Friday, December 27, 2024
Homeन्यूज अँड व्ह्यूजएकदिवसीय क्रिकेट विश्वचषक...

एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची ‘ती’ रया गेली!

१९९०च्या दशकात “ब्रिटानिया खाओ वर्ल्ड कप जाओ”सारख्या जाहिराती दोन-तीन महिनेआधीच क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे बिगुल वाजवायच्या. सोबत भारतीय खेळाडूंच्या शीतपेयांच्या जाहिरातींचे शहरांतील मोठाले होर्डिंग्ज, रंगीत टीव्हीच्या जाहिरातीतून होणारा ऑफर्सचा भडिमार देशभरात वर्ल्डकप फिवर पसरविण्यास पुरेसा ठरायचा. १९८३च्या विश्वचषकानंतर आशियाई देशात खऱ्या अर्थाने क्रिकेटचे लोण फोफावले.

पाश्चात्य देशांना क्रिकेटच्या प्रसारापेक्षा वर्ल्डकप नावाच्या कुंभमेळ्यात मोठया लोकसंख्येच्या प्रगतशील देशांची बाजारपेठ, ही व्यापाराची मोठी संधी होती. टेलिव्हिजनवर क्रिकेटच्या लाईव्ह टेलिकास्टच्या दरम्यान केल्या जाणाऱ्या जाहिरातींच्या भडीमाराने थंड पेय, टीव्ही, गाड्या अशी अनेक उत्पादने विक्रीचे उच्चांक गाठू लागली. जाहिरातींच्या वधारलेल्या भावामुळे थेट प्रक्षेपणाच्या व्यवहारातून क्रिकेटमध्ये प्रचंड पैसा येऊ लागला. भारतासारख्या क्रिकेटवेड्या देशात तर क्रिकेट विश्वचषक हा नवा कुंभमेळा बनून गेला.

जाहिरातीतून भारत यावेळी विश्वचषक जिंकणार असे आभासी चित्र उभे करुन कोट्यवधी भारतीयांना स्वप्नांच्या दुनियेत नेऊन दूरचित्रवाहिनीला खिळवून ठेवायचे व त्यायोगे करोडोंची उलाढाल करायची हे तंत्र चांगले विकसित झाले. प्रत्यक्षात १९८३नंतर विश्वचषक जिंकायला भारताला २०११पर्यंत वाट पाहावी लागली असली तरी मधल्या काळात प्रत्येकवेळी भारत जिंकणार असे रेखीव चित्र उभे करुन विश्वचषकाचे निमित्त साधून धंदा चौपट करण्यात भांडवलदार यशस्वी झाले.

हा भाग थोडा बाजूला ठेवला तर त्याकाळी वर्ल्डकपची चातकाप्रमाणे वाट पाहणारे क्रीडाप्रेमीदेखील गल्लोगल्ली सापडायचे. वेळापत्रकाचे कात्रण भिंतीवर लावण्यापासून महत्त्वाच्या मॅच सार्वजनिक ठिकाणी दाखविण्याची व्यवस्था करेपर्यंत सर्व सोपस्कार फार आधीपासून केले जायचे. कुठची मॅच कोणत्या वारी इथपासून सुट्टी, संघाची स्ट्रेटेजी इथपर्यंतचा चर्चा सलूनपासून नाक्यापर्यंत रंगायच्या. महिनाभर आधीपासून वर्तमानपत्रांचे रकाने वर्ल्ड कपसंबंधी विशेष लेखांनी भरायचे. कुतूहल वाढविण्यासाठी या साऱ्या गोष्टींना महत्त्व होते.

यंदाची क्रिकेट विश्वचषक स्पर्धा कालपासून सुरू झाली आहे. आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे जागतिक क्रिकेटवर सर्वार्थाने अंकुश असलेला भारत या कुंभाचे यजमानपद भूषवतोय. तरीदेखील या विश्वचषक स्पर्धेबद्दल खेळाचा मोठा चाहतावर्ग असणाऱ्या देशात पूर्वीसारखे कुतूहल, उत्सुकता, जोश का पाहयला मिळत नाही? अतिक्रिकेट, आयपीएल, की जाहिरात व्यवसायांच्या बदलेल्या संकल्पना? त्याकाळात चार वर्षांनी येणाऱ्या वर्ल्ड कपच्या मध्ये ठराविक देशांचे दौरे आणि तिरंगी स्पर्धा वगळल्यास फार भरगच्च कार्यक्रम नसायचा. दरवर्षी आयपीएलसारख्या दोन महिने सतत सामन्यांचा अतिरेक करणाऱ्या लीगनंतर क्रिकेटची खरी मजा कमी झाली.

क्रिकेट खेळाडूंचे कसब आणि त्यांच्या खेळाच्या अकर्षणापेक्षा मॅचदरम्यान ऑनलाईन जुगाराची चटक अधिक हावी झाली. स्मार्ट फोनमुळे एकत्र क्रिकेटचा आनंद लुटण्याची मजा कालबाह्य झाली. टी ट्वेण्टीच्या झटपट फॉरमॅटच्या तुलनेत दिवसभर शंभर ओवर्स टीव्हीसमोर बसणे दुरापास्त झाले. हेदेखील एकदिवसीय विश्वचषकाची लोकप्रियता कमी होण्याचे एक कारण म्हणावे लागेल.

सर्वच क्षेत्रात कालानुरुप बदल होत असतात व ते स्वीकारावेदेखील लागतात. त्याप्रमाणे क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या नव्या अवतारातील बदलही जग स्वीकारेल. पैशाचा ओघदेखील नवनवीन पर्यायातून वृद्धींगत होईल. मात्र विश्वचषक नावाच्या जत्रेच्या निमित्ताने अनुभवायला मिळणारा निखळ आनंद, चैतन्य आणि उत्साहाची सर आताच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात राहिली नाही, एवढं मात्र नक्की!

Continue reading

आंतरशालेय जंप रोप स्पर्धेत आशनी, योगिता, झाकीर, स्वयंमला सुवर्ण

मुंबईच्या चेंबूर येथील दि ग्रीन एकर स्कूलमध्ये नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय जंप रोप अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या १९ वर्षांखालील गटात आशनी काळे (लोरोटो कॉन्व्हेट), योगिता सामंत (के. जे. सोमय्या कॉलेज) आणि मुलांच्या याच गटात झाकीर अन्सारी, स्वयंम कांबळे (दोघेही...

कर्तबगार अधिकाऱ्याची सत्यकथा ‘आता थांबायचं नाय’!

बृहन्मुंबई महानगरपालिका, आशियामधील सर्वात श्रीमंत समजली जाणारी भारतातील मानाची महानगरपालिका, याच महापालिकेच्या सहकार्याने आणि प्रेरणेने तयार होत आहे, 'झी स्टुडिओज'चा आगामी मराठी चित्रपट, 'आता थांबायचं नाय'! 'झी स्टुडिओज', 'चॉक अँड चीज' आणि 'फिल्म जॅझ' प्रॉडक्शनची एकत्र निर्मिती असलेल्या 'आता थांबायचं...

परभणीतील सूर्यवंशी मृत्यूप्रकरणीही न्यायालयीन चौकशी

परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी न्यायालयीन चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. संविधानाच्या प्रतिकृतीच्या कथित विटंबनेवरून परभणीमध्ये १० डिसेंबरला हिंसाचार उसळला होता आणि त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू ओढवला होता. विधानसभेत या विषयावर गेले दोन...
Skip to content