरत साधनेचा अत्युत्तम आदर्श ठेवला आहे.
चंद्रघण्टा हे आदिशक्तीचे तिसर्या दिवशी प्रकट होणारे रूप!
देवी चंद्रघण्टा हे पार्वतीचे विवाहित रूप आहे. देवी पार्वतीचा शिवाशी विवाह झाल्यावर तिने तिच्या मस्तकावर घंटा रूपात अलंकार म्हणून चंद्र धारण केला आहे. देवीचे चंद्रघण्टा हे रूप सदैव शस्त्रसज्ज असते. ती दशभुजा असून तिची कांती सुवर्णमय आहे. चंद्रघण्टा देवीकडे असलेल्या घंटेतून बाहेर पडणार्या चंड-ध्वनीला दानव सदैव घाबरतात. देवी चंद्रघण्टा भक्तांच्या जीवनातील दुःख दूर करण्यासाठी नेहमी तत्पर असते. देवी तिच्या भक्तांच्या जीवनातील भूत, प्रेत आणि पिशाच बाधा दूर करते.
आदिशक्तीचे नवरात्रीतील 4थ्या दिवशी प्रकट होणारे कुष्मांडा रूप!
‘कूष्म’ म्हणजे स्मितहास्य!’ ‘कुष्मांडा’ (टीप १) म्हणजे केवळ आपल्या स्मितहास्यातून ब्रह्मांडाची उत्पत्ती करणारी! जेव्हा सृष्टीचे अस्तित्त्व नव्हते आणि सर्वत्र अंधकार होता, त्या वेळी देवीने ‘कुष्मांडा’ रूपात केवळ हास्याने ब्रह्मांडाची उत्पत्ती केली. ‘कुष्मांडा’ हे आदिशक्तीचे आदिस्वरूप आहे. सूर्यमंडलाच्या आत जी शक्ति आहे, तीच ‘कुष्मांडा’ होय! कुष्मांडादेवी अष्टभुजा देवी आहे. संस्कृत भाषेत कोहळ्यालाही ‘कुष्मांड’ म्हटले जाते. कुष्मांडादेवीला कोहळ्याचा बळी अत्यंत प्रिय आहे. कुष्मांडादेवी भक्तांचे रोग, दैन्य आणि शोक दूर करणारी अन् आयुष्यवृद्धीचीही देवता आहे. (टीप १ ) देवीच्या या नावाविषयी अनेक पाठभेद आहेत.
आदिशक्ति देवीचे नवरात्रीच्या पाचव्या दिवशी प्रकट होणारे ‘स्कंदमाता’ रूप!
बालरूपातील कार्तिकेयाला कडेवर घेतलेली आदिशक्ति ज्ञानदायिनी असल्यामुळे तिचे ‘स्कंदमाता’ हे ज्ञानस्वरूप असणे. देवांचे सेनापती, म्हणजे कार्तिकेय! कार्तिकेयाचे एक नाव ‘स्कंद’ आहे. ‘स्कंदमाता’ म्हणजे कार्तिकेयाची माता. या अर्थाने देवीचे एक नाव ‘स्कंदमाता’, असे आहे. नवरात्रीच्या पंचमी तिथीला आदिशक्तीची ‘स्कंदमाता’ या रूपात पूजा करण्यात येते. या रूपात देवीच्या कडेवर भगवान कार्तिकेय बालरूपात बसला आहे. चतुर्भुज असलेली स्कंदमाता सिंहावर आरूढ आहे. या रूपात देवी ज्ञानदायिनी आहे. या रूपात स्कंदमातेने बालरूपातील कार्तिकेयाला स्वरूपाचे ज्ञान दिले; म्हणून ती ज्ञानस्वरूपिणी आहे.
नवरात्रीच्या सहाव्या दिवशी प्रकट होणारे आदिशक्तीचे ‘कात्यायनी’ रूप!
