भारतीय नौदलासाठी सुमारे 19,000 कोटी रुपयांच्या एकूण खर्चाच्या युद्धनौकांच्या ताफ्यासाठी सहाय्यक जहाज म्हणजेच पाच ‘फ्लीट सपोर्ट’ जहाजे (एफएसएस) अधिग्रहीत करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने 25 ऑगस्ट 2023 रोजी हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड (एचएसएल), विशाखापट्टणमसोबत करारावर स्वाक्षरी केली. स्वदेशी डिझाइन आणि एचएसएल, विशाखापट्टणमद्वारे या जहाजांची बांधणी केले जात असल्यामुळे संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भरतेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मोठी चालना मिळणार आहे सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीने 16 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या बैठकीत या जहाजांच्या अधिग्रहणाला मंजुरी दिली होती.
युद्धनौकांमध्ये इंधन, पाणी, दारूगोळा आणि वस्तूंचे भांडार पुन्हा भरण्यासाठी या फ्लीट सपोर्ट जहाजांचा वापर केला जाईल यामुळे भारतीय नौदलाच्या ताफ्याला यासाठी बंदरावर वारंवार परत न येता दीर्घकाळ कार्य करता येईल. ही जहाजे नौदलाची सामरिक पोहोच आणि गतिशीलता वाढवतील. या जहाजांच्या समावेशामुळे भारतीय नौदलाची जहाजे मुख्य बंदरापासून खोल समुद्रात दीर्घकाळ परिचालन करू शकतील. ही जहाजे लोकांना स्थलांतरीत करण्यासाठी आणि मानवी सहाय्य तसेच आपत्ती निवारण (एचएडीआर ) कार्यांसाठी देखील तैनात केली जाऊ शकतात.
44,000 टनांची फ्लीट सपोर्ट जहाजे ही भारतीय जहाजबांधणी कंपनीद्वारे भारतात बांधली जाणारी पहिलीच जहाजे असतील. या प्रकल्पामुळे आठ वर्षांच्या कालावधीत जवळपास 168.8 लाख श्रम दिन इतका रोजगार निर्माण होईल.या जहाजांच्या बांधणीमुळे भारतीय जहाजबांधणी उद्योगाला एक नवा आकार मिळेल आणि एमएसएमईसह संबंधित उद्योगांच्या सक्रिय सहभागाला प्रोत्साहन मिळेल. यासाठीची बहुसंख्य उपकरणे आणि यंत्रणा स्वदेशी उत्पादकांकडून उत्पादित केल्या जात असल्याने, सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांच्या अनुषंगाने ही जहाजे ‘आत्मनिर्भर भारत’चे अभिमानास्पद ध्वजवाहक असतील.