महर्षि कात्यायन यांनी ‘आदिशक्तीने आपल्या घरी ‘पुत्री’रूपात जन्म घ्यावा’, यासाठी घोर तपश्चर्या केली, तेव्हा देवीने ‘योग्य वेळ येताच मी जन्म घेईन’, असे आशीर्वचन दिले होते. महर्षि कत यांचे पुत्र कात्यऋषि आणि कात्यऋषि यांचे पुत्र महर्षि कात्यायन! महर्षि कात्यायन यांची ‘देवीने त्यांच्या घरी पुत्रीच्या रूपात जन्म घ्यावा’, अशी इच्छा होती. यासाठी त्यांनी आदिशक्तीची कठोर तपश्चर्या केली. महर्षींच्या तपश्चर्येवर प्रसन्न झाल्याने आदिशक्तीने ‘योग्य वेळ आल्यावर तुमच्या घरी पुत्रीच्या रूपात जन्म घेईन’, असे त्यांना सांगितले. कालांतराने महिषासुराचा त्रास वाढल्याने ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांच्या संयुक्त ऊर्जेने जी शक्तीस्वरूपिणीची उत्पत्ती झाली, त्या शक्तीने आश्विन कृष्ण पक्ष चतुर्थीला कात्यायन ऋषींकडे जन्म घेतला. देवीने कात्यायन ऋषींकडे जन्म घेतल्याने तिला ‘कात्यायनी’ असे नाव पडले. दुर्गा, भवानी, चामुंडा ही सर्व कात्यायनी देवीचीच रूपे आहेत. नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली जाते.
नवरात्रीच्या सातव्या दिवशी प्रकट होणारे आदिशक्तीचे कालरात्री रूप, शुभंकरी!
नवरात्रीच्या सातव्या दिवशी प्रकट होणारे आदिशक्तीचे ‘कालरात्री’ हे स्वरूप पुष्कळ भयंकर असून त्या रूपाला सर्व दानव, भूत, प्रेत आदी घाबरत असणे; मात्र ती शुभफलदायिनी असल्यामुळे तिला ‘शुभंकरी’ म्हटले जाते.
नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवी कालरात्रीची पूजा करण्यात येते. कालरात्रीदेवीचा रंग काळा आहे. या देवीच्या उच्छ्वासातून अग्नीच्या ज्वाळा निघतात. देवीला ब्रह्मांडासारखे गोल आकारांतील ३ नेत्र आहेत. तिचे वाहन गर्धभ (गाढव) आहे. कालरात्रीदेवीचे स्वरूप भयंकर आहे; मात्र ती नेहमी शुभफल देणारी आहे. त्यामुळेच कालरात्रीदेवीला ‘शुभंकरी’ (मंगलदायिनी) असे नाव दिले आहे. देवी कालरात्री म्हणजे आदिशक्तीचे विनाशकारी रूप आहे. देवीचे हे रूप पाहून सर्व दानव, भूत, प्रेत आदी घाबरतात. कालरात्रीदेवीची उपासना केल्याने ग्रहपीडा, अग्नीभय, जलभय, जंतूभय आणि शत्रूभय दूर होतात. कालरात्रीदेवी शुभंकरी असल्याने ती पापनाशिनी आणि पुण्यप्रदायिनी आहे. काली, कालिका ही कालरात्रीचीच रूपे आहेत.
नवरात्रीच्या आठव्या दिवशी प्रकट होणारे आदिशक्तिदेवीचे ‘महागौरी’ रूप!
‘शिव पती म्हणून लाभावा’, यासाठी देवीने केलेल्या कठोर तपामुळे तिचे शरीर काळे पडणे, शिवाने प्रसन्न होऊन तिला पवित्र गंगाजलाने स्नान घालणे, तेव्हा देवीचे गौर रूप दिसणे; म्हणून तिला ‘महागौरी’ म्हटले जाते.
नवरात्रीमध्ये अष्टमी तिथीला आदिशक्तीची ‘महागौरी’ या रूपात पूजा केली जाते. या रूपात देवीला आठ वर्षांची मुलगी मानले आहे. देवीने परिधान केलेल्या वस्त्राचा रंग पांढरा आहे. देवीला चार भुजा असून देवीचे वाहन वृषभ आहे. देवीने लहान वयातच शिवाला पती मानले होते. ‘शिव पती म्हणून लाभावा’, यासाठी देवीने तिच्या पार्वती रूपात कठोर तपश्चर्या केली. त्यामुळे देवीचे शरीर काळे पडले. देवीच्या तपश्चर्येने शिव प्रसन्न झाला. त्याने गंगेच्या पवित्र जलाने देवीचे शरीर धुतले. त्यामुळे देवीचे शरीर स्वच्छ पांढरे झाले. संस्कृत भाषेत स्वच्छ पांढर्या रंगाला ‘गौर वर्ण’ असे म्हणतात. यामुळे देवीला ‘महागौरी’ असे नाव पडले.
आदिशक्ति तिच्या महागौरी रूपात ‘भक्तांचे ताप, पाप आणि संचित धुऊन काढते’, असे शास्त्रात म्हटले आहे. थोडक्यात महागौरीच्या उपासनेने भक्त पवित्र बनतो आणि त्याची अंतर्-बाह्य शुद्धी होते. महागौरीचे वैशिष्ट्य म्हणजे देवी मनुष्याला सत् कडे जाण्याची प्रेरणा देते.
आदिशक्तीचे योगमाया स्वरूप आणि तिने केलेला असुरांचा नाश!
‘अष्टमी’ ही तिथी आदिशक्तीशी निगडित आहे. कृष्णाष्टमीला श्रीकृष्णाच्या जन्माच्या आधी आदिशक्ति स्वतः ‘योगमाया’ रूपात जन्म घेते. ‘योगमाया’, म्हणजे जगत् जननी होय! तिची माया अनंत आणि अवर्णनीय आहे. हीच ‘योगमाया’ श्रीविष्णूच्या श्रीरामावतारात सीता बनून आली आणि रावणासुराच्या बंधनात राहिली. साक्षात् आदिशक्तीला एका असुराच्या बंधनात राहण्याचे काय कारण? ‘हीच तिची माया आहे’, जी कुणीही समजू शकत नाही.
आदिशक्ति योगमायेच्या साहाय्याने श्रीविष्णूने मधु आणि कैटभ या असुरांचा नाश केला. केवळ योगमायेच्या कृपेने श्रीविष्णूने अत्यंत बलशाली अशा मधू आणि कैटभ या असुरांचा नाश केला हि आख्यायिका सर्वांना माहीतच असेल. अशा या जगत् जननी, महामाया, दैत्यसंहारिणी, त्रिभुवननायिका श्री दुर्गादेवीचा विजय असो!
नवरात्रीच्या नवव्या दिवशी प्रकट होणारे आदिशक्तीचे ‘सिद्धिदात्री’ रूप!
अष्टमहासिद्धी प्राप्त असलेली आणि भक्तांच्या लौकिक अन् पारलौकिक इच्छा पूर्ण करणारी देवी सिद्धिदात्रीची नवरात्रीच्या नवव्या दिवशी पूजा केली जाते. मार्कंडेय पुराणानुसार अणिमा, महिमा, लघिमा, गरिमा, प्राप्ति, प्राकाम्य, इशित्व आणि वशित्व या ८ सिद्धी आहेत. या सिद्धी प्रदान करणारी ती ‘सिद्धिदात्री’ देवीपुराणानुसार देवी सिद्धिदात्रीच्या कृपेने शिवाने या ८ सिद्धी प्राप्त केल्या आणि तिच्याच कृपेने शिवाचे अर्धे शरीर देवीचे झाले. त्यामुळे शिवाला ‘अर्धनारीश्वर’ असे नाव पडले. देवी कमळावर बसलेली असून ती चतुर्भुज आहे. श्री सिद्धिदात्रीदेवी भक्ताच्या लौकिक आणि पारलौकिक दोन्ही इच्छा पूर्ण करते. सर्व भक्त ईश्वरप्राप्तीची इच्छा करतील, असे नाही. ज्याला सिद्धीप्राप्तीची इच्छा आहे, त्याला सिद्धिदात्रीदेवी सिद्धी प्रदान करते आणि ज्याला अष्टसिद्धींचा स्वामी असणारा ‘ईश्वर’ पाहिजे आहे, त्याला ती ईश्वराची प्राप्ती करून देते, म्हणजे ती मोक्षदायिनी आहे. अशा मोक्षदायिनी सिद्धिदात्रीदेवीच्या चरणी कोटीशः नमन!
महामाया आदिशक्तीला शरण जाणे, हाच एकमेव मार्ग असणे!
‘मनुष्य रूपातील देवता किंवा असुर यांना ओळखता न येणे’, हीसुद्धा आदिशक्तीची योगमाया असणे. आज आपण कलियुगात आहोत. अन्य युगांच्या तुलनेत हे युग जड आहे आणि अधिक स्थूल आहे. या युगात भगवंताने मनुष्य रूपात अवतार घेतला किंवा असुर मनुष्य रूपात आले, तरी ते कळणे अशक्य आहे. आदिशक्तीची योगमाया एवढी प्रबळ आहे की, मनुष्य रूपातील देवता आणि असुर यांना ओळखणे अशक्य आहे.
आदिशक्ति म्हणजे भगवंताचे शक्तिस्वरूप असून त्यामुळे संपूर्ण सृष्टीचे कार्य अव्याहत चालू असणे – आदिशक्तीच्या संदर्भातील वरील लिखाणांतून ‘आदिशक्तीविना आपले अस्तित्त्व नाही’, हे लक्षात येईल. थोडक्यात सांगायचे झाले, तर आदिशक्ति म्हणजे भगवंताची शक्ति आहे. तिच्यामुळे भगवंताने निर्माण केलेल्या सृष्टीचे चक्र चालू रहाते. जसे अग्नी आणि अग्नीची दाहकशक्ती एकच आहेत, तसे भगवंत अन् त्याची शक्ती एकच आहेत. निर्गुण भगवंताचे सगुणत्व शक्तीमुळे आहे. त्रिगुणांच्या आधारे आदिशक्तीच सर्व कार्य करते आणि सर्वांकडून कार्य करवून घेते. भले ते देव असोत, दानव असोत किंवा मनुष्य असोत. या सर्वांकडून होणारे कार्य आदिशक्तीच्या कृपेमुळेच होत असते.
सर्वकाही आदिशक्तीच्या इच्छेने होत असल्याने तिला शरण जाणे, हाच एकमेव मार्ग असणे- काही जणांना प्रश्न पडतो, ‘सर्वकाही आदिशक्तीच्या इच्छेने होते, तर आपण का धडपडावे ? आपण का कार्य करावे?’, याचे उत्तरही ‘आदिशक्ती’च आहे. ‘आपण गप्प बसू’, असे म्हटले, तरी आपण गप्प बसूच शकत नाही. येनकेन प्रकारेण आदिशक्ति आपल्या सर्वांकडून कार्य करवून घेतेच. ‘कर्म करत राहणे आणि आदिशक्तीला शरण जाणे’, एवढेच आपण करू शकतो. ‘मी कर्मच करणार नाही’, असे म्हणणे अयोग्य आहे. ‘जे कर्म आपल्याला मिळाले आहे, ते कर्म योग्य प्रकारे करण्याची शक्ती आपल्याला मिळू दे’, अशी त्या जगन्माता आदिशक्तीच्या चरणी प्रार्थना आहे.
अशा त्या आदिशक्तीची अनन्यभावाने भक्ती करण्याचे ९ दिवस म्हणजे ‘नवरात्री’ होय!
सौजन्य- सनातन संस्था
संपर्क क्र.: 9920015949